एसटी महामंडळाच्या वर्धापनदिनी ९२ जणांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार
जळगाव, १ जून :
राज्य परिवहन महामंडळाच्या ७० व्या वर्धापनदिनी जळगाव आगारात शुक्रवारी सकाळी १० वाजता आयोजित कार्यक्रमात ९२ कर्मचार्यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला.
तसेच सरकारने घोषित केल्याप्रमाणे आजपासूनच शिवशाही या वातानुकुलीत बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचा प्रारंभ करण्यात आला. वर्धापनदिनानिमित्त जळगाव बसस्थानकात केकही कापण्यात आला.
वर्धापन दिनानिमित्त राज्य सरकारने नव्याने सुरु केलेल्या शिवशाही या वातानकुलीत बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवासभाड्यात सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा शुभारंभ झाला.
यात ज्येष्ठ नागरिकांना शिवशाही बसेसमध्ये ४५ टक्के तसेच शयनयानात ३० टक्के सवलत देण्यात येणार आहे. या योजनेचा फायदा जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन विभागनियंत्रक राजेंद्र देवरे यांनी केेले. जळगाव विभागातून ९० कर्मचारी आणि २ अधिकारी शुक्रवारी सेवानिवृत्त झाले. या दिनाचे औचित्य साधून जळगाव आगारातील लेखा शाखेजवळील भव्य जागेत निवृत्त कर्मचार्यांचा सपत्नीक शाल, गुलाबपुष्प आणि स्मृतीचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.
वर्धापनदिनानिमित्त चौकशी कक्षाला आकर्षक पताका लावून सजावट करण्यात आली होती. प्रवाशांच्या हस्ते केक कापून गुलाबपुष्प व पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे, प्रल्हाद भिले, निलेश पाटील, प्रज्ञेश बोरसे, यंत्र अभियंता विजय धायडे, वाहतूक अधीक्षक सुरेश महाजन, सांख्यिकी अधिकारी प्रशांत महाजन, कौतिक बागुल, विभागीय लेखा अधिकारी राजेंद्र चव्हाण, विभागीय अभियंता पंकज महाजन, निलिमा बागुल आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन गोपाल पाटील यांनी केले.
‘शिवशाही’ (सीट) विविध ठिकाणचे प्रवासभाडे (कंसातील ज्येष्ठ नागरिकांसाठी)
पुणे- प्रवासभाडे- ६२९ रु. (३५९), नगर- ४४२ रु. (२५३), औरंगाबाद- २६४ रु. (१५१), सिल्लोड- १६० रु. (९२), नाशिक -४०४ रु.(२३१), धुळे- १५१रु.(८६), धुळे विनावाहक-१६१रु.(९६.) शिवशाही स्लिपर- पुणे- ९०५ रु.(६४६), नगर- ६३५ रु.(४५४), औरंगाबाद- ३७९रु. (२७१), सिल्लोड- २३० रु. (१६४), नाशिक- ५८१ रु. (४१५), मुंबई-९९९ रु.(७१३).