प्रणबदा, संघ आणि पुरोगामी पोटशूळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2018   
Total Views |

 


कालपासून सर्व प्रसारमाध्यमांमध्ये एकाच विषयावर जोरदार गदारोळ सुरु आहे. माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाण्याचे निमंत्रण स्वीकारल्याने समस्त तथाकथित 'पुरोगामी विचारवंतांना' जबरदस्त पोटशूळ उठलेला आहे. कारण माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी हे कुणी सामान्य राजकीय नेते नसून गेली कित्येक दशकं ते काँग्रेस पक्षामध्ये अनेक उच्च पदांवर कार्यरत होते. ते आधी इंदिरा गांधींचे आणि नंतर सोनिया गांधींचे निकटवर्ती म्हणून ओळखले जात असत. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना प्रणब मुखर्जी यांनी अर्थमंत्रीपदाचे महत्वाचे खाते सांभाळले होते. एकेकाळी त्यांचे नाव पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणूनही घेतले जायचे. त्यामुळे गांधी कुटुंबियांचे निकटवर्ती, काँग्रेसप्रणित राजकारणात हयात घालवलेले माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहूच कसे शकतात हा बऱ्याच तथाकथित 'पुरोगामी' लोकांना पडलेला प्रश्न आहे.

मजा म्हणजे, जे लोक आज 'तुम्ही संघाच्या कार्यक्रमाला जायचं निमंत्रण स्वीकारूच कसे शकता' म्हणून प्रणबदांना जाब विचारत आहेत तेच लोक वृत्तवाहिन्यांवरून रोज सकाळ-संध्याकाळ 'समाजात सध्या पसरलेली असहिष्णुता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सध्याच्या सरकारने केलेली गळचेपी' ह्या मुद्यावर मोठमोठ्याने गळे काढून अरण्यरुदन करत असतात. गेल्याच आठवड्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी ह्यांनी पाकिस्तानच्या आयएसआय ह्या हेरसंस्थेचे प्रमुख असद दुराणी आणि रॉ ह्या भारतीय हेरसंस्थेचे माजी प्रमुख ए. एस. दुलत ह्यांनी मिळून लिहिलेल्या 'दि स्पाय क्रोनिकल्स' ह्या पुस्तकाचं प्रकाशन केलं होतं, पण त्यांना कुणीही त्याबद्दल जाब विचारला नाही. २६/११ च्या मुंबई शहरावरच्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग ह्यांनी '२६/११, RSS कि साझिश' ह्या अझिझ बर्नी नामक एका उर्दू पत्रकाराने लिहिलेल्या तद्दन भंपक पुस्तकाचं प्रकाशन केलं होतं, तेव्हाही कुठल्याच पत्रकाराने त्यांना जाब विचारायचं धाडस केलं नव्हतं. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मुंबईवर २६/११ ला झालेला हल्ला पाकिस्तानमधील दहशतवादी 'नॉन-स्टेट ऍक्टर्स' नी आयएसआयच्या चिथावणीवरून व त्यांच्याच पाठींब्याने घडवून आणला होता अशी स्पष्ट कबुली पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनीच पाकिस्तानमध्ये वार्ताहरांशी बोलताना दिली होती, तरीही ना अझिझ बर्नी ह्यांनी संघाची आणि भारतीय जनतेची माफी मागितली ना दिग्विजय सिंग ह्यांनी. पण प्रणब मुखर्जी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार ही नुसती बातमी जाहीर झाल्यापासून पुरोगाम्यांची अस्पृश्यता परत एकवार उसळून वर आलेली आहे.



खरंतर विरोधी विचारांच्या माणसांना संघाच्या कार्यक्रमांना बोलावणं हे संघासाठी नवीन नाही. खुद्द महात्मा गांधी दोन वेळेला संघ कार्यक्रमात पाहुणे म्हणून उपस्थित होते. पहिल्यांदा जमनालाल बजाज ह्यांच्या बरोबर गांधीजी वर्धा येथे एका संघ कार्यक्रमात गेले होते. त्यानंतर सप्टेंबर १९४७ मध्ये त्यांनी एका संघ वर्गापुढे भाषण केले होते. ह्या भेटीचा वृत्तांत हरिजनच्या २८ सप्टेंबर १९४७ च्या अंकात प्रसिद्धही झाला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जवळचे अनुयायी राजाभाऊ खोब्रागडे यांनीही संघ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सव, तृतीय संघ शिक्षा वर्ग, गुढीपाडवा या कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून विविध क्षेत्रांतील नामांकित व्यक्तीनां निमंत्रित केले जाते. संघाने जाणीवपूर्वक त्यांच्या विचारधारेच्या विरोधात मत व्यक्त करणाऱ्यांना आपल्या व्यासपीठावर स्थान दिले आहे. संघाला विरोधी विचारांचे कधीच वावडे नसते. संघाच्या कार्यक्रमांना जाणारी प्रत्येक व्यक्ती फक्त संघाचं कौतुकच करते असं नाही. त्यांच्या भाषणातून अनेकवार संघावर अत्यंत कडवी टीकाही झालेली आहे, पण तरीही संघाने वेगळ्या विचारांच्या लोकांना आपल्या कार्यक्रमात बोलावणं बंद केलेलं नाही आणि ज्यांचे विचार परिपक्व असतात अश्या लोकांनी संघाच्या निमंत्रणांचा योग्य तो आदर नेहमीच केलेला आहे.



प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नाही. प्रश्न संघाचे निमंत्रण आदरपूर्वक स्वीकारणाऱ्या पण वेगळ्या विचारधारेच्या लोकांच्या संघकार्याच्या आकलनाचाही नाही. प्रश्न आहे तो अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या तथाकथित पुरोगाम्यांच्या अकलेचा. संघाचे निमंत्रण प्रणब मुखर्जींनी स्वीकारले म्हणून आकांडतांडव करणाऱ्या ह्या लोकांचा हा कांगावा काही नवा नाही. २०१५ मध्ये प्रख्यात उद्योगपती विप्रोचे अझीम प्रेमजी राष्ट्रीय सेवा संगम ह्या सेवा कार्य करणाऱ्या संघ प्रणित संस्थांच्या संमेलनाला खास पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते तेव्हाही ते संघाच्या कार्यक्रमाला गेलेच कसे म्हणून मीडियामधून खूप राळ उडवण्यात आली होती. तेव्हा अझीम प्रेमजी ह्यांनी त्यांच्यावरील टीकेला उत्तर देताना संघाच्या व्यासपीठावरून म्हटले होते की 'काही लोकांना वाटत होते की मी संघाचे निमंत्रण नाकारावे, पण मी त्यांचे ऐकले नाही कारण मी राजकारणी नाही, पण माझ्या देशाच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या लोकांना भेटायला मी नेहमीच उत्सुक असतो मग ते वेगळ्या विचारधारेचे का असेनात, त्यामुळे जिथे लोक एकत्र जमून आपण देशासाठी काय करू शकतो ह्याचा विचार करतात अश्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यात मला काहीही आक्षेपार्ह वाटत नाही. पण फक्त एखाद्या व्यासपीठावरून बोलण्यामुळे तुम्हाला त्या व्यासपीठावर मांडण्यात आलेले सर्व विचार मान्य आहेत असे होत नाही'. अझीम प्रेमजी ह्यांचे हे म्हणणे तिथे उपस्थित असलेल्या संघ कार्यकर्त्यांनी शांतपणे ऐकून घेतले होते.

वेगळ्या विचारधारेचा स्वीकार नसला तरी आदर करणे हे संघाने सतत आचरणात आणलेले तत्व आहे. संघाच्या व्यासपीठावर वेगवेगळ्या विचारांचे लोक बसून गेलेले आहेत पण साम्यवाद्यांच्या व्यासपीठावर संघाचे किती लोक आजपर्यंत दिसलेत? दिवसरात्र वैचारिक सहिष्णुतेच्या नावाने खोटे उमाळे काढून रडणाऱ्या तथाकथित 'पुरोगामी उदारमतवाद्यांना' मात्र ह्यात कसलाच दुटप्पीपणा दिसत नाही. बरं, अजून कार्यक्रम झालेलाही नाही, प्रणब मुखर्जी नक्की काय भूमिका घेतील, भाषणात काय बोलतील हेही कुणाला माहिती नाही पण फक्त निमंत्रण स्वीकारण्यावरून इतका शिमगा सुरु आहे. पण एरवी उठसूठ वैचारिक दहशतवादाच्या नावाने खडे फोडणाऱ्या लोकांना ह्यात काहीही चूक दिसत नाही हा एक मोठ्ठा विनोद आहे.

पण तथाकथित पुरोगाम्यांची ही वैचारिक अस्पृश्यता संघाला नवी नाही. ह्या खोट्या कांगाव्याला कंटाळूनच आणीबाणीच्या हुकूमशाहीविरुद्ध लढा देणारे महान गांधीवादी नेते जयप्रकाश नारायण ह्यांनी आणिबाणीनंतरच्या जनसंघाच्या एका रॅलीत बोलताना, संघाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून, 'जर तुम्ही फॅसिस्ट असाल तर मीही फॅसिस्ट आहे' असे जाहीर उद्गार काढले होते. खरे फॅसिस्ट मात्र तेव्हाही तथाकथित 'पुरोगामी विचारवंत' होते आणि आजही तेच आहेत!

- शेफाली वैद्य
@@AUTHORINFO_V1@@