तू सिर्फ आगे बढ...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2018   
Total Views |




करिअर किंवा वैयक्‍तिक आयुष्यात प्रवास सुरू असताना अशी एक वेळ येते की, आता सगळं काही संपलं असं वाटतं. पण, खरं तर एक मार्ग बंद झाला की, दुसरे अनेक मार्ग उघडतात, फक्त गरज असते ती शोध घेण्याची...

बिहारच्या एका छोट्या गावामध्ये जन्म घेतलेल्या अतुल पासवानने आयटी कंपनी सुरू करून तमाम तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. केवळ भारतामध्येच नव्हे, तर जपानसारख्या प्रगत देशामध्ये जाऊन भारतीय तरुणांच्या कौशल्याला नवीन वाट निर्माण करून देण्यासाठी त्याने पुढाकार घेतला. खरंतर अतुल पासवानने लहानपणापासून डॉक्टर बनण्याचे ध्येय मनाशी बाळगले होते. शालेय शिक्षण संपल्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यानंतर तिथे प्रात्यक्षिक करताना केली जाणारी शरीराची चिरफाड त्याला बघवली नाही. त्यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमाला रामराम करण्याचा निर्णय घेतला. पुढे वैद्यकीय अभ्यासक्रम सोडल्यानंतर दिल्‍लीच्या जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयामध्ये परदेशी भाषा शिकवण्याचा सल्‍ला त्याच्या काही मित्रांनी दिला. परदेशी भाषा शिकल्यानंतर बाहेरच्या देशामध्ये जाऊन इतर अभ्यासक्रम शिकण्याची प्रक्रिया सोपी व्हावी, यासाठी त्यांनी जपानी भाषेमध्ये पदवी घेण्यासाठी प्रवेश घेतला. खरंतर बिहारमध्ये शालेय शिक्षण पूर्ण झालेल्या अतुलला त्यावेळी इंग्रजीची अडचण सतावत होती. इंग्रजीवर त्याचं प्रभुत्व नसल्यामुळे त्याच्या प्रगतीमध्ये अडथळा येत होता. परिणामी, जपानी भाषा शिकणे त्याला अवघड जात होते. त्याची ही भाषेची अडचण त्याच्यासोबत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आली व त्यांनी मित्रत्वाच्या नात्याने अतुलचं इंग्रजी सुधारण्यासाठी मदत केली. या भाषेमुळे कमी होणारा आपला आत्मविश्‍वास आणि भविष्याचा विचार करून हळूहळू अतुल यांनी इंग्रजी सुधारण्यावर भर दिला आणि त्यात ते यशस्वी ठरले. पुढे पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना पदवीच्या शिक्षणाबरोबरच स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी अजून उच्च शिक्षण घ्यायला हवं, याची त्यांना जाणीव झाली. एमबीएच्या शिक्षणासाठी त्याने पाँडिचेरी विद्यापीठात प्रवेश घेतला. एमबीएचं शिक्षण सुरू असताना त्याचा सॉफ्टवेअरशी संबंध आल्यानंतर आयटी क्षेत्राची माहिती मिळाली. अभियांत्रिकीची पदवी असल्याशिवाय या क्षेत्रात जाणे शक्य नव्हते, परंतु अतुलकडे असणारी विदेशी भाषेची पदवी आणि त्यासोबतच असलेल्या एमबीएच्या शिक्षणामुळे त्याला कोणतीच अडचण आली आहे.


पुढे अतुलला जपानमध्ये असलेल्या ’फुजित्सू’ या नावाजलेल्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली. नोकरीमध्ये मन रमल्यानंतर त्याला भारताच्या मोठ्या आयटी कंपन्या केवळ जपानी भाषेचे ज्ञान नसल्यामुळे जपानमध्ये व्यवसाय करू शकत नसल्याची जाणीव होऊ लागली. त्यामुळे भारतीयांच्या प्रगतीमध्ये अडथळा येत असल्याची जाणीव त्यांना झाली. भारताचा सॉफ्टवेअर उद्योग बहुतांश अमेरिका आणि युरोपमध्ये त्यावेळी सुरू होता. कारण, तिथे इंग्रजी भाषेचा वापर केला जात असल्याने एकत्र काम केले जात होते. या काळात अतुलला ही बाब समजली होती की, जपानमधील लोक तसेच कंपन्या विदेशी आयातीला फारसं महत्त्व देत नाहीत. त्यानंतर २००५ च्या शेवटी अतुल यांनी आपली कंपनी ’इंडो सुकूरा’ची स्थापना केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जपानमध्ये अतुल यांचा कोणीच प्रतिस्पर्धी नसल्यामुळे त्यांचा उद्योग सुरू राहिला. २००६ मध्ये त्यांनी भारताची आयटी राजधानी असलेल्या बंगळुरूमध्ये कार्यालय सुरू केले. पण, तिथेही त्यांना जपानी भाषेची अडचण सतावत होती. मात्र, येथेही जपानी भाषेची अडचण होती. मग यावर मात करण्यासाठी त्याने त्याच्या कंपनीतील कर्मचार्‍यांना जपानी भाषेचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. पण, त्यानंतर अतुल यांच्या आयुष्यात एक बॅडपॅच आला २००८ साली एका कंपनीसाठी सॉफ्टवेअर तयार करताना भाषेच्या वैविध्यामुळे ‘इंडो सुकूरा’च्या अभियंत्याकडून चूक झाली. ग्राहकाला हवे तसे सॉफ्टवेअर तयार झाले नसल्यामुळे त्यांना आर्थिक फटका बसला. त्यामुळे त्याच्या या कामगिरीवर नाराज झालेल्या ग्राहकाने न्यायालयात जाण्याची धमकी दिली. त्यानंतर कसेही करून समझोता झाला आणि त्याला त्याचा नफा सोडावा लागला. नैराश्यामध्ये गेलेल्या अतुलने स्वत:ला सावरले. त्यामुळे त्यांनी पुन्हा कामात लक्ष दिले. त्यांच्या मेहनतीला मग यश आलेच. २०११-१२ मध्ये अतुल यांच्या कंपनीने २० कोटी रुपयांची उलाढाल केली. नुकतेच कुठे संघर्षातून बाहेर पडले होते आणि आणखी एका समस्येला त्यांना सामोरे जावे लागले. २०११ मध्ये जपानमध्ये आलेल्या त्सुनामीच्या फटक्याने जपानसह त्यांना हादरवून टाकले. त्यावेळी अतुल बिहारमध्ये त्याच्या गावी आला होता. कारण, काही दिवसांपूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. अतुलला पुन्हा परत जाणे शक्य नव्हते. मात्र, फोनवर अभियंत्याशी आणि ग्राहकांशी तो संपर्क ठेवून होता. तिकडे जपानमध्ये अशी भीती निर्माण झाली होती की, अणुभट्टीतून किरणोत्सर्ग होऊन ते टोकियो शहरात पसरले असते, जिथे त्याचे कार्यालय होते. ते ऐकून त्याच्या आईने त्याला परत जाण्यास विरोध केला. मात्र, आपली जबाबदारी ओळखून त्याने तिचे मन वळवले. भूकंप आणि त्सुनामीने जपानचा विध्वंस झाला होता. मात्र, नंतर स्थिती बदलत गेली. त्याचे बहुतांश अभियंता काम सोडून गेले होते. त्यामुळे जपानी कंपन्यांना ‘इंडो सुकूरा’वर विश्वास राहिला नव्हता. त्याला भीती होती की, ही कंपनी बंद झाली तर त्याचे नुकसान होईल. एकाच कंपनीवर विसंबून राहणे शक्य नव्हते. त्यामुळेच त्याने हेल्थ केअर कंपनीची कन्स्लटन्सी सुरू केली. त्यातून तोे भारतात काम करणार्‍या १५०० जपानी कंपन्यांच्या पन्नास हजार कर्मचार्‍यांना आरोग्य सुविधा पुरवत आहे.



- सोनाली रासकर
@@AUTHORINFO_V1@@