‘पप्पू’पणातून बाहेर पडायचंय ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

ध्यान केल्याने मेंदू तरतरीत, ताजातवाना बनतो हे वैज्ञानिकांना माहीत होतंच, पण ध्यानामुळे मेंदूवरचा करड्या रंगाचा भाग चक्क वाढतो, हे त्यांना नुकतंच एका प्रयोगातून समजलं. अमेरिकेच्या येल विद्यापीठातील मनोविज्ञानाचे शास्त्रज्ञ प्रा. जेरेमी ग्रे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी याविषयी संशोधन केलं. नियमित ध्यान केल्यामुळे मेंदूमधील स्पर्श, दृष्टी, श्रवण इत्यादी जाणिवा म्हणजेच ते ते अवयव अतिशय तल्लख, कार्यक्षम होतात. एकंदरीत सर्वच इंद्रिये अतिशय सक्षम होतात. शरीरात आतूनच एक प्रकारचे निरोगीपण निर्माण होते. त्यामुळे शरीर म्हातारं होण्याची प्रक्रिया, एजिंग प्रोसेस मंदावते. प्रा. जेरेमी ग्रे म्हणतात, ”हे सर्व ठीकच आहे, पण मला सगळ्यात महत्त्वाचं वाटलं ते हे की, नियमित ध्यान करणार्‍यांच्या मेंदूमधला करड्या रंगाचा भाग वाढतो.” हा करड्या रंगाचा भाग म्हणजेच बुद्धी. जेवढा करडा भाग जास्त, तेवढा मनुष्य बुद्धिमान.

साधारण ३०-४० वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याकडे ध्यानधारणा, योग वगैरे गोष्टी निरुपयोगी, कालबाह्य, अवैज्ञानिक समजल्या जात असत. व्यायाम, सूर्यनमस्कार यांची मनसोक्त टिंगल केली जात असे. पाश्चिमात्य शिक्षण आणि मानसिक गुलामगिरी यांचा हा परिणाम होता. मग चित्र हळूहळू बदलू लागलं. असंख्य साधूसंत आणि योगाचार्य यांच्या अथक प्रयत्नांमधून योग, ध्यान इत्यादी गोष्टींना सामाजिक मान्यता मिळू लागली. तरीही मानसिक गुलामगिरीचा पगडा एवढा आहे की, ‘योग’ हा ’योगा’ बनून आणि ‘ध्यान’ हे ‘मेडिटेशन’ बनून पश्चिमेकडून इथे आल्यावरच फॅशनेबल बनलं.

आपल्या मेंदूमध्ये निसर्गाने जी प्रचंड शक्ती भरून ठेवलेली आहे, तिचा आपण वापरच करत नाही. कारण, ती शक्ती सुप्त असल्यामुळे अशी शक्ती आपल्याकडे आहे, हेच आपल्याला माहिती नसतं. आईनस्टाईनसारखे महान वैज्ञानिकसुद्धा या शक्तीमधला जेमतेम तीन टक्के भाग वापरत असतात आणि तेवढ्याने सुद्धा ते ‘महाबुद्धिमान’ म्हणून ओळखले जातात. नियमित ध्यान करण्याने ही सुप्त शक्ती जागृत होते. तशी ती करा आणि देवाच्या देणगीचा लाभ घ्या, असं आपले योगाचार्य सांगत असतात. पण त्यांना कोण विचारतो ? ते बिचारे हिंदू असतात ना ! हीच गोष्ट अमेरिकन विद्यापीठातल्या संशोधकाने सांगितली की, लगेच तिला प्रतिष्ठा आली.


वरील प्रयोगात प्रा. जेरेमी ग्रे यांनी ’बुद्धिस्ट इनसाईट मेडिटेशन’ हा ध्यानप्रकार नियमित करणारे वीस लोक निवडले होते. हे वीस स्त्री - पुरुष संसारी, नोकरीधंदा करणारे, मुलंबाळं असणारे थोडक्यात गृहस्थाश्रमातले सगळे व्याप आणि ताप असणारे असे होते. त्यांच्यावरच्या प्रयोगातून वरील निष्कर्ष हाती आले आहेत. या वैज्ञानिक गटातल्या प्रा. सारा लेझर म्हणतात, ”या विशिष्ट ध्यानप्रकारामुळे मेंदूचा उजवा भाग प्रभावित होतो, असं आम्हाला आढळलं. इतर ध्यानप्रकारांमधून कदाचित मेंदूमधील इतर भाग, इतर केंद्रे प्रभावित होत असतील. त्याचा वेगळा अभ्यास करायला हवा.”

या निमित्ताने अमेरिकन समाजातील काही प्रवाहांची माहिती घेऊया. अमेरिकेत जपानी, कोरियन्स, तैवानी व चिनी लोक मोठ्या प्रमाणावर आहेत. हे सगळे जण अत्यंत अभिमानाने स्वत: ला ‘बौद्धमतानुयायी’ म्हणवतात. दलाई लामांना मानणारे लोकही मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांच्यात समाजातले अतिशय श्रीमंत आणि प्रतिष्ठित लोकही आहेत. उदा. हॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता रिचर्ड गिएर, त्याने तर रीतसर बौद्ध धर्मच स्वीकारला आहे. त्यामुळे ही सर्व मंडळी बौद्ध धर्म, बौद्ध तत्त्वज्ञान, बौद्ध ध्यान-योग इत्यादींबद्दल खूप बोलतात, लिहितात.

हे कळल्यावर आपल्याला आनंदच होतो. कारण, बौद्ध मत म्हणजे आपल्या भारतीय तत्त्वज्ञानाचाच एक भाग, असं आपण मानतो. पण नेमका इथेच जपानी - चिनी यांचा वांधा होतो. कारण, बौद्ध तत्त्वज्ञानाऐवजी भारतीय तत्त्वज्ञान म्हटलं की, शाब्दिक का होईना, भारताचा वरचष्मा होतो. त्यामुळे चिन्या-जपान्यांची वेगळी ओळख निर्माण होत नाही ना ! म्हणजेच बौद्धमताचा चिन्या-जपान्यांचा अभिमान हा आध्यात्मिक कमी आणि सोशिओपोलिटिकल जास्त, असा आहे. बौद्ध तत्त्वज्ञान हे लाभदायक आहे, हे म्हणत असताना, ते लाभदायक आहे. कारण ते आमचं आहे, हा त्यांचा अभिनिवेश जास्त असतो. त्यांच्यापैकी जे लोक खरे आध्यात्मिक असतात, ते मात्र अशा अभिनिवेशाने वागत नाहीत. उदा. एक तैवानी महिला आहेत. बौद्ध तत्त्वज्ञानाच्या गुरू म्हणून त्या अमेरिकेत खूप लोकप्रिय आहेत. त्या अगदी उघडपणे सांगतात की, ”माझं सगळं ज्ञान ही भारतातल्या माझ्या गुरूंची मला देणगी आहे. माझ्याजवळ आज पैसा आणि प्रतिष्ठा आहे. पण माझे गुरू आजही भारतात लौकिकदृष्ट्या भणंगासारखे राहतात.” आपल्याला प्रश्न असा पडतो की, हे चिनी, जपानी, तैवानी जर तिथे जाऊन बौद्ध तत्त्वज्ञान आमचंच म्हणून ’लॉबी’ उभी करतात; तर मग आमचे भारतीय काय करतात ? काहीही करत नाहीत. फक्त पैसा कमावतात, हे या प्रश्नाचं उत्तरं आहे. आपल्या लोकांना स्वत:चा, स्वत:च्या कुटुंबाचा स्वार्थ बरोबर समजतो. पण, एकदा तो साधल्यावर त्यानंतरचे टप्पे म्हणजे सामूहिक स्वार्थ, सामाजिक स्वार्थ, राष्ट्रीय स्वार्थ हे समजतच नाहीत. चिन्या-जपान्यांना स्वार्थाचे हे सगळे टप्पे अचूक समजतात. कारण, मुळातच त्यांची राष्ट्रीयत्वाची जाणीव अतिशय तीव्र आहे.

बरं मग, आध्यात्मिक मंडळी काय करतात ? स्वामी विवेकानंदांनी तिथे भारतीय तत्त्वज्ञानाचा झेंडा फडकवला, त्याला १०० वर्षे होऊन गेली. त्यांच्यानंतर स्वामी योगानंद, ’हरे राम हरे कृष्ण चळवळीचे स्वामी प्रभुपाद, महर्षि महेश योगी व इतर असंख्य साधू-संत अमेरिकेत जाऊन आलेले आहेत. आजही जात-येत असतात. महर्षि महेश योगींचे तर स्वत:चे चॅनेल आहे. मग ’बौद्ध तत्त्वज्ञान आमचंच’ म्हणून चिन्या-जपान्यांनी जशी एक लॉबी उभी केली आहे, तशी यांनी समग्र भारतीय तत्त्वज्ञानाची एक ’लॉबी’ का बरं उभी केली नाही?

कारण, ‘लॉबी’ उभी करणं हा विषयच मुळी राजकीय म्हणजे ‘पोलिटिकली मोटिव्हेटेड’ आहे. वरील मंडळी ही खरीखुरी आध्यात्मिक असल्यामुळे तात्कालिक राजकीय लाभांपेक्षा दीर्घकालीन आध्यात्मिक, सामाजिक परिणामांवर त्यांची नजर आहे. शांतपणे आणि निश्चयाने त्यांचे काम चालू आहे. त्यांच्या कामाचाही फार मोठा परिणाम अमेरिकन समाजावर झालेला आहे, होतो आहे. फक्त त्याचा कुठे गवगवा होत नाही. कारण, अशा निश्चयात्मक कार्यात मसालेदार, चमचमीत काहीच नसतं. त्यामुळे मीडियाला त्यांच्यात काहीच रस नसतो.

थिओडोर रुझवेल्ट आणि टेडी अस्वल


अमेरिकेच्या अडीचशे वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत ४५ राष्ट्राध्यक्ष झाले. त्यापैकी जॉर्ज वॉशिंग्टन, अब्राहम लिंकन, फ्रँकलिन रुझवेल्ट आणि जॉन केनेडी हे चौघे राष्ट्राध्यक्ष कमालीचे लोकप्रिय होते. त्यांच्या लोकप्रियतेची बरोबरी अजून तरी कुणी करू शकलेला नाही.


लोकप्रियतेच्या दुसर्‍या पायरीवर बेंजामिन फ्रँकलिन, वुड्रो विल्सन यांच्यासह थिओडोर रुझवेल्ट हेही एक नाव आहे. तो १९०१ ते १९०९ अशी आठ वर्ष म्हणजेच चार-चार वर्षांच्या दोन टप्प्यात राष्ट्राध्यक्ष होता.

थिओडोर रुझवेल्ट हा उत्तम लेखक होता, निसर्ग अभ्यासक होता, संशोधक होता, शिकारी होता, सेनापती होता, कुशल राजकारणी होता. अशा सगळ्या गुणवत्तेमुळे प्रथम तो न्यूयॉर्क प्रांताचा गव्हर्नर झाला नि यथावकाश राष्ट्राध्यक्ष झाला.

एकदा राष्ट्राध्यक्ष नि त्यांची शिकारपार्टी घोड्यावर स्वार होऊन जंगलात गेली. शिकार्‍यांच्या हाके घालण्याने एक अस्वलांचा कळप उठला, सैरावैरा धावू लागला. राष्ट्राध्यक्षांच्या अचूक नेमबाजीने एक अस्वलीण जमिनीवर कोसळली. तिच्या कुशीतलं पिल्लू प्राणभयाने धावत नेमकं राष्ट्राध्यक्षांच्या धावत्या घोड्यासमोरच आलं. ते गोजिरवाणं पिल्लू बघून थिओडोर रुझवेल्टने बंदूक आवरली नि घोड्यावरून उतरून ते पिल्लू उचलून घेतलं, पाळलं. तेव्हापासून अस्वलाच्या पिल्लांना इंग्रजी भाषेत ’टेडी’ हा नवा शब्द रूढ झाला. थिओडोरचं लघुरूप ‘टेड’ किंवा ‘टेडी’, कॉन्व्हेंट संस्कृतीमुळे हल्ली आपल्याकडे खेळण्यातल्या अस्वलांना ’टेडी बेअर’ हा शब्द रुळावला आहे. त्याचं मूळ हे असं आहे.

अमेरिकेतलं यलोस्टोन नॅशनल पार्क हे जगभरातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान. किंबहुना, राष्ट्रीय उद्यान, अभयारण्य ही संकल्पनाच अमेरिकेने या उद्यानाद्वारे आधुनिक जगात रूढ केली. अमेरिकेच्या वायव्येकडील वायोमिंग, मोन्टाना आणि आयडाहो या तीन प्रांतात पसरलेलं, ८ हजार ९८३ चौरस कि. मी. एवढ्या अवाढव्य क्षेत्रफळाचं यलोस्टोन नॅशनल पार्क, अमेरिकन संसदेने १८७२ साली एका खास ठरावाद्वारे अस्तित्वात आणलं.

प्राणिशास्त्रज्ञांच्या मते, अमेरिकेच्या पश्चिम भागात पूर्वी किमान ५० हजार अस्वलं होती. बेछूट कत्तलीमुळे त्यातली अवघी १२०० शिल्लक राहिल्यामुळे साधारण १९७० सालच्या सुमारास बर्‍याच अस्वलांना यलोस्टोन अभयारण्यात हलवण्यात आलं. त्यांना ’संरक्षित’ म्हणजे नामशेष होण्याचा धोका असलेली म्हणून घोषित करण्यात आलं.

आता ४०-४५ वर्षांनंतर त्यांची संख्या २५०, वरून ६०० पर्यंत गेल्यामुळे संरक्षित यादीतून अस्वलाचे नाव वगळावं, असा विचार चालू आहे. पण, अनेक प्राणितज्ज्ञांचा याला विरोध आहे. कारण, चविष्ट पदार्थ बनविण्यासाठी अस्वलांच्या मांसाला फार मागणी आहे. संरक्षित यादीतून वगळल्यावर लगेच त्यांची कत्तल सुरू व्हायची शक्यता आहे. अस्वलांची संख्या २५० वरून ६०० वर जायला पाच वर्षं लागली. अस्वलाच्या मांसाला चटावलेला माणूस संधी मिळाली तर ४५ मिनिटांतसुद्धा सगळ्यांना ठार मारून मोकळा होईल.



- मल्हार कृष्ण गोखले
@@AUTHORINFO_V1@@