नवी मुंबई, ठाणेकर भारनियमनाने हैराण

    01-Jun-2018
Total Views |



ठाणे: महापारेषणच्या कळवा येथील ४००/२०० र्ज्ञीं एकत सब स्टेशनमध्ये गुरुवारी रात्री बिघाड झाल्यामुळे महावितरणला भारनियमन करावे लागले आहे. ठाणे, नवी मुंबई परिसरात महावितरणला भारनियमन करावे लागले आहे. हा बिघाड मोठा असून शनिवारपर्यंत बिघाड दुरुस्त होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कळव्यातील केंद्रातून महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळातील ठाणे मंडळांतर्गत नवपाडा, कोपरी, विटावा, कळवा, मुलुंड पूर्व व पश्‍चिम या परिसरास तर वाशी मंडळांतर्गत वाशी, ऐरोली, घणसोली, रबाळे, ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहत, तुर्भे एमआयडीसी, कोपरखैरणे, बोनकोडे आदी परिसरात वीजपुरवठा होतो.

सध्या या सर्व परिसराची वीज मागणी व पुरवठा यांचा ताळेबंद साधण्याच्या महावितरणमार्फत आटोकाट प्रयत्न सुरू आहे. उन्हाळ्यामुळे विजेची मागणी अधिक असते. त्यामुळे विजेची मागणी वाढल्यास सध्या चालू असलेल्या यंत्रणेवर अधिकचा भार येऊन बिघाड होण्याची शक्यता असते. हा बिघाड होऊ नये यासाठी मागणी व पुरवठा यांचा ताळेबंद साधण्याकरिता महापारेषण व महावितरणच्यावतीने विजेचे नियोजन सुरू आहे. महापारेषण व महावितरणचे अभियंते कर्मचारी रात्रीपासून कार्यरत असून ही तांत्रिक अडचण लवकरात लवकर दुरुस्त होण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती महावितरणच्यावतीने देण्यात आली आहे. ग्राहकांनी विजेचा वापर जपून करावा, तसेच महावितरण व महापारेषणला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

कोनगाव परिसरात

आपत्कालीन भारनियमन

कळवा येथील अति उच्चदाब उपकेंद्रातून कोनगावला वीजपुरवठा करणार्‍या 200 केव्ही टेमघर उपकेंद्राला वीजपुरवठा होतो. सध्या कोनगावला पर्यायी व्यवस्था करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तथापि, विजेची मागणी अधिक वाढल्यास पर्यायी वीजपुरवठा करणार्‍या यंत्रणेवर अधिक भार वाढल्यास या परिसरात आपत्कालीन भारनियमन करावे लागेल. या परिसरातील ग्राहकांनी विजेचा जपून वापर करून महावितरणाला सहकार्य करण्याचे आहवाहन करण्यात आले आहे. महापारेषणच्या कळवा येथील अतिउच्च दाब ४००/२०० केव्ही उपकेंद्रात काल रात्री बिघाड झाल्याने महावितरण कल्याण परिमंडळातील कोनगाव परिसरातील कोनगाव, पिंपळघर, पिंपळास व गोवा ग्रामपंचायत भागावर परिणाम झालेला आहे. मात्र, याचा सगळ्यात जास्त फटका भांडूप परिमंडळातील ठाणे, मुलुंड, कळवा, वाशी, ऐरोली, घणसोली, रबाळे, ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहत, तुर्भे, कोपरखैरणे या परिसरातील नागरी वसाहतीला बसलेला आहे.