जलसंवर्धनातून समाजसंवर्धन -जलदूत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2018   
Total Views |


 

 
 
 
 
आपण सिनेमातून पाहतो की, एक भकास गाव असते आणि त्या गावचा विकास करायला कोणी तरी परदेसी येतो आणि स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. पण, ‘जलदूतच्या कामात कुणी बाहेरून आलेला नेता नाही, अभिनेता नाही तर गावातलाच संवेदनशील मनाचा तरुण. पाण्याचे दुर्भिक्ष्य, त्यामुळे होणारी गावची वाताहत त्याने टिपली आणि तो पुढे सरसावला जलदूतहोऊन.. त्या जलदूतची ही कहाणी.. अशा या किशोर शितोळेजलदूताचे कार्य आणि विचार प्रेरणादायी आहेत.

किसी का दर्द हो सके तो ले उधार,

जिना इसी का नाम है...

म्हणत दुसर्‍यांसाठी जगणे हे जागतिकीकरणाच्या युगात तसे अशक्यच पण, जलदूत किशोर शितोळे यांनी ‘दुसर्‍यांसाठी’ म्हणण्यापेक्षा आपल्या समाजबांधवांसाठी जगण्याचे व्रत स्वीकारले. किशोर शितोळे करतात तरी काय? त्यांना जलदूतका म्हणतात? त्याचीही एक संवेदनशील कथा..

२०१२ साली महाराष्ट्रामध्ये दुष्काळाने कहर केला. पाणी,पाणी म्हणून गावेच्या गाव उद्ध्वस्ततेच्या दिशेने घायकुतीला आली होती. ‘काळ्या मातीत मातीत, तिपन चालते’चे सूर केव्हाच विलुप्त होऊन शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे मरणगाणं भरून राहिले. शेतकर्‍यांच्या आत्महत्येत मराठवाड्याने कलंकित आघाडी घेतली. पावसाविना करपून गेलेल्या शेतीभातीबरोबरच करपून गेलेली गावे, पुढचा काही उद्योग नाही, अर्थकारण नाही म्हणून हातावर हात घेऊन निराशेच्या गर्तेत कोसळलेले युवा. निराशेला उतारा म्हणून व्यसनाकडे वळलेली युवापिढी. हे दृश्य २०१२ सालचे. महाराष्ट्राच्या मराठवाड्याचे हे दृश्य कोणत्याही संवेदनशील मनाला अस्वस्थ करण्यासारखेच. अर्थात प्रसारमाध्यमांनी या परिस्थितीला जगासमोर आणले. सकाळच्या वेळी चहा-कॉफीचे घुटके घेत वर्तमानपत्रात या बातम्या कित्येकांनी वाचल्या असतील. दूरदर्शनवर याच घटनांचे विदारक चित्रणही पाहिले असेल. पण बस.. तितकेच. पुढे प्रत्येक जण आपल्या जगण्याच्या चक्रात अडकून जातो, पण या सर्वांच्या पलीकडे जाऊन औरंगाबादच्या किशोर शितोळेंनी मनाच्या संवेदनांची साद जपली. त्यांनी ठरवले की, आपण शेतकर्‍याचे जगणे पुन्हा जगणे बनवायचे. पाण्याशिवाय कुणीही जगू शकत नाही. नेहमीच अवर्षण नसते. कधी कधी तर इतका पाऊस पडतो की पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. हे पाणी उपयोगात आणायला हवे.

त्यावेळी किशोर शितोळे हे देवगिरी बँकेच्या संचालकपदावर होते. पाणीसंवर्धनाच्या कामासाठी समाजाने जबाबदारी घेऊन अर्थसाहाय्य करावे, असे शासनानेही सूचित केले. गावागावात तर चित्र स्पष्टच होते की, सगळ्यांचे म्हणणे, सरकारने हे केले पाहिजे, ते केले पाहिजे. मागण्या आणि नुसत्या मागण्या. समाज क्रियाशील आहे, फक्त त्याला आपल्या शक्तीची जाणीव व्हायला हवी. एकदा का ती झाली की, अशक्य कोटीची कामे होतात. म्हणूनच म्हणतात ना, ‘गाव करी ते राव ना करी’. गावाला सोबत घेऊन काम करणे गरजेचे होते. पुढे २०१२ साली देवगिरी बँकेने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’साठी आर्थिक मदत केली, पण नुसत्या आर्थिक मदतीवर न थांबता बँकेचे संचालक किशोर शितोळे स्वतः बंधारा बांधण्याच्या कामात सहभागी झाले. रणरणते ऊन, पाण्याचा थेंब नसलेली लाही लाही झालेला मातीचा धुरळा. पण तरीही केव्हातरी पाऊस पडेल. बंधार्‍यामुळे पाणी अडेल, जिरेल. गावातली नदी, विहीर पाण्याचं मुख पाहिल. या एका जिद्दीने लोक सहभागी झाले. काय आश्चर्य, त्यांच्या या जिद्दीला यश आले. इथूनच किशोर शितोळे या उद्योगपती तरुणाच्या जीवनात जलज्योत तेवली आणि जलदूतम्हणून औरंगाबादमध्ये किशोर शितोळे नावाचा जलक्रांतिकारक नावारूपाला आला.

कौडगाव आणि पंचक्रोशीतले नांदलगाव, ताहेरगाव, धुपखेडा ही गाव. कोण्या एकेकाळी या गावातून ‘येलगंगानावाची खरोखर गंगेची बहीण शोभावी, अशी नदी वाहत होती. पण काळाच्या ओघात येलगंगा गंगा तर सोडाच नदीही राहिली नाही. दुर्दैवाने तिचे स्वरूप गटारगंगा झाले. गावचे पाण्याचे प्रमुख स्त्रोत आटले. पाण्याच्या दुर्भिक्ष्याने गावांचे जनजीवन पार विस्कळीत झाले. पाणी आणण्यासाठी घरातल्या सौभाग्यकांक्षिणी मैलोन्मैल चालू लागल्या. पिण्यापुरती पाण्याची सोय होत असे. पण दारच्या पशुधनाचे काय? वावरातल्या शेतपिकाचं काय? त्यातच पाण्याअभावी स्वच्छतेलाही मर्यादा आली. रोगराईचा वेढा पडला. ‘विद्येविना मती गेलीच्या तालावर ‘पाण्याविना गती गेलीअशी अवस्था झाली. हे सगळं किशोर शितोळे अनुभवत होते. त्यांना आतून वाटत होते की काहीतरी केले पाहिजे. त्यासाठी त्यांनी गावातल्या चार समजूतदार लोकांशी संपर्क-संवाद सुरू केला. आपल्या गावातल्या येलगंगेला नासवणार्‍या कचर्‍याकुंड्या हद्दपार करूया, नदी स्वच्छ करूया, नदी स्वच्छता फक्त निसर्ग किंवा पर्यावरणासाठी नाही तर आपल्या जगण्यासाठी नदी स्वच्छ करणे गरजेचे आहे. आता नाही तर परत कधीच नाही, हे मत किशोर यांनी गावकर्‍यांमध्ये ठसवले. ‘ज्योत से ज्योत जगाते चलो,’ असे म्हणत एक एक करत गावकरी या कल्पनेला मूर्त स्वरूप आणण्यासाठी पुढे सरसावले. लोकांसाठी हे सारे नवीन पण महत्त्वाचे होते. हे सगळे करत असताना पैशांची निकड तर होतीच, पण ‘लोकांच्या सहभागातून लोकांचा विकासया तत्त्वावर ठाम राहायचे तर लोकांचा तन-मन आणि धनानुसारही सहभाग असणे गरजेचे होते. त्यामुळे नदी स्वच्छतेसाठी जे काही पैसे लागतील, ते गावकर्‍यांनीच गोळा करायचे हे ठरले.

ज्यांना गावगाडा माहिती आहे, गावच्या राजकारणाची तोंडओळख आहे त्यांना समजायला अजिबात कठीण जाणार नाही की, गावात एखादी योजना लोकसहभागातून करणे म्हणजे काय दिव्य असते. लोकांचे जातपात, कुळ, भावकी, राजकीय गटतट यांना भेदून त्यांना केवळ ध्येयाच्या एका पातळीवर आणणे, हे महाकठीण काम, पण किशोर शितोळेंनी हे शिवधनुष्य पेलले. गाव त्यांचं ऐकतो अशा चार माणसांना नदी स्वच्छतेसाठी वर्गणी गोळा करणे, त्याचा हिशोब करण्यासाठी एकत्र केले. त्यांनी गावातून फक्त वर्गणी गोळा करायची. मेहनतीला पुरे पडतील असा युवावर्ग हा प्रत्यक्ष नदीस्वच्छतेच्या कामासाठी ठरवला गेला. त्यानुसार गट तयार झाले. कोणता गट काय करेल, याची आखणी झाली. गावातल्या प्रत्येकाला या योजनेत सहभागी करण्यात आले. इथेही मानसशास्त्रानुसार एक मोठे काम केले गेले. माणसाला अभिव्यक्त होण्यात जितका आनंद वाटतो, तितका कुठेही वाटत नाही. त्यातही आपल्या अभिव्यक्तीने सकारात्मक सर्जनशील काही होत असेल तर या अभिव्यक्तीचा आनंद शब्दातीत. नेमके हेच किशोर शितोळेंच्या नदी स्वच्छता अभियानात उतरले होते. आपल्या गावचा वारसा सांगणारी नदी, पंचक्रोशीला जीवदान देणारी नदी, त्या नदीला आपण पुनर्जीवित करणार, ही जाणीवच गावकर्‍यांसाठी खूप पवित्र होती, मोठी होती. त्यामुळे गाव पुढे सरसावला. बघता बघता दोन लाखांवर वर्गणी गोळा झाली. ‘साथी हात बढाना, एक अकेला थक जायेगा मिलके बोझ उठाना,’ म्हणत काम सुरू झाले. गटारगंगा झालेली येलगंगा पुन्हा तळापासून निर्मळ झाली. पुढे २१ दिवसांत ४ लाख रुपयांत ४ बंधारे लोकसहभागातून बांधले गेले. पहिल्या पावसात बंधारे भरले. पाण्याने भरलेले बांध बघून गावाच्या डोळ्यांत पाणी आले. पण ते पाणी, ते अश्रू आनंदाचे होते, कृतकृत्य भावनेचे होते. गावाचा दुष्काळ संपला होता.

किशोर शितोळे म्हणतात, “नदीची स्वच्छता करताना, बंधारे बांधताना फक्त पाणी अडवणे, पाणी जिरवणे ही भूमिका होती. पण या कामातून गावातली लोकं जातपात, धर्म अगदी राजकीय पक्षाचे भेद विसरूनही एकत्र आली. गावाच्या विकासासाठी एकत्र आलेले गावकरी एकमेकांचे पुन्हा स्नेहकरी झाले. त्यांच्यातला संवाद वाढला, प्रेम वाढले. गाव पुन्हा एकजुटीचा गाव झाला. बंधार्‍यात पाणी किती आले? आले की नाही? याहीपेक्षा गावाच्या सकारात्मक एकत्रीकरणातून गावामध्ये सामंजस्य वाढले. हे माझ्या मते महत्त्वाचे आहे.” पुढे एक व्यक्ती म्हणून किशोर शितोळे यांचे पाणी संवर्धनाबाबतचे काम वाढत होते. या कामातला लोकांचा गोतावळा वाढत होता. लोक तन-मन-धनाने या कामात समरस होऊन पुढे येत होते. मग किशोर शितोळे यांनी २०१४ साली जलदूतया सेवाभावी संस्थेची स्थापना केली. हजारोंच्या संख्येने लोक सहभागी होत होते. या सगळ्या परिक्रमेत किशोर हे जलसंवर्धनाचा अभ्यास करत होते. किशोर यांनी औरंगाबादला पाण्याच्या दुर्भिक्ष्यात असलेली १२ गावे आणि सुकून उद्ध्वस्त झालेल्या ९ नद्या यांवर जलदूतच्या माध्यमातून लक्ष केंद्रित केले. ९ नद्या स्वच्छ झाल्या. नद्यांच्या तिरावरची गावं पुन्हा पाण्याने आणि जगण्यानेही समृद्ध झाले. या कामाची चर्चा सर्वत्र होऊ लागली. श्रमजीवी समाजच नव्हे तर वैचारिक आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध असलेले लोकही जलदूतच्या कामाने प्रभावित झाले. ‘जलदूतच्या कामात ते स्वतःहून सहभाग नोंदवू लागले. सोशल मीडियावरून माहिती घेऊन तरुणवर्गही सुट्टीच्या दिवशी श्रमदान करायला तयार होऊ लागला. लोकसहभागातून नवीन नवीन कल्पनांचा आविष्कार साकार होऊ लागला.

बारवा

‘बारवा’ म्हणजे बाराही महिने पाणी असणार्‍या विहिरी, तर या बारवा गावाच्या अस्मिताच होत्या. कोणे एकेकाळी पूर्वजांनी ज्ञान वापरून या विहिरी अशा जागी बांधल्या होत्या की, तिथे वर्षाच्या बाराही महिने विहिरींना पाणी लागत होते, पण हळूहळू या बारवा दुर्लक्षित होत गेल्या. अक्षम्य पर्यावरणाच्या हेळसांडीमुळे, प्रदूषणामुळे बारवा आटत गेल्या आणि हळूहळू विस्मृतीतही गेल्या, पण यामुळे गावचे पाण्याचे स्त्रोत नाहक संपुष्टात आले. किशोर शितोळेच्या जलदूतसंस्थेने या बारवांवर काम करायचे ठरवले. बारवांचा शोध घेणे, त्यांना पूर्वीचे वैभव मिळवून देण्यासाठी तिथल्या स्थानिकांना सहभागी करून घेणे, त्यांच्या सर्वतोपरी सहभागातून बारवांना पुन्हा जिवंत करणे हे ते काम. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जलसंवर्धनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. सातारा जिल्ह्यातील खंडोबाच्या मंदिराजवळची अशीच एक तीनशे वर्षे जुनी बारवा. ती अहिल्यादेवींनी बांधलेली होती. ‘जलदूतने या बारवाचे काम घेतले. युवक, महिला अगदी सगळा गाव श्रमदान करू लागला. बघता बघता बारवा स्वच्छ झाली. आजकाल ४०० - ५०० फूट खणल्यावरदेखील पाणी लागत नाही. पण बारवांना ३५ -४० फुटावर पाणी लाभते. ‘जलदूतच्या प्रेरणेने आणि लोकसहभागाने ही ३०० वर्षांपूर्वीची बारवा पुन्हा पाण्याने नांदू लागली. राजमातेने बांधलेली आणि आताच्या लोकांनी मारलेली ही बारवा पुन्हा जिवंत झाली. त्यातच बारवाच्या तळाशी महादेवाच्या दोन पिंडी आणि विष्णू देवाच्या मूर्तीचे अवशेषही सापडले. गावकर्‍यांसाठी हा धर्मइतिहासाचा आनंदक्षण होता. त्यानंतर बारवा आणि त्यांचे पुनर्जीवन करण्यासाठी कित्येक हात पुढे सरसावले. यामध्ये महाविद्यालयीन तरुण, समाजभान असलेले नागरिक त्याचबरोबर ऐतिहासिक संशोधन करणारे संशोधकही पुढे आले. असो, पुढे जलसंवर्धनाच्या कामात जलदूतइतकी वेगाने मार्गक्रमण करू लागली की, एखाद्या गावात जलदूतचे काम सुरू झाले की, गावची प्रशासकीय यंत्रणा, अधिकारी जातीने स्वतः हजर राहून स्वतःही त्या कामात सहभागी होऊ लागले. ‘जनआणि 'प्रशासनयांच्या साथीने जलदूतच्या कामाला वेग आला. पाणी जिरण्या- अडण्यासाठी वृक्षराजींचे जगणे आवश्यक. ‘जलदूतने वृक्ष लागवडीचा उपक्रम सुरू केला. बीड बायपास परिसर असाच वैराण झालेला. इथे वृक्ष लावणे गरजेचे होते, पण पाण्याविना ओसाड गावात वृक्षांना पाणी कसे उपलब्ध होणार? तर जलदूतने शहरातील हॉटेल्समधून वापरून टाकलेल्या बिसलेरी पाण्याच्या बाटल्या गोळा केल्या. त्या बाटल्यांचा तळ कापला. जिथे वृक्षांची लागवड केली होती, त्याच्या बाजूलाच छोट्या खड्ड्यांमध्ये या बाटल्या उपड्या ठेवल्या. त्यांच्या झाकणाच्या बाजूला दोन छेद केले गेले. पाण्याने भरलेल्या या बाटल्यातून थेंब थेंब पाणी वृक्षांना मिळू लागले. वृक्षसंवर्धनाबरोबरच पर्यावरणाच्या पाणीचक्रात पशूपक्ष्यांचाही सहभाग महत्त्वाचा. ‘या चिमण्यांनो, परत फिरा रेम्हणून चिमण्या येत नाहीत, तर चिमण्यांना जगायला बळ देईल, असे वातावरण करणे गरजेचे असते हे जलदूतने हेरले. त्यामुळे ठिकठिकाणी पक्ष्यांसाठी पाणी आणि धान्यकणांची व्यवस्था निर्माण केली गेली.

जेव्हा आपण एखादा चांगला विचार, चांगले काम करण्याचे मनापासून ठरवतो, त्यावेळी त्या अनुषंगाने अनेक आयाम आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात, हाच तर ईश्वरी संकेत असतो. ‘जलदूतकिशारे शितोळेंना हा अलिखित ईश्वरी संकेत मिळाला असेच म्हणावे लागेल. कारण किशोर यांच्या कामाला अनेक आयाम मिळत गेले. त्यांच्या जलसंवर्धनाच्या अभ्यासाचा उपयोग व्हावा म्हणून अनेक ठिकाणांहून त्यांना मार्गदर्शक म्हणून बोलावणे येऊ लागले. शेतकर्‍यांनी आत्महत्या न करता स्वतःचे जीवन स्वतः बदलवा आणि घडवा, अशी व्याख्याने ते देऊ लागले. याचाच परिणाम म्हणून कधीकाळी निराशेच्या गर्तेत गेलेल्या कित्येक शेतकरी कुटुंबांमध्ये आत्मभान जागृत झाले. त्या कुटुंबांनी जीवनाच्या संघर्षाला यशस्वीपणे मात दिली. आज त्या शेतकरी कुटुंबातली पुढची पिढी यशस्वी होत आहे.

आपण असे पाहतो की, एखादे नवकल्पनेचे काम सुरू केले आणि यशस्वी झाले की त्या कल्पनेचा कर्ता व्यक्ती त्या कल्पनेवर, कृतीवर स्वतःचा मालकी हक्कच दर्शवतो. हे काम फक्त मीच करणार, दुसरे कोणी करू नये किंवा दुसरे कोणीही ते काम करण्याचा प्रयत्न करू नये, असे काहीसे वागणे असते, पण किशोर शितोळेंचे वागणे याच्या अगदी उलट. ते म्हणतात, “चांगले आणि समाजाचे प्रगतीचे काम हे कुण्या एकट्याचे असूच शकत नाही. या कामामध्ये कुणालाही कसलीही माहिती, मदत हवी असेल तर ती माहिती मदत देण्यास मी मनापासून तयार आहे. देशाच्या, समाजाच्या हितामध्ये आणि प्रगतीमध्येच आपलीही प्रगती आणि हित आहे. हे करत असताना आपण काही मोठे उपकार करत नसतो बरं. तर ही एक सेवाच आहे. सेवा आपल्या बांधवांची, आपल्या समाजाची. यामध्ये अहंकार, माझे-तुझेचा स्वार्थ नाहीच. त्यामुळे जलसंवर्धनाच्या क्षेत्रात काम करणार्‍या, समाजाला विकासात्मक प्रेरणा देणार्‍या सगळ्यांचे जलदूत स्वागत करते.”

किशोर शितोळे नुसते असे म्हणत नाहीत तर प्रत्यक्ष तसे घडतेही. किशोर यांच्या कामाला पूरक काम म्हणून काही महाविद्यालयीन तरुण स्वखर्चाने गावामध्ये येऊन शेतकर्‍यांच्या मुलांची ज्ञानतंत्रज्ञानाची शिकवणी घेऊ लागले. गावातला प्रत्येक जण यामुळे संगणक साक्षर होऊ लागला. प्राचार्य संतोष भोसले यांनी तर गावालाच दत्तक घेतले. मुनिष शर्मा यांनी तर गावाला पाच संगणक भेट म्हणून दिले. हेतू हा की गावामध्ये संगणक साक्षरता, ज्ञानलालसा वाढावी. याचबरोबर ज्योती शितोळे, राजश्री तांबे यांनी शहरातील डॉक्टरांना एकत्र केले. गावोगावी त्यांच्या सहकार्याने आरोग्यशिबिरे भरवली तर दुसरीकडे जलदूत किशोर शितोळेंनी शहरातील प्लंबर टीम एकत्र केली. कारण शहरामधील सोसायट्यांमध्ये बोअरवेल होत्या, पण त्यांना पाणीच लागत नव्हते. या सोसायट्यांशी संपर्क साधून त्यांना ‘पाणी अडवा, पाणी जिरवाचे महत्त्व सांगणे, सोसायटीच्या आवारातच शास्त्रोक्त खड्डा खणून त्याद्वारे पावसाचे पाणी जिरवणे असा उपक्रम सुरू झाला. शहरातील ३०० -३५० सोसायट्यांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. औरंगाबाद तर नामांकित कारखाने विषारी रसायने नदीनाल्यात सोडतात म्हणून प्रदूषण वाढते ही तर सर्वश्रुत कथाच होती. किशोर शितोळे यांनी उद्योगपतींना एकत्र केले. आपआपल्या आस्थापनांमध्ये शास्त्रोक्त खड्डे निर्माण करून त्यामध्ये पावसाचे पाणी अडवले. त्यामुळे या कारखान्यांमधून तयार होणारी विषारी रसायने जरी परिसर विषैल करत असतील, तरी या पावसाच्या साचलेल्या स्वच्छ पाण्याने परिसराचा भूगर्भ स्वच्छ पाण्याने भरला जाईल हे गणित. छोटे-छोटे उपक्रम त्यामध्ये विविध स्तरावरच्या लोकांचा घेतलेला जाणीवपूर्वक सहभाग. यामुळे जलदूतचे काम आणि नावही सर्वमुखी झाले. एक दिवस असा उजाडला की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलदूत किशोर शितोळे यांची जलसंवर्धनाविषयी विशेष भेट झाली आणि मुख्यमंत्र्यांनी जलदूतच्या कामाला मान्यता देत जलयुक्त शिवार या सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेचाही ऊहापोह केला. किशोर शितोळे म्हणतात, “ही माझ्यासाठी, ‘जलदूतसाठी मोठी गोष्ट आहे. कारण मुळात काही सन्मान व्हावा म्हणून आम्ही काम केले नव्हते. तरीही सरकारने कामाची दखल घेतली होती.” हरीभाऊ बागडे यांची यावेळी आठवण आली कारण त्यांनी पहिल्यांदा सांगितले होते की, नुसते पैशांची मदत देऊन नाही तर लोकसहभागातून जलसंधारणाचे काम कर.” ‘जलदूतम्हणून काम करताना आज समाधान वाटते. शेकडोने युवावर्ग, विविध स्तरावरचे लोक सहभागी आहेत, हे पाहून तर काय बोलावे हेच सुचत नाही. अर्थात किशोर यांना शब्द सुचत नसले तरी त्यांचे कार्य न बोलताही सर्वमान्य आहे. या कामाला स्थळकाळाची मर्यादा नाही आणि जातीभेदाचे कुंपणही नाही, तर जलव्यवस्थेतून समाजव्यवस्था हेच त्या कामाचे स्वरूप आहे.

जलदूत किशोर शितोळे

संपर्क : ९८२२०९९८८१

@@AUTHORINFO_V1@@