स्वार्थासाठी खालच्या पातळीचे राजकारण!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2018   
Total Views |

 


निवडणुका अजून दूर असल्या तरी देशातील विरोधक सैरभैर झाल्यासारखे वागत आहेत की काय असे वाटू लागले आहे. तसेच देशात कोठे काही घडले की, त्याची कसलीही शहानिशा न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जबाबदार धरायचे आणि जनतेला भडकविण्याच्या हेतूने त्याचा वापर करून आकाशपाताळ एक करायचे, असे विरोधकांचे वागणे दिसत आहे.
 

अलीकडे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात असलेल्या वाकडी गावात मागास जातीच्या दोन अल्पवयीन मुलांना अमानुष मारझोड करण्याचा जो प्रकार घडला, त्याचा निषेध, धिक्कार करावा तेवढा थोडाच! देश एकविसाव्या शतकात नवनवीन क्षेत्रे पादाक्रांत करीत असताना, माणुसकीला काळिमा फासणारी घटना या देशात घडते, ते पाहून कोणाचीही मान शरमेने खाली गेल्यावाचून राहणार नाही. वाकडी घटनेचा समाजाच्या सर्व थरांतून निषेधही झाला. पण, या घटनेच्या मुळाशी न जाता काही पक्षांचे नेते निष्कर्ष काढून मोकळे झाले! या घटनेस ‘दलित विरुद्ध सवर्ण,’ ‘ओबीसी विरुद्ध दलित’ असा रंग देऊन सामाजिक वातावरण कलुषित करता येईल का, असा प्रयत्नही काही मंडळींनी करून पाहिला.

 

यामध्ये आघाडीवर होते काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी. घटनेची कसलीही शहानिशा न करता भाजप आणि संघ यांच्यामुळे अशा घटना घडत आहेत, असा आरोप करून ते मोकळे आले. त्याहीपुढे जाऊन, आपण आता गप्प बसलो नाही तर इतिहास आपणास क्षमा करणार नाही, असे ते म्हणाले. राहुल गांधी यांना नेमकी घटना काय घडली याबाबत चुकीची माहिती पुरविली गेली असावी किंवा संघ परिवारास बदनाम करण्याची आयती संधी या निमित्ताने साधता येईल, असा कुटील हेतू मनात बाळगून त्यांनी हे वादग्रस्त भाष्य केल्याचे उघड आहे. आपल्या भाष्यात राहुल गांधी यांनी ‘सवर्ण’ शब्दाचा वापर केला. त्यामागे त्यांचा काय हेतू होता? खरे म्हणजे, भटक्या जमातीशी संबंधित दोघांनी, मातंग समाजातील दोघांना विहिरीत पोहण्यावरून अमानुष मारझोड केली होती. ही घटना नक्कीच निषेधार्ह होतीच. त्याचा सर्वांनी निषेधही केला. पण, या घटनेच्या आडून भाजप, संघ परिवारास लक्ष्य करण्याचा प्रकार तेवढाच निषेधार्ह आहे.

 

जातीपातींचा विचार चुकूनदेखील मनात न आणता, सर्व समाजास संघटित करण्याचे कार्य करीत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हे निमित्त साधून काँग्रेसच्या अध्यक्षांनी टीका करावी याला काय म्हणायचे? काहीही संबंध नसताना संघ परिवारास त्यात ओढायचे व बादरायण संबंध जोडून संघ परिवाराची बदनामी करायची, एवढाच अर्थ त्यातून निघू शकतो. वाकडी घटनेचे निमित्त साधून भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही भाजपवर तोंडसुख घेतले. गेल्या चार वर्षांत असे गुन्हे करणाऱ्यांना कसलाच धाक न राहिल्याने अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे त्यांचे म्हणणे! सुदैवाने वाकडीतील घटनेवरून समाजात असंतोष निर्माण करण्याचा काहींचा जो प्रयत्न होता, तो महाराष्ट्रातील सूज्ञ जनतेने उधळून लावला, असे म्हणता येईल. वाकडी घटनेवरून जनतेला भडकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांचे पितळ या निमित्ताने उघडे पडल्याचे दिसून आले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एखाद्या चांगल्या कृतीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्यास विरोधक तयार नसल्याचेही दिसून येत आहे. अलीकडे प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली याने पंतप्रधानांना ‘फिटनेस चॅलेंज’ दिले होते. जनतेमध्ये व्यायामाची गोडी निर्माण व्हावी, प्रत्येकाला आपली प्रकृती उत्तम असावी असे वाटावे आणि त्याने तशी कृती करावी, या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोहलीचे आव्हान स्वीकारले. व्यायाम करतानाची स्वत:ची एक चित्रफीत व्हायरल केली. त्यात त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना ‘फिटनेस चॅलेंज’ दिले, पण त्याकडे सकारात्मकतेने पाहतील तर ते कुमारस्वामी कसले! मला स्वत:पेक्षा माझ्या राज्याच्या फिटनेसची जास्त चिंता असल्याचे सांगून मोदी यांच्या या आव्हानाची त्यांनी खिल्ली उडविली. त्यातही या मंडळींनी राजकारण आणले. मोदी यांचे आव्हान खिलाडूपणे स्वीकारण्यास कुमारस्वामी यांना काहीच हरकत नव्हती. पण, असे करून मोदी यांची लोकप्रियता वाढली तर!

 

स्वत:ला राजकारणातील जाणकार म्हणविणारे नेते किती खालच्या पातळीचे राजकारण खेळत असतात, याचा अनुभव उभ्या महाराष्ट्राने नुकताच घेतला. तुरुंगातून बाहेर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा सत्कार करतेवेळी सामाजिक वातावरण दूषित करण्याची खेळी शरद पवार खेळले. ‘पुणेरी पगडी’ऐवजी महात्मा फुले जसे पागोटे घालत असत, तसे पागोटे घालून यापुढे सत्कार करण्यात यावा, असे पिल्लू त्यांनी सोडून दिले. पवार यांनी अगदी साळसूदपणे असे वक्तव्य केले असेल, असे एखाद्या नवशिक्या राजकारण्याला वाटेल. पण, पवारांनी यातून आपणास काय साधायचे आहे, तेच दाखवून दिले. पवार यांच्या या वक्तव्यावर समाजमाध्यमांसह सर्वत्र चर्चा सुरू झाल्यानंतर आणि या ‘जाणत्या राजा’चा निषेध होऊ लागल्यानंतर, आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असल्याची सारवासारव करून स्पष्टीकरणे देत बसण्याची पाळी त्यांच्यावर ओढवली. ‘पगडी आणि पागोटे’ असा वाद निर्माण करण्याचा पवार यांचा हेतू काय होता? आता पवार, “कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, पुण्याबद्दल मला अभिमान आहे,” वगैरे खुलासे करीत बसले आहेत. पण, हा मुरलेला ‘जाणता राजा’ चुकून असे भाष्य करील यावर कोणाचाही विश्वास बसणे कठीण आहे.

 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तर नरेंद्र मोदी यांच्याशी उभा दावा असल्यासारखे वागत आहेत. प्रशासकीय अधिकारी सहकार्य करीत नसल्याबद्दल केजरीवाल आणि कंपनीने गेल्या काही दिवसांपासून आंदोलन पुकारले आहे. दिल्लीच्या नायब राज्यपालांना हाताशी धरून केंद्र सरकार आमच्या सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा त्यांचा आरोप आहे. दरम्यान, भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या संघटनेने, आम्ही संपावर नसल्याचा खुलासा केला आहे. आता केजरीवाल यांच्या मदतीला चार राज्यांचे मुख्यमंत्री धावले आहेत. दिल्लीतील या पेचावर तोडगा काढावा, अशी विनंती त्यांनी पंतप्रधानांना केली आहे. मोदी यांची भेट घेणाऱ्या या मुख्यमंत्र्यांमध्ये ममता बॅनर्जी, एच. डी. कुमारस्वामी, चंद्राबाबू नायडू आणि पिनराई विजयन यांचा समावेश होता. भाजप विरोधात महाआघाडी निर्माण करण्यासाठी ही सर्व मंडळी कार्यरत आहेत. ते पाहता त्यांना केजरीवाल यांचा पुळका का आला? याची कल्पना यावी.

 

वर उल्लेखित घटना लक्षात घेता, मोदी सरकारची बदनामी करण्याचा, देशातील सामाजिक सलोखा बिघडविण्याचा, कोणत्याही चांगल्या उपक्रमास मोडता घालण्याचा प्रयत्न देशातील काही नतद्रष्ट मंडळींनी कसा चालविला आहे, याची कल्पना यावी!

 
 
9869020732
@@AUTHORINFO_V1@@