गरजू आणि दात्यांमधील दानशूर दुवा

    12-Jun-2018   
Total Views |



 

आपल्या पगारातला पै न् पै समाजकार्याला देणारे, इतकंच नव्हे तर सेवानिवृत्तीनंतर आलेले दहा लाख रुपये आणि पुरस्काराचे ३० कोटी रुपयेसुद्धा समाजाच्या विकासासाठी देणारे पालम् कल्याणसुंदरम्. आज त्यांची ‘पालम’ (पूल अथवा दुवा) ही संस्था दाते व गरजवंत यांच्यातल्या दुव्याचे काम करते आहे. त्या दानशूर अवलियाविषयी...
 

दानाची सर्वसंमत व्याख्या म्हणजे आपलं पोट भरल्यावर उर्वरित संपत्तीतील छोटा-मोठा भाग समाजासाठी देणे. या संकल्पनेला पूर्णपणे छेद देत आपल्या ३५ वर्षांच्या नोकरीत दरमहा कमावलेली पै न् पै समाजासाठी देणारा एक देवदूत म्हणजे पालम् कल्याणसुंदरम्. चेन्नईजवळील सैदापेट या भागातल्या या अवलियाने दर महिन्याच्या पगाराबरोबरच निवृत्तीनंतर मिळालेल्या फंडाचे दहा लाख रुपये आणि त्यावरही कडी म्हणजे पुरस्कारांचे ३० कोटी रुपयेही समाजाच्या विनियोगासाठी दिले आहेत. अभिनेता रजनीकांत यांनी तर त्यांना वडील म्हणून दत्तक घेतले असून बिल क्लिटंन यांनाही भारतात आल्यावर त्यांची भेट घेण्याचा मोह आवरला नाही.

 

याचे कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या पगारातला सर्व पैसा दानासाठी देणाऱ्या पालम् यांनी आपल्या उपजीविकेसाठी म्हणजे दोन वेळचे जेवण आणि इतर अल्प गरजांसाठी आयुष्यभर एका हॉटेलात वेटर म्हणून पार्ट-टाइम काम केले, इतकेच नव्हे तर आपल्या मिळकतीला अन्य वाटा फुटायला नकोत म्हणून लग्नही केले नाही. सानेगुरुजींच्या श्यामच्या आईचे मातृत्व आणि कर्णाचे दातृत्व एकवटलेल्या या संताची ही स्फूर्तिदायी कहाणी.

 

तिरुनेलवेल्ली जिल्ह्यातील मेलाकारू वेलांगुलम या छोट्याशा खेड्यात त्यांचं बालपण गेलं. हे गाव जेमतेम ३० उंबऱ्यांचे. वीज नाही, रस्ते नाहीत, शाळा नाही, साधे काडेपेटीचेही दुकान नाही. सगळ्यात जवळची शाळाही १० किमी. दूर. हे जाऊन-येऊनचे २० कि.मी.चे अंतर रोज एकट्याने चालण्याचा त्यांना खूप कंटाळा येई. अशा वेळी एकदा त्यांच्या मनात आले, 'गावातील मुले जर आपल्याबरोबर शाळेत आली तर हा प्रवास हसत खेळत संपेल. बाकीची मुले शाळेत न जाण्याचे कारण होते गरिबी. त्या वेळची महिना ५ रुपये फी देखील कोणाला परवडणारी नव्हती. तेव्हा कल्याणसुंदरम् या ९-१० वर्षांच्या मुलाच्या मनात एक वेगळाच विचार आला आणि त्याने आईकडे त्या मुलांच्या फीच्या पैशासाठी हट्ट धरला. कल्याणसुंदरम् यांचे वडील ते दहा महिन्यांचे असताना निवर्तले होते. त्यामुळे आईचा आणि आजीचा या बापविना लेकरावर भारी जीव. त्या दोघींनी आपल्या मुलाचा हा जगावेगळा हट्ट तर पुरवलाच, शिवाय त्या मुलांच्या युनिफॉर्मची व वह्या-पुस्तकांची सोय केली. कल्याणसुंदरम् यांनी पुढे जो दानाचा इतिहास रचला, त्याचा पाया हा असा रुजला गेला असावा.

 

मात्र यावर त्यांचे म्हणणे, ‘माझ्या त्या कृत्याला स्वार्थाचा वास होता. मात्र दुसऱ्यासाठी काही तरी करण्याची खरी जाणीव मला झाली ती पंतप्रधान पंडित नेहरूंनी भारत-चीन युद्धाच्या वेळी राष्ट्राला उद्देशून घातलेली साद ऐकली तेव्हा.' कल्याणसुंदरम् त्या वेळी कॉलेजात शिकत होते. नेहरूंनी रेडिओवरून संरक्षण निधीसाठी केलेलं आवाहन ऐकल्याबरोबर त्यांनी आपल्या गळ्यातली सोन्याची चेन त्यावेळचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री कामराज यांना नेऊन दिली. एका तरुण मुलाने देशसेवेसाठी उचललेलं हे पाऊल पाहून मुख्यमंत्रीही चकित झाले आणि त्यांनी या देशभक्ताचा खास गौरव केला.

 

बी. ए. नंतर कल्याणसुंदरम् यांना तामिळ साहित्यात एम. ए. करण्याची इच्छा होती, परंतु या विषयासाठी दुसरा विद्यार्थी नसल्याने कॉलेज व्यवस्थापनाने त्यांना अन्य विषय घेण्यास सुचवले, पण त्यांनी मात्र तामिळचा आग्रह सोडला नाही. त्यांच्या या मातृभाषेवरील प्रेमाने एम.टी.टी. कॉलेजचे संस्थापकही प्रभावित झाले आणि त्यांनी या एका मुलासाठी ती सोय उपलब्ध करून दिली. एवढेच नव्हे तर त्यांच्या पुढील शिक्षणाचा खर्चही उचलला. तामिळ साहित्यातील मास्टर्स डिग्रीबरोबर त्यांनी लायब्ररी सायन्समध्ये सुवर्णपदक मिळवले आणि गुरुजनांचा विश्वास सार्थ ठरवला.

 

शिक्षण पूर्ण झाल्यावर कल्याणसुंदरम् यांनी कुमारकारुपा आर्टस् कॉलेजमध्ये सलग ३५ वर्षे ग्रंथपाल अर्थात लायब्ररियन म्हणून नोकरी केली आणि पहिल्या पगारापासून शेवटच्या पगारापर्यंतचा एकूण एक पैसा समाजाच्या सेवेसाठी अर्पण केला. वयाबरोबर त्यांची देण्याची मनोकामना अधिकच तीव्र होत गेली. वडिलोपार्जित घर विकून आलेले पैसे असोत की पगारवाढीमुळे मिळणारी थकबाकी असो किंवा फंडाची एकहाती मिळालेली दहा लाख रुपयांची रक्कम असो, सगळा ओघ गोरगरिबांच्या, अनाथांच्या उद्धाराच्या दिशेने जात राहिला. गरिबांचा त्यांना एवढा कळवळा की त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी ते रेल्वे प्लॅटफॉर्मवर आणि दुकानांच्या पायर्यांवरही झोपलेले आहेत.

 

कल्याणसुंदरम् यांच्या परोपकारी विचारसरणीचा उगम त्यांच्या आईच्या संस्कारात आहे. सुखी होण्यासाठी आईने सांगितलेले तीन नियम त्यांनी हृदयावर कोरून ठेवलेत. 'पहिली गोष्ट म्हणजे कशाचाही लोभ धरू नकोस. दुसरं म्हणजे जे काही तुझ्या हातात आहे, त्याचे दहा समान भाग कर आणि त्यातील एक भाग सत्कार्यासाठी दे आणि आईचं तिसरं सांगणं म्हणजे किमान एका जिवाला आनंद दिल्याशिवाय रात्री झोपू नको.’ त्यांची आई म्हणायची, 'एवढ्या तीन गोष्टी जरी तू आचरणात आणल्यास तरी कोणत्याही परिस्थितीत सुखी राहशील.' आणि खरंच आज जगात कल्याणसुंदरम् यांच्याइतका सुखी व समाधानी माणूस दुसरा कोणी नसेल!

तन्मय टिल्लू

मास मीडिया विषयात पदवी. ५ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत, वृत्तनिवेदक, खाण्यासाठी जगणे आणि विविध प्रांतातील खाद्यसंस्कृती अभ्यासण्यात विशेष आवड. सध्या दै. मुंबई तरुण भारत येथे उपसंपादक...