रक्ताच्या किरणोत्सर्जनाची गोष्ट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jun-2018   
Total Views |
 
 
 
 
 
मी वाशीला पोहोचलो तेव्हा दुपारचे बारा वाजले होते. माझ्या गंतव्य स्थानी जात असताना ’आपण आलोय तर खरं, पण या भेटीतून खरंच काही मिळेल का ?’ इतकाच विचार त्या क्षणी तरी माझ्या मनात येत होता. पण या ठिकाणी, म्हणजेच वाशीच्या ’बोर्ड ऑफ़ रेडिएशन ॲड आयसोटोप टेक्नॉलॉजी (BRIT)’ या संस्थेत तेथील वरिष्ठ अभियंता श्री. व्ही.व्ही.एस. प्रसाद यांच्याशी झालेल्या प्रदीर्घ भेटीनंतर विषयाला बरीच स्पष्टता आली आणि मनातील शंकेचं समाधानही झालं.
 
 
या भेटीच्या साधारण आठ-नऊ महिने आधी कॉग्निझंट फाऊंडेशन या संस्थेने जनकल्याण रक्तपेढीला ’रक्त विकिरक’ (blood irradiator) हे उपकरण खरेदी करण्यासाठी मोठी देणगी दिली होती. अर्थात रक्त विकिरकाची आवश्यकता विशद करणारा एक सविस्तर प्रस्ताव आणि संबंधित सर्व महत्वाची कागदपत्रे आमच्याकडुन याआधीच कॉग्निझंटला आम्ही सादर केला होता. या प्रस्तावाबाबत आम्हीही कसुन अभ्यास केला होता आणि कॉग्निझंटनेदेखील याबाबतच्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी वस्तुनिष्ठ पद्धतीने पडताळुन पहात या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. ही आमच्या दृष्टीने खरोखरीच अत्यंत आनंदाची बाब होती. कारण ’रक्त विकिरक’ हे अनोखं उपकरण जनकल्याण रक्तपेढीमध्ये असणं ही आमची मोठीच जमेची बाजु असणार होती. सामान्यत: कुठल्याही एका रुग्णालयाशी संबंधित नसलेल्या आणि विश्वस्त संस्थेव्दारा संचालित (stand alone NGO) रक्तपेढ्यांमध्ये ’रक्त विकिरका’सारखं उपकरण असणं हे तसं दुर्मीळच. या अर्थाने संपूर्ण भारतातला आमचा हा दुसराच ’रक्त विकिरक’ असणार होता. अर्थात हे झालं, त्याच्या उपलब्धतेसंबंधी, पण रुग्णांसाठी पहायचं झालं तरी ही अत्यंत महत्वाची सुविधा आमच्या रक्तपेढीत नव्याने उपलब्ध होत होती.
 
अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रक्तपिशवीला किरणोत्सर्जित करण्याचं काम हा ’रक्त विकिरक’ करतो. म्हणजे असं – काही रुग्णांची प्रतिकारशक्ती अत्यंत कमी असते किंवा उपचारांदरम्यान ती कमी झालेली असते. नवजात बालके, किमोथेरपीचे रुग्ण वगैरे याअंतर्गत येतात. अशा रुग्णांना जर रक्तघटकांची आवश्यकता भासली तर एक धोका संभवतो. रक्तामध्ये असलेल्या पांढऱ्या पेशींमुळे (white blood cells) हा धोका निर्माण होऊ शकतो. कारण आपल्या स्वत:च्या शरीरामध्ये या पांढऱ्या पेशी संरक्षक सैनिकाचे काम करतात. म्हणजेच कुठल्या बाह्य विषाणूंचे आक्रमण शरीरावर झाले तर या आक्रमणाला प्रतिकार करण्यासाठी प्रतिकारकांची (antibodies) फ़ौज उभी करुन या विषाणूला निष्प्रभ करण्याचा प्रयत्न या पांढऱ्या पेशी करत असतात. पण हे झाले ते आपल्या स्वत:च्या शरीरातल्या पांढऱ्या पेशींविषयी. यातली दुसरी बाजु म्हणजे, एखाद्या रुग्णाला दिल्या गेलेल्या रक्तामध्येही या पांढऱ्या पेशींची काही मात्रा असू शकते. या पांढऱ्या पेशी संरक्षक आहेत त्या रक्तदात्यासाठी कारण त्या त्याच्याच शरीरात तयार झालेल्या आहेत. पण रुग्णाच्या शरीरात संक्रमित झाल्यानंतर मात्र त्या संरक्षकाचेच काम करतील असे नाही, तर काही प्रसंगी ’हे शरीर आपले नाही’ हे ओळखून त्या म्हणजे रुग्णाच्या शरीरावर भयानक आक्रमणही करु शकतील. कधी कधी तर हे आक्रमण रुग्णाच्या जीवावरही बेतू शकते. अर्थात त्या पांढऱ्या पेशींची एकूण मात्रा लक्षात घेता हा धोका सार्वत्रिक आहे असे अजिबात नाही. मात्र ज्यांची प्रतिकारशक्ती मुळातच खूप कमी झालेली आहे अशा काही विशेष रुग्णांना हा धोका निश्चितच आहे. या रुग्णांना विकिरण म्हणजेच इरॅडिएट झालेले रक्तघटक दिले गेले तर मात्र हा धोका खात्रीने टळु शकतो. तर अशा रक्तघटकांचे विकिरण करण्याचे काम ’रक्तविकिरक’ हे उपकरण करते. हे काम करण्यासाठी या उपकरणात किरणोत्सारी मूलद्रव्याचा वापर केलेला असतो, किंबहुना हे मूलद्रव्य हाच या उपकरणाचा प्राण असतो. या किरणोत्सारी मूलद्रव्याच्या प्रभावक्षेत्रामध्ये रक्तपिशवी ठराविक वेळासाठी (३ ते ४ मिनिटे) ठेवल्यास त्यातील पांढऱ्या पेशींना निष्प्रभ करण्याचे काम आतील किरणोत्सार करतो आणि रक्तघटक सुरक्षित बनतो.
 
आपल्याकडे हे उपकरण तयार केलं जातं ते भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरप्रणित ’बोर्ड ऑफ़ रेडिएशन ॲड आयसोटोप टेक्नॉलॉजी (BRIT)’ या वाशीमध्ये असलेल्या संस्थेत. याच संस्थेत या उपकरणाची मागणी आम्ही नोंदवली. पण हे उपकरण यायला अपेक्षेपेक्षा बऱ्यापैकी उशीर लागला. हा उशीर का होतो आहे हे समजून घेणे आमच्यासाठी खूप महत्वाचे होते कारण कॉग्निझंट फाउंडेशनने यासाठीचे संपूर्ण अर्थसहाय्य आम्हाला देऊ केले होते. त्यामुळे याबाबतची माहिती योग्य पद्धतीने कॉग्निझंटपर्यंत पोहोचविणे हे आमचे कर्तव्यच होते. ही माहिती घेण्यासाठीच मला वाशीला जाण्याचा योग आला. किरणोत्सारी मूलद्रव्यांसंबंधी बऱ्याच नाविन्यपूर्ण गोष्टी या भेटीत समजल्या. हे उपकरण बनविण्यास होत असलेल्या उशीरामागची कारणमीमांसाही समजली. आजवर हे उपकरण बनविण्यासाठी ’कोबाल्ट ६०’ हे मूलद्रव्य वापरले जात असे. पण ’कोबाल्ट ६०’ हे काही निसर्गात सहज उपलब्ध असलेले मूलद्रव्य नव्हे तर उपलब्ध असलेल्या ’कोबाल्ट ५९’ या मूलद्रव्यापासून अणुभट्ट्यांतील अणुप्रक्रियांदरम्यान ’कोबाल्ट ६०’ हे मूलद्रव्य मिळु शकते आणि अशा पद्धतीने मिळालेल्या ’कोबाल्ट ६०’ पासून ’रक्तविकिरका’सारखे उपकरण बनविण्याचे काम ब्रिट ही संस्था करते. शिवाय हे काम म्हणजे ’ब्रिट’चे मुख्य काम नव्हे तर व्यापक जनहितासाठी अत्यंत वाजवी मूल्य आकारुन केले गेलेले हे एक प्रकारचे सेवाकार्य आहे, हेही या भेटीत लक्षात आले. एक गोष्ट नक्की होती की, ’कोबाल्ट ६०’ सारखा किरणोत्सारी धातू कधी व किती प्रमाणात मिळेल ही ब्रिटच्या दृष्टीने हातात नसलेली गोष्ट होती. आजपर्यंत अनेक ’रक्तविकिरक’ ब्रिटमधून तयार झाले, पण ’कोबाल्ट ६०’ ची इतकी कमतरता यापूर्वी कधी भासली नव्हती आणि त्यामुळेच हे उपकरण बनण्यास विलंब लागत होता. याच भेटीत कच्च्या स्वरुपात मिळालेल्या ’कोबाल्ट ६०’ चा उपयोग प्रत्यक्ष उपकरणात करताना त्याला हवा तसा आकार कसा द्यायचा हेही पहायला मिळाले. हे काम तसे जिकिरीचे आणि कौशल्याचेही. कारण कुठल्याही किरणोत्सारी मूलद्रव्यास आपण स्पर्श करु शकत नाही, इतकेच नाही तर त्याच्या जवळही उभे राहु शकत नाही. म्हणूनच शिशाचा जाड थर दिलेल्या पेट्यांमधून संपूर्णत: स्वयंचलित पुलीजच्या सहाय्याने हे कच्चे मूलद्रव्य एका बंद खोलीत – जिच्या भिंतींची जाडी चार चार फ़ुट आहे – ठेवले जाते आणि बाहेरुन काचेमधून बघून केवळ बाहेर असलेल्या पुलीजच्या सहाय्याने आतले हे धातू उचलणे, तासणे, उपकरणात बसवणे इ. कामे केली जातात. या सर्व गोष्टी मला या भेटीच्या निमित्ताने पाहता आल्या. आम्ही नोंदविलेल्या उपकरणास झालेला विलंब एक प्रकारे आमच्या पथ्यावरच पडला. कारण पुढे ’कोबाल्ट ६०’ हे मूलद्रव्य उपलब्ध होत नाही असे पाहिल्यानंतर ब्रिटने हेच उपकरण ’सिजियम १३७’ हे दुसरे किरणोत्सारी मूलद्रव्य वापरुन तयार केले. ’सिजियम’चे वैशिष्ट्य असे की कोबाल्टपेक्षा त्याचे आयुर्मान जवळपास सहा पटींनी जास्त आहे आणि कदाचित यामुळेच सर्व प्रगत देशांमध्ये ’रक्तविकिरका’साठी ’सिजियम १३७’ हेच मूलद्रव्य वापरले जाते. त्यामुळे स्वाभाविकपणे आम्हाला या विलंबाच्या बदल्या दीर्घायुषी ’रक्तविकिरक’ मिळाला.
 
ब्रिटने ’सिजियम १३७’ वापरुन तयार केलेला हा भारतातील पहिलाच रक्तविकिरक, असे एक वेगळ्या प्रकारचे अव्दितीयत्वही या प्रकल्पाशी जोडले गेले. जानेवारी २०१६ मध्ये हा रक्तविकिरक रक्तपेढीमध्ये बसवला गेला. त्यासाठी पहिल्या मजल्यावरील जागाही आम्हाला विशेषत्वाने तयार कतुन घ्यावी लागली कारण या उपकरणाचे वस्तुमान आहे तीन टन ! इतके वजन पेलण्यासाठीही काही फ़ेरफ़ार आम्हाला करुन घ्यावे लागले. याबरोबरच Automic Energy Regulatory Board या संस्थेचे अधिकारीदेखील ’अशा प्रकल्पासाठी ही जागा योग्य असल्याचे’ प्रमाणित करुन गेले. हे उपकरण बसवले गेले त्यावेळी कॉग्निझंटचेही काही अधिकारी आवर्जून उपस्थित राहिले.
 
यथावकाश प्रशिक्षण, परवाने वगैरे उपचार आटोपले आणि रक्तविकिरणाचे काम खऱ्या अर्थाने नियमितपणे चालु झाले. हे काम चालु झाल्याच्या पहिल्या दिवसापासून थॅलेसेमिया व हिमोफ़िलियाग्रस्त रुग्णांना ही सुविधा पूर्णत: मोफ़त तर अन्य सर्वांसाठीही सरकारी निर्देशांच्या तुलनेत अगदी नगण्य दर ठेवले गेले. स्वाभाविकच अधिकाधिक गरजुंना या सुविधेचा लाभ झाला पाहिजे हा स्वच्छ दृष्टिकोन त्यामागे होता. कॉग्निझंटसारख्या संस्थेचं मोलाचं सहाय्य या प्रकल्पासाठी मिळालंच शिवाय या संपूर्ण प्रस्तावामध्ये एकाही कागदाची (hard copy) देवाणघेवाण झाली नाही हे विशेष, याबरोबरच ही सुविधा याआधीच जिथे उपलब्ध झालेली होती त्या दीनानाथ आणि रुबी हॉस्पिटलच्या रक्तपेढ्यांनी वेळोवेळी दिलेली महत्वाची माहिती, ’सिजियम १३७’ मुळे या प्रकल्पाला आलेले वेगळेपण, ’ब्रिट’ने दिलेले सहकार्य अशा सर्व गोष्टींमुळे हा प्रकल्प अविस्मरणीय ठरला, अव्दितीय ठरला.
 
या प्रकल्पाव्दारे अधिकाधिक गरजुंना रक्तविकिरणाची सुविधा उपलब्ध करवून देऊन सामाजिकतेच्या दृष्टीनेही ’रक्ताचे किरणोत्सर्जन’ अव्दितीय ठरावे, हा आता आमचा प्रयत्न आहे.
 
 
 
- महेंद्र वाघ
 
@@AUTHORINFO_V1@@