प्राण्यांना वाचवणारा सुपरहिरो...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2018   
Total Views |




हरवलेल्या प्राण्यांना निवाऱ्यापर्यंत पोहोचविणं, अशा कामांमध्ये विघ्नेश लहानपणापासून रमायचा. ‘ब्ल्यू क्रॉस इंडिया’च्या माध्यमातून हेच काम आता तो पेशा म्हणून करत आहे. त्याविषयी...

 

विघ्नेश विजयलक्ष्मी हा एक २२ वर्षांचा सामान्य मुलगा. शरीरयष्टी बारीक आणि स्वभाव अबोल, पण त्याच्या निस्सीम प्राणीप्रेमामुळे तो ‘सुपरहिरो’ म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याच्या थोड्याशा बावळट दिसण्यावर आणि बोलण्या-चालण्यावर काही लोक हसतात, पण विघ्नेश स्वत: हे मान्य करतो की, “माणसांच्यात राहण्यापेक्षा मला प्राण्यांच्यातच राहायला जास्त आवडतं.” चेन्नईमधील ‘ब्ल्यू क्रॉस इंडिया’ (बीसीआय) या संस्थेत काम करणारा तो सर्वांत लहान प्राणीरक्षक (Animal Rescuer) ठरला आहे.

 

विघ्नेश हा शिक्षणाने इंजिनिअर. महाविद्यालयात असताना इंजिनिअरिंगपेक्षाही त्याचं प्राण्यांकडेच जास्त लक्ष असायचं. बरेचदा कुठे एखादं मांजर विहिरीत पडलेलं असेल, जखमी मोकाट गुरं कुठी पडलेली दिसली की तो कॉलेज बुडवून तिकडेच पळायचा. मग प्राणी कुठे अडकलेले असतील तर त्यांना सोडवणं, जखमी प्राण्यांवर उपचार करणं, निवारा हरवलेल्या प्राण्यांना निवाऱ्यापर्यंत पोहोचविणं, अशा कामांमध्ये तो लहानपणापासून रमायचा. ‘ब्ल्यू क्रॉस इंडिया’च्या माध्यमातून हेच काम आता तो पेशा म्हणून करत आहे. कुठल्याही माणसाकडून प्राण्यांना मदतीसाठी फोन आला की, क्षणाचाही विलंब न करता विघ्नेश घटनास्थळी धाव घेऊन प्राण्याची सुटका करतो. प्राण्यांच्या सुटकेसाठी त्याने स्वत:च्या काही खास पद्धती विकसित केल्या आहेत. पिसाळलेले कुत्रे, साप यांच्या जवळपासही जायची आपली हिंमत होत नाही, पण योग्य साधनांचा वापर करून या प्राण्यांना पकडण्यात विघ्नेश तरबेज झाला. बरेचदा शहरात मोकाट फिरत असलेली गुरे आणि कुत्रे वाहतुकीत व्यत्यय आणतात आणि अस्वच्छताही निर्माण करतात. अशा प्राण्यांना धरून त्यांना वस्तीपासून दूर, जंगली भागात सुरक्षित ठिकाणी पोहोचवणं हे त्या प्राण्यांच्या आणि माणसाच्या दोघांच्याही दृष्टीने आवश्यक असतं. विघ्नेश हे काम करतो. मानवी वस्तीत जंगली प्राण्यांचा उपद्रव अलीकडे खूप वाढला आहे. अर्थात, त्याचं कारणही बेसुमार जंगलतोड हेच आहे. प्राण्यांच्या अधिवासावरच आपण घाला घालतो आहोत म्हटल्यावर साहजिकच ते अन्नाच्या आणि आसऱ्याच्या शोधात मानवी वस्तीत शिरणार! अशा प्राण्यांचा उपद्रव होऊ लागल्याने बरेचदा मानवाकडून त्यांची हत्या होते. अशी प्राण्यांची निष्कारण होणारी हत्या टळावी, या हेतूने विघ्नेश हे काम करतो.

 

विघ्नेश सांगतो की, “प्राण्यांना आपण जेव्हा पकडायला जातो, तेव्हा प्रथम ते घाबरतात. पळण्याचा प्रयत्न करतात. ओरडतात. आपल्याला मारायला कोणीतरी आलं आहे, असं त्यांना वाटतं. अशा वेळी त्यांना खूप नाजूकपणे आणि सावधपणे हाताळावं लागतं. मात्र, एकदा त्यांना त्यांच्या योग्य ठिकाणी सोडलं की, मग ते शांत होतात.” विघ्नेशला असली साहसं करायची भयंकर आवड आहे. या आवडीनेच त्याला ‘सुपरहिरो’ बनवलं आहे. “प्राण्यांना काही काळ त्रास होतो, पण त्यामुळे त्यांचा आयुष्यभराचा त्रास वाचतो,” असं विघ्नेश सांगतो. त्याने सांगितलेला एक प्रसंग तर थरारकच आहे. एकदा विघ्नेशला रस्त्यावर एक कुत्रा अत्यंत जखमी अवस्थेत पडलेला आढळला. दिवाळीच्या फटाक्यांमुळे कुत्र्याचं तोंड भाजलं होतं. तो मरणासन्न अवस्थेत रस्त्यावर पडला होता. त्याच्या अंगाभोवती माशा घोंघावत होत्या. जखमांमध्ये किडे झाले होते आणि त्यांचा दुर्गंध लांबपर्यंत पसरला होता. विघ्नेशने ताबडतोब कुत्र्यापाशी जाऊन त्याच्या जखमा पाण्याने धुतल्या. कुत्र्याला तसंच हाताने उचलून तो मोटरसायकलवरून ४० किलोमीटर लांब पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन गेला. त्याच्यावर योग्य ते उपचार होऊन तो कुत्रा ठणठणीत बरा झाला. विघ्नेशने त्याला जवळच्याच प्राणीसंग्रहालयात दाखल करून त्याला घर मिळवून दिलं. प्राणीवेडापोटी माणूस काय काय करू शकतो? विघ्नेश रोज संध्याकाळी त्या कुत्र्याला भेटायला जातो. विघ्नेश पोहोचताक्षणी तो कुत्रा जिथे कुठे असेल तिथून धावत येतो आणि दोन पंजे विघ्नेशच्या पोटावर ठेवून त्याचं प्रेमाने स्वागत करतो. आपण प्राण्यांवर प्रेम केलं की, प्राणीही आपल्यावर प्रेम करतात, हा संदेश विघ्नेशने या उदाहरणातून जगासमोर ठेवला आहे.

 

विघ्नेशने एकाच वर्षात अशा अडचणीत सापडलेल्या ७७ प्राण्यांची सुटका केली. विघ्नेश अत्यंत निष्ठेने आणि आवडीने करत असलेल्या कामाबद्दल लोक त्याला ‘सुपरहिरो’ म्हणून संबोधू लागले आहेत. वास्तविक त्याला ‘सुपरहिरो‘ वगैरे म्हणवून घ्यायला आवडत नाही. “मी माझ्या कामाशी एकनिष्ठ असून एक सर्वसामान्य माणूस म्हणूनच मी आनंदी आहे.” असं विघ्नेश आवर्जून सांगतो. भूतदया हे भारतीय संस्कृतीचं एक ठळक वैशिष्ट्य आहे. भूतदयेची संकल्पना सगळ्यांनाच माहीत आहे, पण भूतदया जगलेली विघ्नेशसारखी ‘माणसं’ विरळाच...

@@AUTHORINFO_V1@@