प्रणवदांच्या भाषणाचा परामर्श

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

माजी राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी, संघाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आले आणि देशभर हलकल्लोळ उडाला. त्यावर खूप काही लिहिले, बोलले गेले. पण प्रणवदा संघाच्या मंचावर जे बोलले, त्यावर फार काही चर्चा झाल्याचे दिसत नाही. दुर्दैवाने भारतातील वैचारिक क्षेत्राला याची काही गरजच वाटली नाही. त्याला केवळ आणि केवळ राजकारणातच रस आहे. देशात घडणारी प्रत्येक गोष्ट राजकारणाच्याच चष्म्यातून बघण्याची सवय आहे. प्रणवदांनी आपले भाषण एका पुस्तिकेच्या रूपात सर्वांना उपलब्ध करून दिले आहे. भाषणाची सुरवात करताना प्रणवदा म्हणाले- मी इथे, भारताच्या संदर्भात राष्ट्र, राष्ट्रवाद आणि देशभक्ती या संकल्पनांबाबत माझे विचार मांडण्यासाठी आलो आहे. या तीनही संकल्पना परस्परांत इतक्या मिसळलेल्या आहेत की, प्रत्येकावर स्वतंत्र चर्चा करणे कठीण आहे. असे असतानाही प्रणवदांनी या तीनही संकल्पनांवर त्यांचे स्वतंत्र चिंतन स्वयंसेवकांसमोर मांडले. राष्ट्राच्या बाबतीत त्यांनी मांडलेले विचार बव्हंशी सर्वांनाच मान्य होणारे आहे. भारत हे प्राचीन राष्ट्र आहे, हे प्रणवदांना मान्य आहे. त्याचा त्यांनी धावता आढावाही आपल्या भाषणात घेतला.
 
 
2500 वर्षांच्या काळातील बदलत्या राजकीय स्थितीचा आणि आक्रमणांचा, पाच हजार वर्षे जुन्या भारतीय संस्कृतीवर काही परिणाम जरी झाला असला, तरी ही संस्कृती नष्ट झाली नाही, असे प्रतिपादन करून प्रणवदांनी गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांच्या ‘भारत तीर्थ’ कवितेचा दाखला दिला. ‘‘संपूर्ण जगातून शेकडो वर्षांत अजेय लाटांच्या रूपात किती प्रकारचे मानवतेचे प्रवाह आले आणि नदीप्रमाणे या विशाल महासागरात मिसळून गेले आणि एकच भारत नावाचे अस्तित्व निर्माण झाले, हे सर्व कुणाच्या प्रेरणेने झाले माहीत नाही.’’ ही गोष्ट खरीच आहे. परंतु, ज्या विशाल महासागराची गोष्ट रवींद्रनाथांनी केली आहे, तो महासागर कुणी निर्माण केला? त्याला जबाबदार कुठला समाज होता? त्यासाठी त्या समाजाने काय आणि कुठले अपार कष्ट घेतले, किती आयुष्ये समर्पित झालीत याची कुठे तरी चर्चा व्हायला नको का? ती कुणी करण्याचा प्रयत्न केला, तर लगेच कम्युनिस्ट मंडळी त्याला जातीयवादी, प्रतिगामी वगैरे म्हणून मोकळी होतात. प्रणवदांनी हा सर्व इतिहास मान्य केला आहे आणि त्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली आहे. कम्युनिस्टांना हा फार मोठा धक्का आहे.
 
राष्ट्रवादाच्या संदर्भात मात्र प्रणवदांचा थोडा गोंधळ उडालेला दिसून येतो. राज्य आणि राष्ट्र या भिन्न संकल्पना आहेत, हे अजूनही बर्‍याच विचारवंतांच्या लक्षात येत नाही. ते या दोन संकल्पनांची सरमिसळ करतात आणि मग वैचारिक गोंधळ निर्माण होतो. सुरेंद्रनाथ बॅनर्जी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उद्धरणांवरून प्रणवदांनी राष्ट्रवाद समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या दोन्ही विचारवंतांमध्ये राष्ट्र आणि राज्य यांबाबत गोंधळ आहे. पंडित नेहरूंच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकातील वाक्य प्रणवदांनी उद्धृत केले आहे. ‘‘माझा ठाम विश्वास आहे की, राष्ट्रवाद हा भारतातील हिंदू, मुस्लिम, शीख आणि इतर गटांच्या वैचारिक मिश्रणातूनच निर्माण होऊ शकतो. याचा अर्थ, कुठल्याही गटाची मूळ संस्कृती नष्ट होईल, असा नाही. उलट, इतर सर्व गोष्टी गौण असलेली एक समान राष्ट्रीय दृष्टी, असा त्याचा अर्थ आहे.’’ जर भारत नावाचे राष्ट्र अतिप्राचीन आहे, तर त्या राष्ट्रावर आधारित राष्ट्रवाद, त्या राष्ट्रावर आक्रमण करणार्‍यांच्या वैचारिक मिश्रणातून कसा काय निर्माण होऊ शकतो. आक्रमकांना आम्ही सामावून घेतले, त्यांच्यातील चांगले विचार स्वीकारले, याचा अर्थ आम्ही आमची तत्त्वे सोडून दिली असा होत नाही.
 
 
राजकीयदृष्ट्या भारत स्वतंत्र होण्यापूर्वीही भारत हे राष्ट्र होते. 1947 साली, भारत नावाचे राज्य स्वतंत्र झाले. राष्ट्र विभाजित झाले नाही. फाळणी राज्याची झाली. पाकिस्तान, भारत, बांगलादेश ही एकाच राष्ट्रामधील राज्ये आहेत, हे मान्य करायला हवे. तसे केले नाही तर मग पुढे सर्व तर्क कोसळून पडतात. स्वतंत्र झाल्यावर पाकिस्तानने आपले स्वत:चे राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. परंतु, त्याला अजून तरी यश आलेले नाही आणि कधी येणारही नाही. कॅनडानिवासी तारक फतेह नावाचे एक प्रसिद्ध लेखक व स्तंभकार आहेत. ते आपली ओळख, मी पाकिस्तानात जन्मलेला भारतीय, अशी करून देतात. याचाच अर्थ ते भारत हे राष्ट्र मानतात आणि पाकिस्तान एक राज्य. ज्या क्षणी पाकिस्तान प्रामाणिकपणे राष्ट्राचा विचार करेल, तेव्हा त्याच्या लक्षात येईल की, आपले राष्ट्र भारतच आहे. बांगलादेश आणि भारताबाबतही हेच सत्य आहे. ही राष्ट्रीय एकात्मता मान्य केल्यामुळेच भारत आणि बांगलादेश या देशांचे राष्ट्रगीत एकाच कवीने रचले तरी त्यावर कुणाचा आक्षेप नाही. त्यामुळे एक भाषा, एक धर्म आणि समान शत्रू यांच्या आधारावर राज्य किंवा देश निर्माण होऊ शकतो, राष्ट्र नाही. युरोप अथवा मध्यपूर्वेत वरील संकल्पनेवर राष्ट्रनिर्माणाचे प्रयत्न झालेत आणि आजही सुरू आहेत, परंतु त्यांना यश मिळताना दिसत नाही. त्याचेही हेच कारण आहे. कम्युनिस्ट इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या ‘देशभक्ती विरुद्ध कडवी देशभक्ती’ या निबंधाचाही प्रणवदांनी उल्लेख केला आहे. गुहा हे कम्युनिस्ट असल्याने, त्यांना फक्त स्वातंत्र्यानंतरचा भारत, त्याचे संविधान एवढेच मान्य आहे. त्यांच्या मते, या संविधानातूनच राष्ट्रवाद प्रवाहित होते.
 
 
संविधानावरच राष्ट्रवादाची उभारणी झाली पाहिजे. त्याला ते घटनात्मक देशभक्ती म्हणतात. जो हे संविधान शब्दश: आणि भावश: मानतो तो देशभक्त, अशी त्यांची व्याख्या प्रणवदांनी आपल्या भाषणात वापरली आहे. संविधान हे राज्याने त्याच्या व्यवहारासाठी, प्रशासनासाठी निर्माण केले असते. आपण लोकशाही स्वीकारली असल्यामुळे, निर्वाचित सरकार त्यात वेळोवेळी बदल करीत असतात. 1975 पूर्वी आपला भारत ‘लोकशाही गणराज्य’ होता. नंतर तो ‘लोकशाही, धर्मनिरपेक्ष, समाजवादी गणराज्य’ झाला. काय सांगावे, पुढे याच्यातही बदल होईल. सांगण्याचे तात्पर्य हेच की, देशभक्त बनण्याला कुठल्या संविधानाला प्रमाण मानायचे? जसजसे संविधान बदलत जाईल, तसतशी देशभक्तीची व्याख्या बदलती ठेवायची का? म्हणून देशभक्तीची व्याख्या ठरविताना, संविधानाचा आधार तर घेतलाच पाहिजे, शिवाय अन्य इतरही काही बाबींनाही प्रमाण मानले पाहिजे, तरच देशभक्तीच्या व्याख्येने गोंधळ उडणार नाही. परंतु, गुहांसारख्या कम्युनिस्टांना ते मान्यच नसणार. कॉंग्रेसनेही 1975 सालापासून आपले वैचारिक क्षेत्र कम्युनिस्टांकडे सांभाळण्यास दिल्यामुळे आणि प्रणवदा हे कॉंग्रेसच्या विचारसरणीतच वाढले असल्यामुळे, त्यांनाही रामचंद्र गुहांची देशभक्तीची व्याख्या मान्य असेल तर यात आश्चर्य नाही.
 
राष्ट्र, राज्य, देश, राष्ट्रवाद, देशभक्ती या संकल्पना समजून घेणे सोपे नाही. त्या क्लिष्ट आहेत. प्रणवदांनी मान्य केल्याप्रमाणेच त्या एकमेकांत इतक्या मिसळून गेल्या आहेत की, त्यांचा स्वतंत्र विचार करणे कठीण आहे. त्यामुळे या सर्व संकल्पनांचा समग्रतेने विचार करणेच सयुक्तिक राहील. तसा तो झाला पाहिजे. त्यासाठी समाजात विचारांचे आदानप्रदान झाले पाहिजे. नद्यांच्या संगमाप्रमाणे विचार मिसळले पाहिजेत. हे सर्व सांगणे फार सोपे आहे. परंतु, एखाद्या विशाल नदीत घाण पाण्याचे प्रवाहही जर मिसळत असतील, तर ते रोखण्याचे किंवा किमान ते स्वच्छ करून मिसळतील अशी व्यवस्था करण्याचेही प्रयत्न आवश्यक आहेत. तसे झाले नाही तर नदीचा मूळ प्रवाह प्रदूषित होण्याची शक्यता असते. हे असले प्रवाह रोखण्याचा विचार जर या देशात कुणी करत असेल, तर त्याला जातीयवादी, संकुचित, प्रतिगामी का म्हणून म्हणायचे? उलट, हे घाण पाण्याचे प्रवाह किमान स्वच्छ करण्याच्या कार्यात सर्वांनीच सहकार्य करण्याची गरज आहे. संघाचे तर हे सर्वांनाच आवाहन आहे. त्याला प्रतिसाद देत प्रणवदा पुढे आले, हा शुभशकुन म्हटला पाहिजे. या अशा वैचारिक घुसळणीतूनच भारतरूपी विशाल महासागर अधिकाधिक स्वच्छ, निर्मल, पारदर्शी होईल, यात शंका नाही.
@@AUTHORINFO_V1@@