चांदोलीतील व्याघ्रदर्शनाने वन्यजीवप्रेमींमध्ये उत्साह

    26-Jun-2018
Total Views |




कोल्हापूर : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचाच भाग असलेल्या चांदोली राष्ट्रीय उद्यानात पट्टेरी वाघाचे अस्तित्व आढळून आले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या माध्यामातून राबविण्यात आलेल्या टायगर रिकव्हरी प्रोग्राम अंतर्गत लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये पट्टेरी वाघाचे छायचित्रण मिळविण्यात वनविभागाला यश आले आहे.

 
सांगली जिल्ह्यात अलीकडच्या काळात वाघाचे अस्तित्व आढळून आलेले नव्हते. आता या पट्टेरी वाघाच्या दर्शनाने सांगलीतील वन्यजीव प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. साधारणत: तीन ते चार वर्षे वयाच्या नर वाघाची ही छायाचित्रे आहेत. चांदोली राष्ट्रीय उद्यान सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातच येते.जैवविविधतेच्या दृष्टीने महाराष्ट्रातील हा भाग अत्यंत संवेदनशील मानला जातो.
 
 


 
 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे संचालक व मुख्य वनसंरक्षक बेन क्‍लेमेंट यांनी मुंबई तरूण भारतशी बोलताना सांगितले की, २०१५ पासून या उपक्रमातंर्गत वाघांचे अस्तित्व वैज्ञानिक पध्दतीने नोंदविण्याचे काम सुरू आहे. आता मिळालेला हा फोटो म्हणजे वनविभागाचे कर्मचारी व अधिकार्‍यांच्या कष्टाला आलेले फळ मानावे लागेल.