मांगिलालजी बाफना नेत्रपेढीला ‘अंबानी’तर्फे अर्थसाह्य

    11-Jun-2018
Total Views |

हे विश्‍वासाचे प्रतीक : प्रकल्पप्रमुख शरद कोत्तावार

जळगाव :
केशवस्मृती प्रतिष्ठान आणि आर.सी.बाफना फाउंडेशन ट्रस्ट संचालित मरणोत्तर नेत्रदान स्वीकारुन मोफत नेत्ररोपण करुन देणार्‍या मांगिलालजी बाफना नेत्रपेढी आणि चिकित्सालयाचा लौकिक कोणालाही अभिमान वाटावा, असाच आहे. नेत्ररोपण शस्त्रक्रियांसाठी नॅब संस्थेतर्फे विश्‍वविख्यात अंबानी परिवाराच्या ‘रिलायन्स फाउंडेशन’तर्फे वर्षभरापासून सहजस्फूर्त अर्थसाह्य नेत्रपेढीला मिळतेे, ही विश्‍वासाची पावतीच असल्याची भावना नेत्रपेढीचे प्रकल्पप्रमुख शरद कोत्तावार यांनी जागतिक दृष्टीदान दिनाच्यानिमित्ताने ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केली.
 
 
सेवावृत्तीने झपाटलेल्या, निःस्वार्थ संस्थांना समाज एकाकी पडू देत नाही, उलट दिव्याने दिवा पेटवत आसंमत उजळून टाकावे, अशा पद्धतीने वाढते सहकार्य मिळते...हा अनुभव विशेष म्हणता येईल. याबाबतीत ‘शाकाहार सदाचार’ विचाराचे प्रणेते, थोर समाजसेवी दानशूर रतनलालजी बाफना यांनी नेत्रपेढीच्या स्थापनेपासून वेळोवेळी वैद्यकीय अद्ययावत उपकरणांच्या खरेदीसाठी लक्षावधीचे साह्य मांगिलालजी बाफना नेत्रपेढीला केले आहे.
 
 
कीर्तीसुगंधासारखे सेवासुगंधाचेही म्हणता येईल. नेत्ररोपण शस्त्रक्रियांसाठी नॅब संस्थेतर्फे विश्‍वविख्यात अंबानी परिवाराच्या ‘रिलायन्स फाउंडेशन’ तर्फे वर्षभरापासून सहजस्फूर्त अर्थसाह्य नेत्रपेढीला मिळत असते, ही फार मोठी पावतीच आहे. समाज, लोक फार चतुर, हुशार, धोरणी असते. चांगली, सेवाभावी, निःस्वार्थ माणसं असली तर स्वयंस्फूर्त साथ मिळते, याचा अनुभव केशवस्मृती सेवासंस्था समूहातील सर्वांना जो येत आहे ते नेत्रपेढीच्या वाटचालीच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होते.
 
 
नाशिकला १९७० ला जिल्हा शल्यचिकित्सक, नेत्ररोग तज्ञ स्व. डॉ. रामचंद्र भालचंद्र यांच्या सेवाकार्याचे स्मरण करीत आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा दिन राज्य शासनातर्फे ‘जागतिक दृष्टीदान दिवस’ म्हणून साजरा केला जातो. डॉ. रामचंद्र भालचंद्र यांनी अखंड मानवसेवेची भावना आणि कठोर प्रयत्न याद्वारे १९८४ मध्ये नेत्ररोपणाला प्रारंभ केला. ही प्रेरणा या नेत्रपेढीमागे आहे. ‘सर्वेपि सुखिन: संतू...’ या श्‍लोकातील अपेक्षा अर्थात जगाच्या, संपूर्ण सृष्टीच्या निरामय कल्याणाची इच्छा व्यक्त करणारी आपली भारतीय संस्कृती आहे. सर्व संतविचार आणि संत ज्ञानेश्वरांनी सातशे वर्षापूर्वीही मागितलेले ‘पसायदान’ म्हणजे विश्‍वकल्याण, समृद्धीसाठीची आर्त प्रार्थनाच... या भावनेने जळगावातील ज्येष्ठ संघ स्वयंसेवक, थोर समाजसेवी, दूरदर्शी स्व. डॉ.अविनाश आचार्य तसेच विख्यात दानशूर रतनलालजी बाफना आणि सहकार्‍यांनी खान्देशातील ही एकमेव नेत्रपेढी सुरु केली. तिचे सर्वस्पर्शी, व्यापक आणि विश्‍वासपात्र स्वरूप सर्व समाज आज पाहतो आहे. भास्कर मार्केट परिसरातील नेत्रपेढीत दररोज नाममात्र दरात किमान ६० ते ७० जणांची नेत्रतपासणी करुन शस्त्रक्रिया केल्या जातात. गेल्या २ दशकात समाजसेवी संस्था आणि व्यक्तींतर्फे आयोजित शेकडो शिबिरातही नेत्रपेढीने सहभाग घेतला. येथील ४ तज्ज्ञ डॉक्टर्सचे योगदान आणि सेवाभावी विनम्र सहकारी हे यशाचे द्योतक आहे.
 
 
येथे माझ्यासमवेत प्रकल्प उपप्रमुख निवृत्त शिक्षणाधिकारी नीळकंठ गायकवाड तसेच संचालक तुषार तोतला, सिद्धार्थ बाफना, सचिन चोरडिया, अनुया कक्कड, विनोद पाटील आदींचा या कार्यात सहभाग आहे. गेल्या २ दशकात कितीतरी सेवाभावी व्यक्तींनी आपला व्यवसाय-उद्योग समर्थपणे सांभाळत हा जनसेवेचा रथ पुढे नेण्यास आपले योगदान दिले आहे.
नेत्रपेढीचे नेत्रदीपक सेवाकार्य
* आर.सी.बाफना फाउंडेशन ट्रस्ट व आचार्य वैद्यकीय प्रतिष्ठानच्या पुढाकाराने ३ मार्च, १९९७ ला मांगिलालजी बाफना नेत्रपेढीचे कार्य सुरु.
* नेत्ररोपणासाठी ६ मे, २००० रोजी मिळाली मान्यता.
* गतवर्षी वर्षअखेर ३०८ जणांचे मरणोत्तर नेत्रदान, वर्षभरात प्रतिसाद वाढून आतापर्यंत ४३३ व्यक्तींचे नेत्रदान.
* गतवर्षी १९० तर आतापर्यंत २१३ जणांवर नेत्ररोपण शस्त्रक्रिया आणि दृष्टीदान
* शहरी, निमशहरी, ग्रामीण तसेच आदिवासी, दुर्गम भागात आयोजित नेत्रशिबिरात १ लाखावर रुग्णांची नेत्रतपासणी
* ८ हजार ५०० वर नेत्रशस्त्रक्रिया.
* डोळे कुणी कुणाला दिले याबाबत ठेवली जाते गुप्तता.
* संकल्प अर्ज भरला तरच मरणोत्तर नेत्रदान करता येते असे नाही. ते नातलगांच्या पुढाकाराने केव्हाही करता येते. मृत्यूनंतर नेत्रपटल ४ ते ६ तासात काढले जावेत. ४ दिवस नेत्रपेढीत ठेवले जावू शकतात. रोपणासाठी रुग्ण न आल्यास ते पुणे, इंदूर, जालना, हैदराबादपैकी एका ठिकाणी नेत्रपेढीकडे पाठविले जातात.
* नेत्ररोपण करून घेण्यातही उदासिनता... दृष्टीलाभ झाला तर सवलती बंद होतील, या भीतीने अनेकजण करतात टाळाटाळ.