बिहारमधील जागावाटप ही भाजपाची डोकेदुखी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
 
 
 
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी रालोआतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि अकाली दलाचे नेते प्रकाशिंसग बादल यांच्या भेटी घेतल्या आहेत. अकाली दल आणि भाजपा यांच्यातील संबंध नेहमीच सुरळीत आणि सौहार्दाचे राहिले आहेत. मात्र, तसेच संबंध केंद्रात आणि राज्यात भाजपासोबत सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेसोबत राहिले नाहीत. अर्थात, याला भाजपा नाही तर शिवसेनाच कारणीभूत आहे.
 
 
अमित शाह आता बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयुचे नेते नितीशकुमार यांची भेट घेतील काय, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजपा आणि शिवसेनेचे संबंध जेवढे तणावपूर्ण आहेत, तेवढे सध्या जदयुशी नाहीत. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाला आपल्या मित्रपक्षांना सांभाळणे गरजचे झाले आहे. नितीशकुमार यांचा जदयु हा भाजपाचा शिवसेनेइतकाच जुना मित्रपक्ष आहे.
2009 ची लोकसभा निवडणूक जदयुने भाजपासोबत युती करून लढवली होती. यावेळी राज्यात जदयु मोठ्या भावाच्या, तर भाजपा लहान भावाच्या भूमिकेत होती. त्यामुळे राज्यातील 40 पैकी जदयुने 25 तर भाजपाने 15 जागा लढवल्या. जदयुने 25 पैकी 20, तर भाजपाने 15 पैकी 12 जागा जिंकल्या. म्हणजे लोकसभा निवडणुकीतील युती ही फक्त भाजपाचीच नाही तर जदयुचीही गरज आहे. 2009 मध्ये भाजपा सोबत होती म्हणूनच जदयुला 20 जागा जिंकता आल्या, ही वस्तुस्थिती आहे. 2014 मध्ये भाजपा सोबत नव्हती म्हणून जदयुला 20 वरून दोन जागांवर समाधान मानावे लागले.
2014 ची लोकसभा निवडणूक राज्यात जदयु आणि भाजपाने स्वतंत्रपणे लढवली. याचा फटका भाजपाला नाही तर जदयुलाच बसला. तर बिहारमध्ये प्रथमच स्वबळावर निवडणूक लढवणार्‍या भाजपाने 30 पैकी 22 जागा जिंकत आपली ताकद दाखवून दिली. भाजपाने 10 जागा आपल्या मित्रपक्षांसाठी म्हणजे रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीसाठी तसेच उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक समता पार्टीसाठी सोडल्या होत्या. लोजपाने 7 पैकी 6 जागा तर रालोसपाने 3 पैकी 3 जागा जिंकल्या होत्या.
विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी नितीशकुमार यांनी भ्रष्टाचाराने बरबटलेल्या राजद तसेच कॉंग्रेससोबत महाआघाडी बनवली. यामुळे भाजपाचा पराभव झाला. मात्र, नितीशकुमार यांच्या जदयुला राजदपेक्षा कमी जागा मिळाल्या. नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करून महाआघाडीने ही निवडणूक लढवल्यामुळे राजदने नाइलाजाने नितीशकुमार यांना मुख्यमंत्री बनवले. राजदच्या भ्रष्टाचाराचे ओझे फार काळ आपल्या डोक्यावर वाहून नेणे नितीशकुमार यांना शक्य नव्हते. कारण नितीशकुमार यांची राजकारणातील स्वच्छ प्रतिमा! लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबातील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर आल्यामुळे ही महाआघाडी जास्त काळ टिकू शकली नाही. नितीशकुमार यांनी भ्रष्टाचारशिरोमणी लालूप्रसाद यादव यांच्या राजदशी आघाडी केली तेव्हाच ही आघाडी फार काळ चालणार नाही, हे स्पष्ट झाले होते. उपमुख्यमंत्री असलेल्या तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर, नितीशकुमार यांनी राजदशी असलेली युती तोडण्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि अपेक्षेप्रमाणे भाजपासोबत सरकार बनवले.
आणखी एक राज्य आपल्याकडे आल्याचे समाधान भाजपाला मिळाले असले, तरी आता बिहारमधील जागावाटपाच्या मुद्यावरून भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. कारण आता बिहारमधील रालोआत चार पक्ष झाले आहेत. 2014 मध्ये दोन पक्ष असताना भाजपाने स्वत:कडे 30 जागा ठेवून दोन मित्रपक्षांसाठी 10 जागा सोडल्या होत्या. तिसर्‍या मित्रपक्षाला म्हणजे जदयुला जागा किती आणि कोणत्या द्यायच्या, हा आता भाजपासमोरील कळीचा मुद्दा झाला आहे.
रामविलास पासवान आणि उपेंद्र कुशवाह आपल्या हिश्शाच्या जागा सोडणार नाहीत, हे निश्चित आहे. म्हणजे जदयुसाठी आपल्या 30 जागांमधूनच भाजपाला जागा द्याव्या लागणार आहेत. भाजपाचे सध्या 22 खासदार आहेत, म्हणजे या जागा भाजपा सोडणे शक्य नाही, म्हणजे जदयुला भाजपा जास्तीत जास्त 8 जागा देऊ शकते. 8 जागा जदयु मान्य करेल असे वाटत नाही. सध्या जदयुचे दोन खासदार लोकसभेत आहेत, त्या तुलनेत जदयुला 8 जागा मिळाल्या तरी पुरेशा आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीत आपल्याला 71 जागा मिळाल्या, त्यामुळे आपल्याला किमान 12 जागा मिळाव्या, अशी जदयुची भूमिका आहे.
जदयुची दुसरी महत्त्वाची अट म्हणजे राज्यातील कोणतीही निवडणूक- मग ती लोकसभेची असो की विधानसभेची- नितीशकुमार यांच्या नेतृत्वात लढवली पाहिजे. जागावाटपाचे 2009 चे सूत्र कायम ठेवावे, अशी जदयुची आणखी एक मागणी आहे, जी भाजपाला आता मान्य होऊ शकत नाही. कारण आता महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही भाजपा लहान भावाच्या भूमिकेतून मोठ्या भावाच्या भूमिकेत आली आहे. त्यामुळे आपल्याला मोठ्या भावाची भूमिका मिळावी, ही जदयुची मागणी भाजपाला मान्य करणे कठीण दिसते आहे.
 
 
मुळात नितीशकुमार यांच्या रालोआतील समावेशामुळे उपेंद्र कुशवाह यांचा पक्ष दुखावला गेला आहे. त्यामुळे नितीशकुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवणे कुशवाह यांच्या पक्षाला मान्य नाही. पुढच्या विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार नाही तर उपेंद्र कुशवाह यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर करावे, अशी त्यांच्या पक्षाची मागणी आहे. आपली नाराजी दर्शवण्यासाठी मागील गुरुवारी बिहार प्रदेश भाजपा अध्यक्ष नित्यानंद राय यांनी आयोजित केलेल्या रालोआच्या भोजनबैठकीवर उपेंद्र कुशवाह यांनी बहिष्कार घातला होता.
नितीशकुमार यांनाही याची कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी भाजपावर दबाव वाढवायला सुरुवात केली आहे. नोटबंदीचे समर्थन करणार्‍या नितीशकुमार यांनी आता नोटबंदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे बिहारला विशेष दर्जा मिळावा, अशी मागणी लावून धरली आहे. विशेष राज्याचा दर्जा देता आला असता, तर भाजपाने आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देऊन तेलगू देसम्‌ हा आपला मित्रपक्ष गमावला नसता. बिहारला विशेष दर्जा देण्याची नितीशकुमार यांची मागणी भाजपाने फेटाळली आहे. नितीशकुमार यांना हे माहीत नाही असे नाही, पण जागावाटपात जास्तीत जास्त जागा आपल्याकडे ओढण्यासाठी नितीशकुमार यांचे हे दबावतंत्र आहे.
 
भाजपाला बिहारमध्ये मित्रपक्षांना सांभाळण्यासाठी क्रिकेटसारखा ट्‌वेंटी-ट्‌वेंटीचा सामना खेळावा लागणार असे दिसते. म्हणजे लोकसभेच्या 20 जागा आपल्याकडे ठेवत उर्वरित 20 जागा आपल्या तीन मित्रपक्षांसाठी सोडाव्या लागणार आहेत. म्हणजे लोजपा आणि रालोसपा यांच्या 10 जागा कायम राहून जदयुच्या हिश्श्याला 10 जागा येतील. लोकसभा निवडणुकीत मोठ्या भावाची भूमिका घेऊन राज्यातील विधानसभा निवडणुकीत जदयुला मोठ्या भावाची भूमिका देण्याचा पर्यायही भाजपासमोर आहे. एकंदरीत, बिहारमध्ये मित्रपक्षांना सांभाळून जागावाटप करताना भाजपाला काही त्याग करावा लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
जितनराम मांझी यांनी रालोआ सोडल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकेक मित्रपक्ष भाजपासाठी महत्त्वाचा झाला आहे. आता बिहारमध्ये एकही मित्रपक्ष गमावणे भाजपासाठी अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळेच भाजपाच्या या अडचणीच्या परिस्थितीचा फायदा म्हणा वा गैरफायदा जदयु घेत आहे. त्यामुळे मित्रपक्षांना न दुखावता जागावाटपात भाजपाची प्रतिष्ठा कायम ठेवण्याचे मोठे आव्हान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासमोर आहे.
श्यामकांत जहागीरदार
9881717817
@@AUTHORINFO_V1@@