शिलाँगमधील दंगलींचा अन्वयार्थ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 

 
गेल्या पाचपंचवीस वर्षांपासून भारतातील कानाकोपरा कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी खदखदत राहिला आहे. याला उत्तर-पूर्व भागातील राज्ये, ज्यांना प्रेमाने 'सात बहिणी' म्हणतात, त्यासुद्धा आता अपवाद राहिल्या नाही आहेत. देश स्वतंत्र झाला, तेव्हा त्यातील काही भागातील जमातींनी (उदाहरणार्थ नागा, मिझो) स्वतंत्र, सार्वभौम देशासाठी रक्तरंजित लढे लढवले. यात आजही यश आले नसले, तरी त्यातून अलगतेची भावना व्यक्त झाली होती. आजही नागांचे बंड पूर्णपणे शमलेले नाही. आता यात जातीय/धार्मिक दंग्यांची भर पडत आहे. ही खचितच चिंतेची बाब आहे.
 

मेघालयची राजधानी शिलाँग येथे मागच्या आठवड्यात तेथे १८ व्या शतकापासून राहात असलेला शीख समाज व स्थानिक 'खासी' जमातीचे तरुण यांच्यात दंगल पेटली होती. पोलिसांनी जरी योग्य वेळी हस्तक्षेप करून, परिस्थिती नियंत्रणाखाली आणली असली तरी लोकांच्या मनांत राग खदखदत आहे. जोपर्यंत त्या रागाचे विरेचन केले जात नाही, तोपर्यंत तो भाग एखाद्या अशांत ज्वालामुखीसारखा वरून शांत, पण आतून खदखदतच राहिला.

 

असा दबून राहिलेला राग वरवर क्षुद्र दिसणाऱ्या घटनांतून बाहेर येतो व बघता बघता अक्राळविक्राळ रूप धारण करतो. नेमके असेच शिलाँगमध्ये घडले. तेथे एक शीख बस ड्रायव्हर व स्थानिक मुलं यांच्यात बाचाबाची झाली. नंतर मारामारी झाली. यातूनच 'स्थानिक विरुद्ध बाहेरचे' अशा स्वरूपाची दंगल पेटली. अशा दंगली उत्तर-पूर्व भारतात तशा नवीन नाहीत. मेघालय या केंद्रशासित प्रदेशाला १९७२ साली स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. तेव्हापासून तेथे स्थानिक खासी जमात व इतर यांच्यात दंगे सुरू आहेत. या आधीसुद्धा मेघालयात बंगाली समाजाविरुद्ध १९७९ साली तर नेपाळी समाजाविरुद्ध १९८७ साली दंगली झाल्या होत्या. त्यानंतर आता तेथे इ. स. १८६३ सालापासून स्थायिक झालेल्या शीख समाजाविरुद्ध राग बाहेर येत आहे.

 

इंग्रजांनी शिलाँग शहराचा विकास केला व मलमूत्र व्यवस्थापनासाठी पंजाबातून तेथील कनिष्ठ जातीतील मोठा वर्ग शिलाँगला नेला. आजही तो समाज मेघालयात प्रामुख्याने हिच कामं करत आहे. शिलाँग शहरात त्याकाळी या शीखसमजाची जी वसाहत उभारली तिचे नाव आहे 'पंजाबी लेन' किंवा 'हरिजन वसाहत'. आता शीखसमाजाची ही वसाहत तेथील स्थानिक खासी जमातीच्या डोळ्यांत खुपत आहे. काही बातम्यांनुसार तेथील बिल्डर लॉबीला ही मध्यवर्ती जागा हवी असून तेथे भलेथोरले शॉपिंग संकुल बांधण्याचा विचार आहे. तेथील शीखसमाज इंग्रज सरकारने १० डिसेंबर १८६३ रोजी दिलेल्या लेखी हुकूमावर विश्वास ठेवून आहे. या हुकूमानुसार ही जागा शीखसमाजाला कायमस्वरूपी दिलेली आहे. हा एक भाग झाला.

 

दुसरा भाग आर्थिक स्वरूपाचा आहे. भारतातील इतर अनेक राज्यांप्रमाणे मेघालयात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. तेथे रोजगाराच्या संधी अत्यल्प आहेत. याचा राग अल्पसंख्याक समाजावर काढण्यात येतो. आजच्या मेघालयात चटकन डोळ्यांत भरणारा अल्पसंख्याक समाज म्हणजे शीखसमाज. जगभर पसरलेला शीखसमाज अतिशय कष्टाळू असतो. त्यामुळे आर्थिक विकासाच्या संधींचे सोने करण्यात हा समाज जगभर आघाडीवर असतो. मेघालयसुद्धा याला अपवाद नाही. ही सुबत्ता स्थानिकांच्या डोळ्यांना खटकत असते. म्हणून ३१ मे रोजी वर उल्लेख केलेल्या क्षुल्लक कारणावरून भडका उडाला. नंतर दोन्ही समाजातील ज्येष्ठ नेते एकत्र बसले व तात्पुरता का होईना समझोता घडवून आणला. त्यानुसार खासी समाजातील ज्या तरुणांना जबर दुखापत झाली, त्यांच्या उपचारासाठी शीख समाजाने चार हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले.

 

यात तिसरा मुद्दा आहे जो तसा फार महत्त्वाचा आहे. हा मुद्दा आहे वांशिक वेगळेपणाचा व वांशिक श्रेष्ठत्वाचा. वांशिक शास्त्राचे निकष वापरले, तर उत्तर-पूर्व भारतातील लोक इतर भारतीयांपेक्षा खूप वेगळे दिसतात. दाक्षिणात्य समाज उत्तर भारतातील लोकांपेक्षा बराच वेगळा दिसतो. उत्तर-पूर्व भारतातील विद्यार्थी भारतातील अनेक शहरांत शिक्षणासाठी जातात. त्यांना येणारा सार्वत्रिक अनुभव म्हणजे सगळीकडे त्यांना 'चिनी' म्हणून हिणवण्यात येते. त्यांच्या बारीक डोळ्यांची, ताठ केसांची सतत टिंगल केली जाते; त्यांच्याकडे अविश्वासाने बघितले जाते. हे वेगळेपण खाण्यापिण्याच्या सवयींतही दिसून येते. काही वर्षांपूर्वी दिल्लीतील एका प्रख्यात विद्यापीठात घडलेली घटना नमूद करावीशी वाटते. या विद्यापीठात उत्तर-पूर्व भारतातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात असतात. एका सुट्टीच्या दिवशी वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक बेवारस कुत्रा मारून खाल्ला. ही बातमी दोनतीन दिवसांत सर्वत्र पसरली व विद्यापीठाच्या परिसरात तणाव निर्माण झाला. उत्तर-पूर्व भारतातील विद्यार्थी भीतीने गटागटाने फिरू लागले. नंतर तेथील काही उदारमतवादी प्राध्यापकांनी पुढाकार घेऊन, चर्चा घडवून आणली व परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही. थोडक्यात म्हणजे अगदी खाण्यापिण्याच्या सवयीसुद्धा टिंगल करण्यासाठी कच्चा माल पुरवू शकतात. अशा घटनांचा एक प्रकारचा सूड उत्तर-पूर्व भारतात असलेल्या अल्पसंख्यांक समाजावर काढला जातो. ही दंगल त्याचा पुरावा आहे.

 

चौथा मुद्दा म्हणजे शिलाँग शहरात असलेली शीख समाजाची वसाहत आजच खुपायला लागली नसून, यामागे तसा इतिहास आहे. १९८६ साली तेथील आयुक्तांनी शिखांची वसाहत तेथून हटवावी असा आदेश काढला होता, पण याला मेघालय न्यायालयाने स्थगिती दिली. आतासुद्धा तेथे या ना त्या प्रकारे शीख समाजाच्या वसाहतीला गावाबाहेर जागा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इ.स. १८६३ साली जी जागा शहरापासून दूर होती, आज तीच शहराच्या मध्य भागात आलेली असेल. अशा मोक्याच्या जागेवर बिल्डर लॉबीचा डोळा असणे व त्यासाठी त्यांनी शहरातील गुंडांना हाताशी धरणे हा प्रकार आज भारताच्या प्रत्येक शहरात घडत असतो.

 

जे आता शिलाँगमध्ये घडले ते देशाच्या कोणत्याही भागात घडू शकते, नव्हे घडत असते. याचा स्वतंत्र भारतातला पहिला पुरावा म्हणजे १९६९ मध्ये शिवसेनेने मुंबईतील दाक्षिणात्य समाजाविरुद्ध केलेली दंगल. दंगल केल्याने प्रश्न सुटला नाहीच. आजही मुंबईत दाक्षिणात्य समाज भरपूर आहे. त्यानंतर एकविसाव्या शतकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याच मुंबईत बिहारी मजुरांविरुद्ध आंदोलन केले. आज या दोन्ही समाजांतील लोकांची मुंबई शहरात काय अवस्था आहे याची माहिती घेतली, तर मनोरंजक माहिती समोर येईल.

 

या समस्येला आता जागतिक परिमाण प्राप्त झाले आहे. १९९१ साली सुरू झालेल्या जागतिकीकरणापासून जगभरचे मजूर कामाच्या शोधात जगाच्या कानाकोपऱ्यात जात असतात. थोडक्यात म्हणजे जगातील प्रत्येक महत्त्वाच्या शहराच्या मजूर बाजारात बाहेरून आलेले मजूर मोठ्या प्रमाणात आढळतात. येथपर्यंत तक्रार करायला जागा नाही, पण जेव्हा हे बाहेरून आलेले मजूर स्थानिक मजुरांपेक्षा कमी मजुरीत काम करायला तयार होतात, तेव्हा जगभर मालक स्वस्त मजुराला काम देतो. परिणामी स्थानिक मजुराची मजुरी नष्ट होते. म्हणून मग 'आतले विरुद्ध बाहेरचे' असा संघर्ष सुरू होतो. या संदर्भात काही वर्षांपूर्वी प्रकाशित झालेली बातमी आठवते. वाचकांनी अमेरिकेतील एखादे छोटे शहर डोळ्यांसमोर आणावे. तेथे एक भारतीय इंजिनियर बसमधून जेव्हा उतरला, तेव्हा तेथल्या नाक्यावर टाईमपास करत असलेल्या अमेरिकन तरुणांनी त्याला बडव बडव बडवले व हाकलून दिले. त्या अमेरिकन तरुणांचे तर्कशास्त्र अगदी साधे होते. त्यांच्या मते हा भारतीय इंजिनियर येथे आला तो आपली एक नोकरी हिसकावून घेण्यासाठीच. मग त्या भारतीय इंजिनियरला तेथे कशाला टिकू द्यायचे?

 

असा प्रकार थोड्याबहुत प्रमाणात भारतातही होत असतो. मात्र आपल्या देशासारख्या गुंतागुंतीचे धार्मिक, सामाजिक, भाषिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय व वांशिक वास्तव असलेल्या समाजातील प्रश्न मारामाऱ्या करून, दंगली करून समस्या कधीही सुटणार नाहीत. त्यासाठी सतत नवनवीन धोरणं आखावी लागतील. हे जेवढे लवकर लक्षात येईल तेवढे बरे.

९८९२१०३८८०

@@AUTHORINFO_V1@@