अमरावतीतील रेल्वे वॅगन ‍दुरुस्ती वर्कशॉप सुरू करण्याच्या कार्याला गती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
नवी दिल्ली : अमरावतीमधील बडनेरा येथे प्रस्तावित असलेल्या रेल्वे वॅगन दुरुस्ती वर्कशॉप सुरू करण्याच्या कार्याला गती मिळणार असल्याची माहिती अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी दिली.
 
येथील परिवहन भवनात आज विदर्भातील रखडलेल्या कामांची आढावा बैठक केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस रेल्वेमंत्री पियुष गोयल, केंद्रीय सरंक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, आमदार सुनिल देशमुख तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
बडनेरा येथील रेल्वे वॅगन दुरुस्ती वर्कशॉप उभारण्याबाबतचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आलेला आहे. या ठिकाणच्या सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) ला मंजुरी मिळाली असून प्रत्यक्षात कामाला गती मिळावी, यासंदर्भात आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. लवकरच रेल्वे वॅगन दुरुस्ती वर्कशॉपचे काम सुरू करण्यात येईल, असे आश्वसन रेल्वेमंत्री गोयल यांनी या बैठकीत दिले.
 
 
अमरावतीतील मिसाईल कारखान्याची कंपाऊंड वॉल लवकर उभारणार
 
संरक्षण विभागातर्फे अमरावती जिल्ह्यातील मिसाईल कारखान्याची कंपाऊंड वॉल लवकरच उभारण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी आज दिले. आज केंद्रीय परिवहनमंत्री यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत अमरावती येथील प्रस्तावित मिसाईल कारखान्याची कंपाऊंड वॉल लवकर उभारण्याविषयी बैठकीत निश्चित झाले.
 
या भागात हा संरक्षण विषयक कारखाना असल्यामुळे या प्रकल्पासाठी कौशल्य आधारित मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे कौशल्य विकासाची काम तातडीने सुरू करण्याचेही बैठकीत निश्चित करण्यात आले. या कारखान्यातून कमी अंतरावरुन मारा करू शकणा-या क्षेपणास्त्रांची निर्मिती होणार आहे. या प्रकल्पामुळे औद्योगिक वसाहतीसह जिल्ह्याचा कायापालटास मदत होईल.
 
 
नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेले काम लवकर सुरू करा : गडकरी
 
नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील कामठी येथील लष्करी छावणी परिसरातील रखडलेले काम लवकर सुरू करण्याचे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज दिले.
नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरू असून कामठी येथील लष्करी छावणी परिसरातून हा महामार्ग जातो. हा परिसर संरक्षण विभागाच्या अंतर्गत येतो. या परिसरातून जाणा-या राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडल्यामुळे अनेक दुर्घटना या ठिकाणी होत आहेत. पुढील काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी या परिसरातील काम सुरू व्हावे, याबाबत सविस्तर चर्चा झाली. बैठकीअंती कामठीतील लष्करी छावणी परिसरातील काम सुरू करण्याचे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री यांनी संबधितांना दिले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@