स्थानिक बीजसंवर्धन: एक लोकचळवळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2018
Total Views |


 

 महाराष्ट्र हा कृषिजैवविविधतेने समृद्ध असून, विविध पिके आणि त्यामधील वाणांची विविधता ही फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांत स्थानिक ज्ञान, त्याचे उपयोग माहिती असणार्‍या खर्‍याखुर्‍या संशोधाकांनी आजही हा अमूल्य ठेवा जतन व संवर्धन करून ठेवला आहे.
 
कृषिजैवविविधतेचे जतन करणे ही काळाची गरज बनली आहे, कारण अन्नसुरक्षा, पोषणसुरक्षा आणि शाश्वत जीवनमान हे आजचे कळीचे मुद्दे आहेत. वातावरण बदलाच्या परिस्थितीत तग धरणारी आणि पोषणयुक्त अन्न व चारा देणारी पिके व त्यांचे वाण हेच भविष्यकाळातील अन्न असणार आहे.  हेच खरे जनुकांचे वारसदार म्हटले तर वावगे ठरणार नाही, कारण यांनी कोणत्याही आर्थिक मोबदल्याशिवाय हा वारसा जिवंत ठेवला आहे.

राहीबाई पोपेरे : या अकोले तालुक्यातील कोंभालणे या दुर्गम आदिवासी गावातील महादेव कोळी समाजातील आजी. शाळेची पायरी न चढलेली, पण आज संपूर्ण महाराष्ट्रला ‘बीजमाता‘ म्हणून सर्वपरिचित असलेली. आज भात, वाल, घेवडा, भाजीपाला पिके, औषधी वनस्पती यांच्या गावरान वाणांचा मोठा खजिना त्यांच्याकडे आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या प्रत्येक वाणाची कुंडली तोंडपाठ! स्थानिक नाव, जमीन प्रकार, उपयोग, नावामागचे स्थानिक ज्ञान इत्यादी. आजपर्यंत विविध पिकांच्या अनेक जाती जतन केल्या आहेत. त्याचबरोबर स्थानिक बियाणे साठवणूक पद्धती, स्थानिक बियाणे प्रक्रिया पद्धती, स्थानिक वनस्पतींचा वापर करून, पिकावरील रोग व कीड नियंत्रण अशा अनेक पद्धतींचा वापर करून, लोकांना त्याबाबतचे प्रशिक्षण देऊन, कळसूबाई शिखराच्या परिसरातील जैवविविधता जतन व संवर्धित केली आहे. त्यांनी ‘कळसूबाई परिसर बियाणे संवर्धन समिती’ स्थापन केली असून, त्यामार्फत भात, भाजीपाला पिकांच्या विविध जातींचे शुद्ध बियाणे जतन केले जाते. या भागात परसबागांमध्ये लावण्यासाठी भाजीपाला बियाणे संच उपलब्ध करून दिले आहेत.

सुनील कामडी व मावंजी पवार :

हे जव्हार तालुक्यातील होतकरू तरुण. मावंजी हा कसाबसा नववीपर्यंत शिकलेला, पण आज विविध पिकांचे ४५ च्या वर दुर्मीळ वाण तो संवर्धित करीत आहे. एवढेच नाही, तर त्याने भाताच्या ‘साधना’, ‘कीर्ती’ आणि ‘कमल’ अशा तीन जाती निवड पद्धतीने विकसित केल्या आहेत. सुनील कामडी हा असाच उत्साही आणि स्थानिक परिस्थितीचे ज्ञान व रुची असलेला तरुण. त्यानेसुद्धा ‘अश्विनी’ नावाची भाताची जात तयार केली आहे. या दोघांना भारत सरकारने ‘जीनोम सेव्हीअर’ पुरस्कार देऊन गौरवले आहे. जव्हारमधील बियाणे संवर्धक गट विविध पिकांच्या तीनशेच्या वर जाती संवर्धन करीत आहे. त्या गटालासुद्धा ‘प्लान्ट जीनोम सेव्हीअर कम्युनिटी पुरस्कार’ देऊन गौरवले आहे.

तुकाराम दिवटे बाबा :

जुन्नर तालुक्यातील दुर्गम अशा चावंड किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले कुकडेश्वर हे शेवटचे गाव. प्रचंड पाऊस, चहुबाजूंनी डोंगर आणि जैवविविधतेचे भांडार असा हा स्वर्ग आहे. दिवटे बाबा हे एक स्थानिक परिस्थितीची पुरेपूर जाण असलेले प्रगतिशील शेतकरी. आंबेमोहर, काळभात, कोळबा, रायभोग हे भाताचे जुने वाण; नाचणी, वाल या पिकांची विविधता जतन केली आहे. ७० च्या वर रानभाज्यांची इथ्यंभूत माहिती त्यांना आहे. (आढळ, अन्न म्हणून उपयोगी भाग, बनवण्याची पद्धती, औषधी उपयोग इ.) आज तेथे ‘कुकडेश्वर परिसर बियाणे संवर्धन गट’ असून, उत्तम प्रकारचे भात व स्थानिक भाजीपाला पिकांचे बियाणे उत्पादन करून, परिसरात वाढवत आहेत.

चिन्ना दुर्वा : एटापल्ली या गडचिरोली जिल्ह्यातल्या अतिदुर्गम तालुक्यातील हरहुन्नरी व्यक्ती. आधुनिक जगापासून अतिदूर असूनही निसर्ग केंद्रित जगणे आणि त्यातून विकासाच्या संधीचा शोध घेण्याची आवड त्यांना आहे. ‘फिटरीस’, ‘गोदल’, ‘लुचई’ या भात जाती, तसेच स्थानिक मका, हुलगा, कंदांच्या विविध प्रकारांचे त्या संवर्धन करत आहेत. आज तेथे बियाणे संवर्धक गट तयार झाला असून, एटापल्ली व भामरागड तालुक्यातील भाताच्या ५७ जाती, वालाच्या १५ जाती, १५ प्रकारचे कंद, भाजीपाला पिके यांचे संवर्धन सुरू असून, खरीप हंगामात या सर्व जाती शेतांमध्ये लावल्या जातात. त्यामधून उत्पादन, वातावरणात तग धरण्याची क्षमता, चारा उत्पादन इ. चा विचार करून, वाणांची निवड केली जाते व ती बियाणी उत्पादनास घेतली जातात आणि उर्वरित वाण संवर्धन केंद्राच्या माध्यमातून संवर्धित केले जातात.

ठमोचडा पावरा आणि सुभाष पावरा : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील शेतकरी. यांची शेती म्हणजे सातपुडा पर्वत रांगाचा पठारी भाग आणि उतार यांवर आहे. मका आणि ज्वारी इथली मुख्य पिके. पावरा भाषेत मका पिकाला ‘मुकाइ’ म्हटले जाते. लाल मका, पिवळा मका, केशरी, सफेद आणि ज्वारी च्या पिवळी, लाल, सफेद, निळी, राखाडी अशी विविधता, चक्री भोपळा ही गर्द लालसर तांबूस रंगाची येथील वैशिष्ट्यपूर्ण भोपळ्याची जात आहे, जी चवीस गोड असून, वर्षभर साठवून ठेवता येते. सुभाष पावरा, मोचडा पावरा यांनी बियाणे बँक सुरू केली आहे. या गटात दोनशेच्या वर शेतकरी असून, निवडक जातींचे बियाणे उत्पादन सुरू केले आहे. टोकन आणि सरी पद्धतीने लागवड, सेंद्रिय निविष्ठा तयार करून त्याचा वापर आणि हे सर्व सातपुड्यातील विविध गावांत प्रशिक्षण देत आहेत.

कुंभार गुरुजी :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील उच्च पदवीधर पण शेतीची अत्यंत आवड असलेले कुंभार गुरूजी कोकणातील दुर्मीळ भात जातींचे संवर्धन व बियाणे उत्पादन करतात.त्यामध्ये बेळा, येलकट, सोरटी, वरंगल या दुर्मीळ जाती, तसेच चवळी, जंगली कंद, लांब भेंडी असे कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण वाण जतन करून, सेंद्रिय शेती उत्पादक गट तयार करून, ते त्याचं विक्री आणि व्यवस्थापन करतात. गांडूळ खत, देशी गाय पालन, भाजीपाला पिकांच्या विविध जातींचे बियाणे करून त्याच्या कुडाळ आणि आजूबाजूच्या भागात प्रचार आणि प्रसाराचे काम त्यांनी हाती घेतले आहे.

असे अनेक दिग्गज शेतकरी संशोधक महाराष्ट्रातील कृषिजैवविविधता संवर्धनाचे काम कोणत्याही मोबदल्याशिवाय करीत आहेत, त्यामध्ये दादाजी खोब्रागडे (कचढ भात जातीचे जनक),रमेश साकरकर (धामणगाव),वसंत फुटाणे (वर्धा),सुभाष शर्मा(यवतमाळ) यांचा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल.

‘बायफ’च्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून अशा जनुकांच्या वारसदारांना बरोबर घेऊन, विभागवार पाहणी, स्थानिक ज्ञानाचे संकलन, त्या वाणांमधील गुणवैशिष्ट्यांचा अभ्यास, शुद्धता, इ. करून, बियाणे उत्पादन व बियाणे बँकाची सुरुवात करून तसंच सहभागी पद्धतीने बियाणे निवड करून, लोकचळवळ उभी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचबरोबर लोकपंचायत (संगमनेर), ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ (भंडारा), संस्कृतिसंवर्धन मंडळ(नांदेड), शेती परिवार कल्याण संस्था (आटपाटी-सांगली), , कण्हेरी मठ (कोल्हापूर), सह्याद्री स्कूल(राजगुरुनगर), पाणीपंचायत (पुणे), सुरक्षित अन्न चळवळ अशा अनेक संस्थांनी आपल्या भागातील अमूल्य अशा पीकवाणांचे संवर्धन करून, पुढील वाटचाल करीत आहेत. नागपूर बीजोत्सव, भीमाशंकर बीजोत्सव, भीमथडी यात्रा, असे स्थानिक पातळीवर जाणीव जागृती कार्यक्रम सुरू झाले आहेत, ज्यायोगे शहरी ग्राहक आणि ग्रामीण उत्पादक एकमेकांशी संवाद साधू लागले आहेत आणि ‘अन्न हेच औषध’ ही संकल्पना पुन्हा नव्याने रुजत आहे. स्थानिक, पारंपारिक वाण संवर्धन आणि उत्पादनाच्या निमिताने शहर आणि ग्रामीण, आदिवासी भाग यांच्यातील दरी कमी होत आहे. शहरी समाज आज स्थानिक शाहणपण आणि पारंपरिक ज्ञान जाणून घेण्यात रस घेत आहे .

नाचणी, वरई, सावा, कांग, हरिक, मोरबंटी ही भरड धान्ये पोषण समृद्ध तर आहेतच, त्याचबरोबर वातावरण बदलाच्या परिस्थितीत रोग व कीडीस काटक, कमी पाण्यात येणारी व अन्नसुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. म्हणून त्यांना जागतिक अन्न संघटनेने ‘भविष्य काळातील अन्न’ असे संबोधले आहे. ओलाव्यावर येणार्‍या पिकांमध्ये मसूर, वाल, मटकी, हुलगा, चवळी, हरभरा, लाखोळी इत्यादी पिके महत्वाची आहेत. भारत सरकारने आज जैवविविधता संवर्धनासाठी विविध कायदे केले आहेत, त्यामध्ये जैवविधता कायदा, स्थानिक पीकजातिसंवर्धन आणि शेतकरी हक्क, ज्यांमध्ये स्थानिक समुदयाचा जैवविविधतेवरील हक्क मान्य केला आहे, पण आता गरज आहे ती जैवविविधता संवर्धनातून अन्न व पोषण सुरक्षा आणि जीवनमान उचावाण्याची! त्यामध्ये स्थानिक पातळीवर बियाणे संवर्धक शेतकरी आणि गट ह्यांना कायम स्वरूपी संवर्धन करण्यासाठी मदत करणे, बियाणे बँका तयार करून स्थानिक पातळीवर देवाण घेवाण करणे, promising पीक वाणांचे बियाणे उत्पादनास मान्यता देऊन, स्थानिक पातळीवर प्रचार व प्रसार करणे अत्यंत आवश्यक आहे.

बियाणे साठवणुकीच्या आगळ्यावेगळ्या पद्धती

बियाणे व धान्य साठवणूक पद्धतीमध्ये पिकानुसार आणि वातावरणानुसार विविध पद्धती अस्तित्वात आहेत, गडचिरोली जिल्ह्यात भाताच्या पेंढ्यापासून बनवलेल्या गोलाकार ढोलीमध्ये बियाणे साठवले जाते, त्याला ‘वेठीया’ म्हणतात. कोकणात त्यासाठी बांबूच्या ‘कणग्या’ वापरल्या जातात. अकोले तालुक्यात त्यासाठी घराच्या भिंतीमधेच कोठार केले जाते त्याला ‘बलद’ म्हणतात. नाचणी, वरईचे बियाणे ठेवण्यासाठी ‘पेटारा’ झाडाच्या पानापासून उभट आकाराची पेटी बनवली जाते आणि त्यामध्ये त्याच्या भूशांसहित बियाणे साठवले जाते. उडीद, मूग, तूर, मटकी, वाल, घेवडा इ. कडधान्ये लाकडाच्या राखेत घालून, मातीच्या मडक्यात ठेवली जातात. नंदुरबार जिल्ह्यात मका पिकाची चांगली कणसे काढून, तशीच टांगून ठेवली जातात व पावसाळ्याच्या वेळी पेरणीसाठी वापरली जातात.

संजय पाटील

@@AUTHORINFO_V1@@