सुरक्षा दलांच्या टार्गेटवर ‘हे’ ९ कुख्यात दहशतवादी

    23-Jun-2018
Total Views | 18



 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेतल्याची चुणूक या आठवड्यात आतापर्यंत केलेल्या कारवायांवरुन दिसते. आता सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमधील कुख्यात २१ दहशतवाद्यांची यादी तयार केली असून या दहशतवाद्यांना लक्ष्य केले जाणार आहे. यामध्ये हिज्बुल मुजाहिद्दीनच्या ११, लष्कर - ए- तोयबाचे ७, जैश- ए- मोहम्मदचे २ आणि अल-कायदाची जम्मूतील संघटना अन्सार गजवत उल हिंद या संघटनेच्या एका दहशतवाद्याचा समावेश आहे. या २१ मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांना ए++ श्रेणीत ठेवण्यात आले आहे. या दहशतवाद्यांवर १२ लाखांचे इनाम आहे.

 

१. डॉक्टर सैफुल्लाह - सैफुल्लाह याला अबू मुसेब या नावाने देखील ओळखले जाते. सैफुल्लाह हा श्रीनगर भागात हिज्बुल मुजाहिद्दीनचा प्रमूख आहे. तो पुलवामा येथील मालंगपोराचा रहिवासी असून डॉक्टर असलेला सैफुल्लाह सुरक्षा दलांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या दहशतवाद्यांवर उपचारही करतो.

 

२. झाकीर मुसा - झाकीर मुसा उर्फ झाकीर राशिद भट हा अल कायदाची जम्मू- काश्मीरमधील संघटना अन्सार गजवत उल हिंदचा प्रमुख आहे. तो अवंतीपोरामधील नुरपोराचा रहिवासी आहे. झाकीर हा पूर्वी हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये होता.

 

३. झुबैर-उल-इस्लाम - झुबैर हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा काश्मीरमधील कमांडर आहे. तो पुलवामामधील बैगपुरा येथील रहिवासी असून सब्जार अहमद भटच्या मृत्यूनंतर झुबैरकडे काश्मीरची जबाबदारी सोपवण्यात आली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात झुबैरचा हातखंडा असल्याचीही माहिती आहे.

 

४. समीर अहमद सेह - समीर अहमद सेह हा अल-बद्र या संघटनेचा दहशतवादी आहे. ही संघटना अफगाणिस्तानमधील दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत. १९९८ पासून ही संघटना जम्मूत सक्रीय आहे.

 

५. झहूर अहमद - झहूर अहमद हा सिरनू येथील रहिवासी असून २०१७ मध्ये तो दहशतवादी संघटनेत सामील झाला. औरंगबजेब या जवानाच्या हत्येमागे जहूरचा हात असल्याचा संशय आहे. झहूर हा भारतीय सैन्याचा जवान होता. २०१७ मध्ये तो लष्करी कॅम्पमधून एके ४७ घेऊन पळून गेला होता. यानंतर तो हिज्बुल मुजाहिद्दीन या संघटनेत सामील झाला.

 

६. अल्ताफ कचरु उर्फ मोइन-उल-इस्लाम - अल्ताफ हा हिज्बुल मुजाहिद्दीनचा कुलगाममधील कमांडर आहे. २०१५ नंतर सुरक्षा दलांवर झालेल्या हल्ल्यांचा तो मास्टरमाईंड असून तो विज्ञान शाखेतील पदवीर आहेत.

 

७. नावेद जट - नावेद जट उर्फ अबू हंजाला हा पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्येनंतर चर्चेत आला आहे. तो पाकिस्तानी असून लष्कर-ए-तोयबा या संघटनेसाठी तो काम करतो.

 

८. वासिम अहमद उर्फ ओसामा - वासिम अहमद अर्थात हा शोपियाँ जिल्ह्यातील लष्कर-ए-तोयबाचा कमांडर असून तो बुरहान वानीच्या गटातील आहे.

 

९. झिनत उल इस्लाम उर्फ अलकामा - अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अबू इस्माइलला सुरक्षा दलांनी चकमकीत ठार मारल्यानंतर झिनतला लष्कर-ए-तोयबात कमांडरपदावर बढती देण्यात आली. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये शोपियाँत सैन्याच्या पथकावर झालेल्या हल्ल्याचा तो मुख्य सूत्रधार होता.

 

दहशतवाद्यांचे मृतदेह अज्ञातस्थळी पुरणार?

 

जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे अंत्यविधीसाठी सोपवले जात होते. मात्र, आता त्यांचे मृतदेह कुटुंबीयांना न सोपवण्याचा मोठा निर्णय भारतीय लष्कराने घेतल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांचा अंत्ययात्रेला ज्या पद्धतीने गर्दी होते, चिथावणीखोर भाषणे होतात, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता काश्मीरमधील अतिरेक्यांचे मृतदेह अज्ञातस्थळी पुरण्यात येणार आहेत. गृहमंत्रालयाने दिलेल्या सूचनेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे, पण या निर्णयाची अजूनही अधिकारिक पातळीवर पुष्टी होऊ शकलेली नाही.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121