राजकारणात प्राण ओतला...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2018   
Total Views |

 
 
 
राजकारण म्हटले की पांढरपेशी माणसं नाक मुरडतात. आपल्या आयुष्यात ते शिंतोडे नकोतच, असे म्हणतात. राजकारण्यांपेक्षाही जास्त राजकारण जे स्वत:ला सामान्य (लघु अर्थाने नव्हे, नॉर्मल या अर्थाने) म्हणवून घेतात, तेच करतात. कुटुंबापासून संस्थांपर्यंत राजकारण असतेच. कलेच्या प्रांतात ते नसते का? अगदी वाङ्‌मयीन परिवेषातही राजकारण असतेच. अलीकडे तर खूपच वाढले आहे. काय लिहिलंय् यापेक्षा ते कुणी लिहिलंय्, यावरून त्याचे अंकन केले जाते. लिहिणार्‍याचे आडनाव काय, त्यावरून त्याची जात शोधली जाते आणि मग धर्मापर्यंत पोहोचतात लोक. सार्वजनिक आयुष्याच्या सगळ्याच विधा या राजकारणाच्या मार्गानेच जातात. त्याशिवाय पर्याय नाही. सगळ्या कला समांतर जातात, असे मानले जाते, मात्र चित्रकलेपासून लेखनापर्यंत, गायनापासून अभिनयापर्यंत सार्‍याच कला ज्या एका बिंदूवर छेदतात, तो बिंदू म्हणजे नाटक असतो. आजकाल त्याला चित्रपटही म्हणता येईल. तसेच सार्वजनिक जीवनातील सर्वच अंगे ज्या एका बिंदूला छेदतात ते राजकारण असते. राजकारण्याला जीवनाची सर्वच अंगे आणि भाषा अवगत असल्याच पाहिजे. त्याला माणूस नीट कळला पाहिजे. आपल्या वैयक्तिक अपेक्षांनी आणि विशेषाधिकाराच्या हव्यासाने सामान्य माणसे राजकीय नेत्यांना वेढून टाकतात आणि मग राजकारणाचे गटार करतात. ही माणसं इतकी ढोंगी असतात की, ती राजकारण्यांकडून वाट्‌टेेल ती कामे करवून घेतात अन् त्याचे पाप मात्र त्यांच्याच माथी मारतात. स्वत: वाल्मिकी असल्याचे दाखवीत नेत्यांना वाल्या करतात. कलावंत मात्र निर्मोही, निरपेक्ष असला की तो अढळ आणि अटळ होतो. तो नेहमीच समकालीन असतो. कला तीच उत्तम जी एकाच वेळी काळीज आणि मेंदूवर प्रभाव टाकते. पिढ्या बदलल्या तरी माणसाचे काळीज नाही बदलत अन् मेंदूही... म्हणून या दोन स्थानांवर प्रहार करणारी कला कालातीत ठरते.
 
व्यंग्यचित्रकार प्राण म्हटले तर चटकन् कुणाला आठवतीलच, असे नाही; मात्र चाचा चौधरी, साबू, पिंकी आणि चाचा चौधरींची घरवाली म्हटले की आजच्या प्रौढ पिढीला अन् ज्येष्ठांनाही त्यांचे बालपण नक्कीच आठवेल. ओंजळीत मोगर्‍याचं फूल घ्यावं अन् मग आपला तळवाच मोगरा मोगरा होऊन जावा, ही अनुभूती अशा स्मरणांनी होते. अशी संस्मरणीय स्मरणे सृजनात्मक असतात. काही कलावंतच तो आनंद देण्याच्या पातळीला पोहोचू शकतात. मग त्यात कवी असतात, लेखक असतात, चित्रकार, अभिनेते... असे कुणीही असू शकते. प्राण शर्मा हे त्यातले एक आहेत. त्यांची पात्रे आपले बालपण आणि त्या काळातले निकोप वातावरण जिवंत करतात. बदमाशांना धडा शिकविणारे चाचा चौधरी आणि गुरू ग्रहावरून आलेला मानव साबू, त्यांचा कुत्रा... असे सगळेच जिवंत आणि जातिवंत आहेत. तो काळ निकोप होता, कारण त्या काळात माणसं माणसांशी गरज नसतानाही बोलायची अन् शक्यतो आयुष्याच्या कुठल्याही क्षेत्रात घाण करणे टाळायची. आजकाल जशी नाइलाजाने स्वच्छता राखली जाते, स्वत:पुरतीच राखली जाते. नाकात बोट टाकून भिंतीला पुसणारी माणसे, ही आजच्या काळाची ओळख आहे. म्हणून आज स्वच्छता मोहीम राबवावी लागते, गोदरीमुक्त गावासाठी आंदोलन करावे लागते. मुलींना जन्म द्या, म्हणून साक्षरांना शिकवावे लागते. साक्षर आता राक्षस झाले आहे. राक्षस म्हणजे नियम मोडणारा साक्षर! त्यांच्यासाठी आता केंद्र सरकारने चाचा चौधरी आणि साबूला साकडे घातले आहे. त्यात मग साक्षरांना राक्षस बनण्यापासून रोखणारे वर्तमानाचे नायक पंतप्रधान मोदी हे एक नवे पात्र आले आहे. मेंदू आणि काळीज यावर आघात करणार्‍या छोट्या छोट्या गोष्टीतून समाजाला वळण लावणाचा प्रयत्न या नव्या चित्रकथांमधून करण्यात आला आहे. मोदी राजकारणी नेते आहेत. त्यांनी राजकारणात प्राण फुंकला आहे. पांढरपेशांना गलिच्छ वाटणार्‍या राजकारणाचा मोदींनी बगिचा करून टाकला आहे. त्यासाठी एक कलावंत त्याच्या पश्‍चातही सहभागी झाला आहे. कलावंताची ही ताकद असते.
 
मोदी सरकार सत्तेत आलं त्याच्या चारेक महिन्यांत प्राण शर्मा या चित्रकाराचं निधन झालं होतं. ऑगस्ट २०१४ मध्ये ते गेले. ७६ व्या वर्षी कर्करोगाने ते गेले. आता मोदी सरकारला चार वर्षे झालीत... हो ‘मोदी सरकारच!’ तसे ते केंद्र सरकारच असते, मात्र आपली नाममुद्रा सर्वार्थाने उमटविणार्‍याचे सरकार असते. जिंकणारे अन् एकहाती जिंकणारे बरेच असतात, मोदींना जिंकायचे नाही, सामान्य माणसाला जिंकवायचे आहे. म्हणून कायम विजय त्यांच्या बाजूने आहे. तर... मोदी सरकारला आता चार वर्षे झाली आहेत आणि एका वर्षात निवडणुकीला सामोरे जायचे आहे. अर्थात, प्राण यांच्या या पात्रांची सोबत निवडणुकीसाठी नाही.
प्राण यांनी १९६० मध्ये दिल्लीहून निघणार्‍या ‘मिलाप’ या वर्तमानपत्रात कार्टूनिस्ट म्हणून आपल्या करीअरला सुरुवात केली होती. चाचा चौधरी हे प्रसिद्ध कार्टून कॅरेक्टर त्यांनी हिंदी बालपत्रिका ‘लोटपोट’साठी बनवलं होतं. प्राणकुमार शर्मा... त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९३८ रोजी लाहोरमध्ये झाला होता. चाचा चौधरी आणि साबू यांच्याशिवाय प्राण यांनी डायमंड कॉमिक्ससाठी रमन, बिल्लू आणि श्रीमतीजीसारखे कॉमिक कॅरेक्टरचीही निर्मिती केली. साठच्या दशकात कॉम्प्युटर फारसे चलनातच नसताना, ‘‘चाचा चौधरीका दिमाख कम्प्युटरसेभी तेज हैं,’’ असे प्राण यांचे वाक्य काळजाला अन् मेंदूलाही आनंद द्यायचे. त्या काळात अमर चित्रकथांचा भारतीय बालमनावरच नाही तर प्रौढांवरही पगडा होता. जादूगार मॅण्ड्रेक, फॅण्टम ही पात्रे अन् त्यांचे पर्यावरण बालमनाला सृजनाचे धडे देत होते. स्पायडरमॅन, सुपरमॅन हे विदेशी नायक होते, त्या काळात चाचा चौधरी हा अत्यंत सामान्य वाटणारा अस्सल भारतीय नायक प्राण यांनी आणला.
 
डोक्यावर लालचुटूक पगडी अन् बहारदार ‘मुछें हो तो नथ्थूलाल के जैसी हो’ टाईप नथ्थूलाली मिशांचे बुटके चाचा चौधरी आठवले की, आजही खुद्कन हसू येतं. चाचा चौधरी व साबूच्या कथा वाचतच मोठी झालेली एक पिढीच आजही केवळ ‘चाचा चौधरी’ असे म्हटले तरीही हजारो भारतीय चाचांच्या बुद्धिचातुर्याच्या कथा सांगत सुटतात.
 
 
१९६० च्या काळात कार्टूनिस्ट नव्हते असे नाही. आर. के. लक्ष्मण, शंकर, कुट्‌टी आणि अहमद... अगदी आपले बाळासाहेब ठाकरेदेखील होते. मातब्बर मंडळी होती त्या क्षेत्रात. आता सार्वजनिक जीवनात ज्यांच्यावर व्यंग्य करावे, अशी मोठी माणसे सहिष्णू राहिलेली नाहीत. राजकारण्यांनाही टीका किंवा व्यंग्य सहन होत नाही. प्रहसनाने आक्रस्ताळी झालेली कितीतरी माणसे सांगता येतील. मागे झी टीव्हीवर ‘घडलंय्- बिघडलंय्’ या प्रहसनात्मक मालिकेच्या एका भागावर चिडून, भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी स्टुडिओच तोडला होता. ममता बॅनर्जींनी एका व्यंग्यचित्रकाराला अटकच केली होती. चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी तर त्यांच्यावरच्या व्यंग्यचित्रांना बंदीच घातली आहे. त्या काळात मात्र तालेवार म्हणवले जाणारे व्यंग्यचित्रकार राजकारणावर भाष्य करत. त्यांनाही आज संदर्भमूल्य आहेच; पण प्राण यांनी अत्यंत विचारपूर्वक वेगळी वाट चोखाळली अन् ते पिढीचे लाडके झाले. त्यांचे ते हवेहवेसे असणे अजूनही कायम आहे. प्राण यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, ‘‘राजकारण कधीतरी मागे पडणार, हे जाणवल्यानंतर मी सामान्य पात्रे साकारायचे ठरवले. १९५९ मध्ये मी चाचा चौधरी रेखाटला. चाणक्यांकडून मला यासाठी प्रेरणा मिळाली. माझ्या पात्राची बुद्धी त्यांच्यासारखीच असावी, असे मला वाटत होते. चुटकीसरशी समस्या सोडवणार्‍या चाचा चौधरींसमोरची आव्हाने वाढू लागल्यावर मी गुरू ग्रहावरून साबू बोलावला. त्यानंतर चाचा चौधरी जिला घाबरतात, असे बिन्नीचे पात्रही साकारले. ती कुणालाही घाबरत नव्हती. पाश्‍चिमात्य पात्र उंच, धिप्पाड, तरुण होते. माझे पात्र टकले, म्हातारे असूनही अधिक शक्तिशाली आहे. त्यामुळेच अशी साधी पात्रे थेट मनाला भिडतात.’’
 
 
त्यांची पात्रं आता मोदींसोबत प्रबोधनाचे काम करणार... राजकारण करत असतानाही त्याला सामाजिक आयाम गेल्या चार वर्षांत दिला आहे... ‘‘मोदीजीका दिमाख कम्प्युटरसेभी तेज हैं,’’ असेच आपण म्हणू!
००००००००००००००
@@AUTHORINFO_V1@@