महाराष्‍ट्रात चंद्रपूर जिल्‍हयाचा आदर्श प्रस्‍थापित करू – सुधीर मुनगंटीवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jun-2018
Total Views |
 
 
 
 

५०  गावांमधील जलशुध्‍दीकरण संयंत्रे देखभाल व दुरूस्‍तीसाठी महिला बचतगटांना हस्‍तांतरीत 


चंद्रपूर : चंद्रपूर तालुक्‍यातील ५०  गावांमध्‍ये जलशुध्‍दीकरण संयंत्र बसविण्‍याची प्रेरणा उथळपेठ या गावातील प्रयोग यशस्‍वी झाल्‍यामुळे मला मिळाली. आता दुस-या टप्‍प्यात वेकोलिच्‍या सीएसआर निधीच्‍या माध्‍यमातुन बल्‍लारपूर शहर व तालुक्‍याच्‍या ग्रामीण भागात 29 ठिकाणी वॉटर एटीएम बसविण्‍यासाठी केंद्रीय कोळसा मंत्र्यांनी मान्‍यता दिली आहे. चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात सुध्‍दा जलशुध्‍दीकरण संयंत्र बसविण्‍यात येतील. यासाठी सरकारचा कोणताही निधी न वापरता हा प्रयोग आम्‍ही राबविणार आहोत. पाण्‍याचा योग्‍य वापर, त्‍याचे योग्‍य व्‍यवस्‍थापन हे कौशल्‍य मातृशक्‍तीला योग्‍य पध्‍दतीने अवगत असल्‍याने महिला बचतगटांना व्‍यवस्‍थापनाचा भार सौपविण्‍यात आला आहे. महिला बचतगटांनी ही जबाबदारी प्रभावीपणे राबवून महाराष्‍ट्रात चंद्रपूर जिल्‍हयाचा आदर्श प्रस्‍थापित करावा असे आवाहन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
 
 
दिनांक १० जून रोजी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्‍कृतीक सभागृहात आयोजित हस्‍तांतरण प्रमाणपत्र प्रदान सोहळयात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर तालुक्‍यातील ५० गावांमध्‍ये भेल व महानिर्मीती कंपनीच्‍या सीएसआर निधीतुन जलशुध्‍दीकरण संयंत्र अर्थात वॉटर एटीएम बसविण्‍यात आले आहेत. ही संयंत्रे देखभाल, दुरूस्‍ती व संचलन यासाठी महिला बचतगटांना हस्‍तांतरीत करण्‍यासाठी या सोहळयाचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी नानाजी शामकुळे, महाराष्‍ट्र वनविकास महामंडळाचे अध्‍यक्ष चंदनसिंह चंदेल, महापौर सौ. अंजली घोटेकर, जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे, जि.प. सभापती ब्रिजभूषण पाझारे, अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी सचिन कलंत्रे, चंद्रपूर महाऔष्‍णीक विद्युत केंद्राचे मुख्‍य अभियंता जयंत बोबडे, चंद्रकांत थोटवे, विकास जयदेव, विनोद बोंदरे, अनंत देवतारे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
 
 
यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार व्‍यक्‍त केले. यावेळी बोलताना ते पुढे म्‍हणाले, महिला बचतगटांना सदर जलशुध्‍दीकरण संयंत्रांच्‍या देखभाल व दुरूस्‍तीच्‍या दृष्‍टीने प्रशिक्षण दिले जाणार आहे. या जलशुध्‍दीकरण संयंत्रांच्‍या माध्‍यमातुन नागरिकांना शुध्‍द पाण्‍यासह पिण्‍यासाठी थंड पाणी देण्‍यात येणार आहे. यादृष्‍टीने संयंत्राला चिलर बसविण्‍यात आल्‍याचे सुध्‍दा ते यावेळी बोलताना म्‍हणाले. चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या सर्वांगिणविकासाचा संकल्‍प आम्‍ही केला आहे. जनता जनार्दनाच्‍या सहकार्याने हा संकल्‍प आम्‍ही निश्‍चीतपणे पूर्णत्‍वास नेऊ असा विश्‍वास त्‍यांनी यावेळी बोलताना व्‍यक्‍त केला. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@