Tech भारत : जाणून घ्या डिजिटल मार्केटिंग ट्रेन्डज् विषयी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2018   
Total Views |




डिजिटल मार्केटिंगचे विश्व आज जगावर अधिपत्य गाजवत आहे, याबद्दल आपण सर्वच जाणून आहोत. मार्केटिंग या विषयातील व्याप्ती खूप मोठी आहे, आणि त्यात डिजिटल मार्केटिंगचा आजच्या काळात मोठा वाटा आहे. या डिजिटल मार्केटिंगच्या विश्वात देखील कालानुरूप अनेक बदल घडत आहेत. डिजिटल विश्वात वावरणाऱ्या सर्वांनी याबद्दल जाणून घेतले पाहिजे, तसेच त्यानुसार क्रम ठरवून या बदलांची दखल घेतली पाहिजे.


मोबाईल सर्वप्रथम -


कुठल्याही क्षेत्रात व्यावसायिक दृष्टीकोन ठेवताना त्या-त्या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर भर देणे कधीही फायद्याचे ठरते. डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात काम करत असताना सामान्य युजर कोणते उपकरण सोयीस्करपणे वापरतो ते बघणे आज गरजेचे आहे. आजच्या साधारण १० वर्षांपूर्वी कुठलेही अॅप्लिकेशन विकसित होत असताना कंप्युटर डेस्कटॉपशी जुळणारे म्हणून विचार केला जात असे. मात्र आजचे युग तेवढ्यापुरते मर्यादित राहिले नाही. आज प्रत्येकाच्या खिशात असलेल्या स्मार्ट फोनमुळे एका कंप्युटरएवढी क्षमता निर्माण झाली आहे. त्यामुळे कुठलेही अॅप्लिकेशन विकसित होताना मोबाईलवर ते कसे दिसेल, त्याला कसे जुळेल याचा सर्वात प्रथम विचार होतो.


डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात देखील मोबाईल सर्वप्रथम दृष्टीकोन इथून पुढच्या काळात महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी मोबाईल आधारित कार्यपद्धती विकसित केल्यास भविष्यात याचा नक्कीच मोठा फायदा मिळू शकेल.


व्हिडीओ -


डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात व्हिडीओला अनन्य साधारण महत्व आहे. कुठलीही संकल्पना लेखापेक्षा व्हिडीओद्वारे मोठ्याप्रमाणात टार्गेटींग ग्राहकांना लवकर आकर्षित करते. आजच्या 4G च्या युगात तर व्हिडीओ पाहण्याचे प्रमाण मोठ्यासंख्येत वाढले आहे. 4G मुळे स्ट्रीमिंग सहज झाली आहे, त्याचबरोबर इंटरनेट पॅक देखील विपुल प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे त्याकडे अनेकांचा कल आहे. आणि म्हणूनच वेब सिरीज, वेब अॅडस् मोठ्ठ्याप्रमाणात कमी कालावधीत लोकप्रिय होत आहे. शिवाय या बाबी तुलनेने कमी खर्चिक आणि सहज आहेत, आणि म्हणूनच स्टार्ट अप्स सारखे छोटे उद्योग देखील याचा प्रभावी वापर करू शकतात.

मोठ-मोठे ब्लॉगर आज थेट लिखाणा सोबत व्हिडीओ ब्लॉगला अधिक प्राधान्य देत असतात. त्याचे मोठे कारण आहे, याला मिळणारा प्रतिसाद! व्हिडीओ ब्लॉग फॉलो करण्याचे प्रमाण आज खूप मोठे आहे. त्याचबरोबर आज हॉलीवूड सहित बॉलीवूड आणि मराठी चित्रपट क्षेत्रातही टी. व्ही. मालिका साकारण्यपेक्षा वेब सिरीजला मोठे महत्व दिले जाते. कारण आजचा प्रेक्षकाची वेबवर असलेली उपलब्धता.


व्हॉर्ईस सर्च -


व्हॉर्ईस सर्च ही काही वर्षापासून प्रचलनात आलेली संकल्पना आहे. अॅप्पल सिरी, गूगल असिस्टंट, मायक्रोसॉफ्ट कोर्टाना हे अॅप्स मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहेत. आवाजाद्वारे माहिती घेऊन सर्चिंग तंत्रज्ञान यात विकसित केले आहे. त्यामुळे इंटरनेटवर शोधण्याची प्रक्रिया खूप सोपी झाली आहे, आणि याचा वापर वाढत आहे. या क्षेत्रातील तज्ञांच्या मते २०२० पर्यंत ५० टक्के मोबाईल हे व्हॉर्ईस सर्चिंगवर पूर्णपणे कार्यरत असतील.

व्हॉर्ईस सर्चिंगचे वाढते महत्व लक्षात घेता डिजिटल मार्केटिंगमधील सर्च इंजिन ऑप्टीमायझेशनमध्ये देखील कालानुरूप बदल घडतील, त्यासाठी देखील या क्षेत्रातील मंडळींनी तयार राहिले पाहिजे.


मल्टीमिडिया जोडणी -


डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात वाढत जाणारी साधने बघता एकाच माध्यमप्रकारात याला सीमित ठेवता येणार नाही. आणि म्हणून मल्टीमिडिया जोडणी हा विषय अधोरेखित करावा लागतो. मल्टीमिडिया जोडणी म्हणजे, ऑडीओ, व्हिडिओ, शब्द, चित्र यासर्वांचा एकत्रित वापर होय.

वर नमूद केल्याप्रमाणे आज ब्लॉगिंग हा विषय केवळ शब्दांपुरता मर्यादित राहिलेला नाही. त्यामुळे वाचकांपुढे ब्लॉगिंगची मेजवानी ठेवताना त्यात लिखाणा सहित, विषयाला पूरक व्हिडीओ, ऑडीओ, चित्र (इन्फोग्राफिक्स), तसेच विविध सोशल मिडिया फीड्स दिल्यास त्याला निराळीच चव येते, जी आजच्या वाचकाला वाडणारी असते. शब्दांसोबत यासर्वांची जोडणी तुमच्या लिखाणाला अधिक विश्वासार्ह बनवत असतात. आणि याचा वापर दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. प्रत्येक ब्लॉगिंग साईटवर आज शेअरिंग आयकॉन आहेत. त्याचबरोबर इम्बेडिंगचा पर्याय देखील सगळीकडे उपलब्ध आहे. त्याचा प्रभावी वापर करता आला पाहिजे.
 
- हर्षल कंसारा 
@@AUTHORINFO_V1@@