प्रणव मुखर्जी आणि संघाचे निमंत्रण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 
 
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी, रा. स्व. संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोप कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून येण्याचे मान्य केल्यानंतर, भारतात जो गदारोळ उसळला आहे, तो अपेक्षितच होता. अपेक्षित या कारणासाठी की, आजही भारताच्या बौद्धिक आणि वैचारिक क्षेत्रात कम्युनिस्ट विचारांचे प्राबल्य आहे आणि या विचारसरणीने भारतात राजकीय व वैचारिक अस्पृश्यता आणली आहे. कम्युनिस्ट विचारसरणी जगाला केवळ दोन भागातच बघते. एक म्हणजे त्यांचे विचार मान्य असणारे (म्हणजे डावे) आणि दुसरे त्यांचे विचार मान्य नसणारे (म्हणजे उजवे). तुम्ही डावे विचार मानत नाहीत म्हणजे तुम्ही उजवे असलेच पाहिजे. मधली स्थिती त्यांना मान्य नाही. ही अलोकतांत्रिक वृत्ती भारताच्या बौद्धिक आणि वैचारिक क्षेत्रात शिरून स्थिर झाल्यामुळे प्रणव मुखर्जींना विरोध होत आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे.
 
 
प्रणव मुखर्जी ज्या कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रपती बनण्याआधी निष्ठावंत कार्यकर्ते होते, त्या पक्षानेही या बाबीला विरोध केला आहे. काहींनी तसे स्पष्ट बोलून दाखविले आहे. काही गोंधळलेले असल्यामुळे त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही. खरेतर, कॉंग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याला संघाच्या मंचावर सन्मानाने बोलाविले जाते, याचे कॉंग्रेसने समाधान मानायला हवे होते. प्रसिद्ध पत्रकार बलबीर पुंज यांनी कॉंग्रेसचे मोठे मार्मिक वर्णन केले आहे. ते म्हणतात- पैशाचा वापर करून सत्ता मिळवणे आणि सत्तेच्या माध्यमातून पुन्हा पैसा कमविणे, हेच कॉंग्रेस करत आला आहे आणि या पक्षाने आपल्या बौद्धिक विभागासाठी कम्युनिस्टांना ‘आऊटसोर्स’ केले आहे. त्यामुळे कॉंग्रेसनेही मुखर्जींच्या निर्णयाला विरोध करणे, काही अनपेक्षित नाही.
 
 
राष्ट्रीय मुद्यांवर विचारांचे आदान-प्रदान झाले पाहिजे. दुसर्‍याचे विचार आपण ऐकले पाहिजे व दुसर्‍यानेही आपले विचार ऐकले पाहिजे, ही भारतीय धारणा आहे. याच्या उलट, कम्युनिस्ट विचार मान्य नाहीत तर त्याला ठार करणे किंवा बौद्धिक वर्तुळातून बहिष्कृत करणे, ही कम्युनिस्टांची धारणा आहे. या असहिष्णू, अलोकतांत्रिक विचारधारेची विषबीजे कम्युनिस्टांनी भारतीय जनमानसात रुजविली आहेत. अशा स्थितीत, प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारणे, हा या लोकांसाठी फार मोठा धक्का आहे. कम्युनिस्टांची राजकीय भूमी वेगाने संकुचित होत असताना, वैचारिक क्षेत्रातही त्यांच्या विषारी विचारधारेच्या उदासीनीकरणाची (न्युट्रलायझेशन) प्रक्रिया सुरू करण्याची क्षमता या घटनेत आहे, असे आम्हाला वाटते.
 
 
संघाच्या व्यासपीठावर विविध विचारधारेच्या लोकांना आमंत्रित करण्याची ही काही पहिली वेळ नाही. मागे एकदा प्रसिद्ध सर्वोदयी विचारक व समाजसेवी डॉ. अभय बंग यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावरूनही महाराष्ट्रातील (पुरोगामी, प्रगतिशील) समाजवादी विश्‍वात प्रचंड खळबळ माजली होती. डॉ. बंग यांनी या कार्यक्रमाला जाऊ नये म्हणून त्यांच्यावर प्रचंड दबाव टाकण्यात आला होता. पुरोगामी व लोकशाही विचारांचे घोर समर्थक डॉ. नरेंद्र दाभोळकर हे त्या काळी ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक होते. या साप्ताहिकातूनही डॉ. बंग यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली होती. या सर्वांना न जुमानता डॉ. बंग संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. डॉ. बंग यांच्या मुलाची प्रतिक्रिया फार बोलकी होती. ते म्हणाले- या सर्वांना डॉ. अभय बंग यांची समाजवादी विचारसरणी माहीत आहे. असे असतानाही संघाने त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले, यात संघाचे मोठेपण आहे. डॉ. अभय बंग यांनी संघाच्या त्या कार्यक्रमात जे भाषण दिले, त्यांनी त्याची लिखित प्रत प्रकाशित करण्यासाठी साधना साप्ताहिकाकडे पाठवून दिली, पण अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे (छाती बडवे) पुरस्कर्ते डॉ. दाभोळकरांनी ते भाषण प्रकाशित केले नाही. म्हणजे डॉ. बंग यांच्याविरोधात राळ उठवायची, पण त्यांचे भाषण मात्र प्रकाशित करायचे नाही. ही इतकी क्षुद्र व संकुचित मानसिकता असलेल्यांनीच आतापर्यंत आपल्या भारतात स्वत:ला उदारवादी, लोकशाहीवादी, प्रगतिशील, पुरोगामी, अभिव्यक्तिस्वातंत्र्यवादी अशी बिरुदे लावून मिरवून घेतले आहे.
 
 
विरोधी विचाराच्या मंचावर जाऊन आपले विचार मांडणे, यात एवढे काय घाबरायचे आहे? ते विचार त्यांना पटतील तर स्वीकारतील अन्यथा नाही स्वीकारणार! संघ विचाराच्या लोकांना याची भीती वाटत नाही. इतरांना ती वाटते. का?
 
तामिळनाडू प्रांतातील उत्तर अर्कोट जिल्ह्याच्या मदपल्ली खेड्यातील ८०च्या दशकातील एक घटना आहे. या शाखेच्या वार्षिक उत्सवाकरिता द्रविड कळघम पक्षाच्या एका स्थानिक नेत्याला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते. त्यांनी निमंत्रण मान्य केले म्हणून सर्वांनाच आश्‍चर्य वाटले. पण याहूनही अधिक आश्‍चर्य म्हणजे, कार्यक्रम संपल्यावर ते गेले आणि मिठाई घेऊन परत आले. सर्वांना मिठाई वाटली व म्हणाले- खरे म्हणजे, काही दिवसांपूर्वी मी ही शाखा बंद करण्याच्या हेतूने इथे आलो होतो. तुम्ही आमच्या गावात शाखा सुरू केली म्हणून द्रविड कळघमचे सर्व कार्यकर्ते चिडले होते. परंतु, मी जेव्हा बघितले की अग्रहरम् (ब्राह्मण) जातीची मुले हरिजन मुलांसोबत मनमोकळेपणाने मिळून-मिसळून खेळत आहेत. त्यांचा उत्साह, आनंद बघून वाटत होते की, ती जणू एकाच परिवारातील मुले आहेत. माझे अवसान पूर्णपणे गळाले. कारण, आमचे संस्थापक ई. व्ही. रामस्वामी नायकर ऊर्फ पेरियार यांनीदेखील अगदी अशाच प्रकारच्या जातिविरहित समाजाची कल्पना केली होती. त्यांचे ते स्वप्न आम्ही द्रविड कळघमचे कार्यकर्ते साकार करू शकलो नाही; परंतु तुम्ही मात्र पेरियार यांच्या स्वप्नपूर्तिकडे शांतपणे जात आहात. म्हणून मी मिठाई आणून वाटली. हे उदाहरण देण्याचे कारण, या कम्युनिस्ट किंवा समाजवादी लोकांना याचीच भीती वाटत असावी. आपण संघाच्या जवळ गेलो तर कदाचित आपणही संघाचेच होऊन जाऊ. बर्फाला उष्णतेची आणि लोण्याला विस्तवाची भीती वाटणारच.
 
 
 
जे कृत्रिम आहे, ते सत्याच्या प्रखर तेजाने नष्ट होणारच. कम्युनिस्टांचे अस्तित्वच मुळी कृत्रिम भेदांच्या आधारावर आहे. मालक-कामगार, शेतकरी-शेतमजूर, गरीब-श्रीमंत, शहरी-ग्रामीण, पुरुष-स्त्री इत्यादी भेद निर्माण करून, त्यांच्यात द्वेष भरून संघर्षाची परिस्थिती निर्माण करायची आणि त्या आगीत आपली, आपल्या विचारांची पोळी भाजून घ्यायची. हेच तर कम्युनिस्टांनी केवळ भारताताच नाही, तर सार्‍या जगात आतापर्यंत केले आहे आणि आजही करत आहेत. कदाचित त्यामुळे ही मंडळी संघाच्या जवळ येत नाहीत आणि कुणी त्यांच्या कार्यक्रमात जाण्याचे ठरविले तर तेही त्यांना मान्य नसते.
संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी स्पष्ट सांगितले आहे की, संघ म्हणजे समाजातले एक संघटन नाही, तर संघाला संपूर्ण समाजाचे संघटन करावयाचे आहे. या प्राचीन देशाच्या भविष्याबाबत जे जे कुणी चिंतन करतात, अशा सर्वांशी जातपात, भाषा, प्रांत, राजकीय विचारधारा, संप्रदाय यांच्या भेदांना बाजूला सारून रा. स्व. संघाचे कार्यकर्ते संपर्कात असतात. त्यांच्याशी या देशाशी संबंधित विषयांवर चर्चा करतात. त्यांची मते जाणून घेतात. त्यांनाही संघ समजून घेता यावा म्हणून संघाच्या विविध कार्यक्रमांचे निमंत्रण देतात. ही पद्धत संघस्थापनेपासून सुरू आहे. तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचा समारोप व विजयादशमीचा उत्सव या कार्यक्रमात विविध विचारांचे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून आले आहेत. त्यांनी आपले विचार स्वयंसेवकांसमोर मांडले आहेत. त्यात संघाला आणि स्वयंसेवकांना काहीही गैर वाटत नाही. दुसर्‍यांच्या विचारांचा आदर करण्याची जी आपली भारतीय परंपरा आहे, संघ तीच पुढे नेत आहे. कम्युनिस्ट विचारसरणीमुळे भारतात जी वैचारिक स्पृश्यास्पृश्यतेची एक कृत्रिम रूढी तयार झाली होती, तीदेखील आता प्रणव मुखर्जी यांच्या निमंत्रण-स्वीकृतीमुळे ढासळून पडते की काय, अशी भीती ज्यांना वाटते, तेच मिळेल तिथे कोल्हेकुई करीत आहेत, दुसरे काय?
@@AUTHORINFO_V1@@