सागरापासून दूर राहण्याचे नागरिकांना आवाहन
मुंबई : केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यानंतर काही दिवसांमध्येच मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे. यापार्श्वभूमीवर राज्य शासनाने उद्यापासून सागरी मासेमारीला बंदी घालण्याचे आदेश दिले असून पुढील दोन महिने नागरिकांनी मच्छीमारांनी सागरी प्रदेशापासून दूर राहणायचे आवाहान राज्य सरकारने केले आहे. तसेच पावसाळ्या दरम्यान नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकारने आवश्यक ते सर्व प्रयत्न केले असले तरी देखील सागरी प्रदेशाजवळील नागरिकांनी आपल्या सुरक्षेसाठी आवश्यक ते सर्व उपाय करून ठेवावेत, असे आवाहन शासनाने केले आहे.
आज राज्य शासनाने याविषयी अधिसूचना जारी केली असून येत्या १ जून ते ३१ जुलैदरम्यान सागरी प्रदेशात मासेमारी करण्यास पूर्णपणे मज्जाव केला असल्याचे जाहीर केले आहे. पावसाळी कालावधीत मासे व अन्य सागरी जीवांच्या प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असते. त्यामुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मत्स्य साठ्याचे जतन व्हावे आणि वादळी हवामानामुळे मच्छिमारांची जीवित व वित्त हानी होऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सरकारने म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील या आदेशाचे पालन करत सागरापासून दूर राहावे, असे आवाहन सरकारने केले आहे.