राज्याच्या पहिल्या मतदार संघापासून...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


 

  
राज्यातील पहिल्या क्रमांकाचा आणि महाराष्ट्र, कर्नाटकच्या सीमेवर असलेला मतदार संघ म्हणजे निपाणी. शेती असेल किंवा औद्योगिक विकास अशा महत्त्वाच्या प्रश्नांची आस आजही या क्षेत्रातील लोकांना लागली आहे. या मतदार संघावर महाराष्ट्रातील राजकारणाचाही मोठ्या प्रमाणात पगडा आहे. त्यामुळे निपाणीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

निवडणुकांचे वारे वाहू लागताच विकासाचे मॉडेल जोर धरू लागते. मतदाराला आपल्या बाजूने ओढण्याची कसरतही आता सुरू झाली आहे. ’एव्हरीथिंग इज फेअर इन इलेक्शन’ असं म्हणत अनेक ठिकाणी सख्ख्या मित्रांनीही आपापसात वैर पत्करल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या काळात चुनावी जुमले हे काही मतदारांना नवे नाहीत. मात्र, आतापर्यंत आमिषांचा पडलेला पाऊस पाहता हे जुमले असेच चालू राहणार, यात काही शंका नाही. निपाणी या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर या मतदारसंघाचे राजकारण व्यक्तीकेंद्रित राजकारणात गुरफटलेले दिसते. निपाणी या मतदारसंघात एकूण ५४ गावांचा समावेश आहे. लाख १५ हजार मतदार संख्या असलेल्या या गावात मराठी मतदारांची संख्या जवळपास ५८ हजारांवर आहे. असे असले तरी इतर घटकही या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणार हे नक्की. यामध्ये लिंगायत समाजाचे ४५ हजार, मागासवर्गीय बांधव, ३० हजार, धनगर २७ हजार, जैन २२ हजार, मुस्लीम १८ हजार आणि अन्य १५ हजार असे मतरांचे प्रमाण आहे.

निवडणुकांचे बिगूल वाजताच राज्यातील काँग्रेस सरकारने जात आणि धर्माच्या नावावर खेळी खेळण्यास सुरुवात केली होती. राज्यातील लिंगायत बांधवांच्या मतांवर डोळा ठेवत स्वतंत्र लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचे सरकारने जाहीर केले. मात्र, केंद्र सरकारने तो हिंदू धर्माचा अविभाज्य भाग असल्याचे सांगत प्रस्ताव नाकारला. असे असले तरी या भागातील ४ हजार लिंगायत बांधव मतदार काँग्रेसच्या धार्मिक राजकारणाच्या बाजूने जातील की भाजपच्या बाजूने जातील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या भागातील धनगर आणि जैन बांधवांची मतेदेखील मोठ्या प्रमाणात निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. या भागात आजपर्यंत महाराष्ट्र एकीकरण समिती, काँग्रेस, जनता दल, भाजप अशा सर्वच पक्षांच्या उमेदवारांना निवडून देऊन संधी दिली. मात्र, कालातंराने हा मतदार संघ व्यक्तीकेंद्रित राजकारणात गुंफत चालला आहे. महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या या मतदार संघात मराठी मतदारांचा टक्का इतरांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाचा पगडा या मतदारसंघावर सततच जाणवतो. प्रचारादरम्यान, अनेक महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांना स्टार प्रचारक म्हणून या ठिकाणी बोलवाणे असते. यावेळीही भाजपच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. यावेळी भाजपने विद्यमान आमदार शशिकला जोल्ले यांना संधी दिली आहे, तर काँग्रेसनेही निपाणीच्या वैयक्तिक राजकारणावर प्रभावी ठरलेले माजी आमदार काका पाटील यांना संधी दिली आहे. त्यामुळे ही लढत चुरशीची होणार यात काही शंका नाही.

आधी म्हटल्याप्रमाणेच निपाणी मतदार संघावर पक्षीय राजकारणापेक्षा व्यक्तीगत राजकारणाला महत्त्व आहे. २००८ साली झालेल्या निवडणुकांचे उदाहरण घ्यायचे झाले तर तत्कालीन आ. काका पाटील, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी आणि भाजपच्या उमेदवार शशिकला जोल्ले यांच्या चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. या चुरशीच्या लढाईत निसटता विजय पाटील यांच्या पारड्यात पडला होता. जोल्ले या नवख्या असल्याने अधिक मतांची अपेक्षा नसतानाही त्यांना दुसर्‍या क्रमांकाची मते पडल्याने सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. जोल्ले यांच्यासाठी सध्याचे वातावरण अनुकूल असले तरी निपाणी मतदारसंघाचा इतिहास पाहता या मतदारसंघातून कोण बाजी मारणार, हे पाहावे लागणार आहे.

महाराष्ट्रातील नेते निपाणीत

निपाणी मतदारसंघाने आजवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, खा. शरद पवार, पतंगराव कदम यांच्यासारख्या बड्या आणि दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा अनुभवल्या आहेत. हीच परंपरा कायम राखत या विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील बड्या नेत्यांनी निपाणीमध्ये ठाण मांडले आहे. भाजपतर्फे मुंबईचे आमदार . आशिष शेलार यांच्याकडे पक्षनिरीक्षकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शेलार यांनी या ठिकाणी भाजप पदाधिकार्‍यांच्या मेळाव्याचे आयोजन करून भूमिका स्पष्ट केली, तर अनेक ठिकाणी त्यांच्या प्रचारसभाही होणार आहेत तर महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हेदेखील या ठिकाणी विशेष लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे या ठिकाणी भाजपचा विजय झाल्यास त्यांचा मोलाचा वाटा असणार आहे.

तर या मतदारसंघात आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेसतर्फे महाराष्ट्राचे विधान परिषद सदस्य सतेज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हसन मुश्रीफ यांच्या खांद्यावर पक्ष निरीक्षकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यापूर्वी महाराष्ट्रात पार पडलेल्या निवडणुकांमध्ये शशिकला जोल्ले यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात सतेज पाटील यांच्याविरोधात मोर्चा उघडला होता. त्यामुळे पाटील हे काय भूमिका पार पाडतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्राकडून निपाणीला मदत

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकाळात निपाणीला दिलेली जवाहर धरणाची भेट ही अनोखी होती तर शरद पवार यांनी देवचंद महाविद्यालयाला दिलेले अनुदान वसंतराव नाईक यांनी महाविद्यालयाला दिलेली सवलत, सीमाभागातील दुधाला महाराष्ट्रात देण्यात आलेली परवानगी, ऊस उत्पादकांना देण्यात आलेला सर्वाधिक भाव हा निपाणीतल्या लोकांसाठी कधीही न विसरता येण्यासारख्या गोष्टी आहेत.

निपाणीकडे मंत्रिपद नाही

निपाणी हा कर्नाटकमधील पहिला मतदारसंघ असला तरी आजवर निवडून आलेल्या एकाही उमेदवाराला मंत्रिपदापर्यंत नेण्यात आले नसल्याची खंत या ठिकाणी आजही व्यक्त केली जाते. विधान परिषदेवर वीरकुमार पाटील यांना एकदाच संधी मिळाली होती. हा अपवाद वगळता 13 विधानसभेच्या निवडणुकांमध्ये एकाकडेही मंत्रिपदाची धुरा सोपविण्यात आली नाही.

रोजगाराची कमतरता

निपाणीमध्ये आजही प्रमुख व्यवसाय म्हणून शेतीकडे पाहिले जाते. मोठ्या प्रमाणात असलेल्या वाड्यावस्त्यांच्या भागात आजही तरुण पिढीकडे रोजगाराच्या संधी फार कमी आहेत. कागल, कोल्हापूर, शिरगाव अशा ठिकाणांपर्यंत काही पैशांसाठी निपाणीकरांना प्रवास करावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी माफक अपेक्षा या ठिकाणच्या तरुणांनी व्यक्त केली. निपाणीमध्ये शेती होत असली तरी मोठ्या प्रमाणात आज तंबाखूचे पीकच घेतले जाते. थोड्या थोडक्या रोजंदारीवर काम करणार्‍यांच्या समस्या आणि तंबाखूला अन्य पिकाचा नसलेला पर्याय यामुळे त्यांचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत.

काही प्रश्न प्रलंबित असले तरी निपाणीचा इतिहास पाहिला तर त्याबाबत शक्यता वर्तवणे तसेही कठीण. पण गेल्या पाच वर्षांतील भाजपच्या आ. शशिकला जोल्ले यांची मतदारसंघावर पकड पाहता त्यांच्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. मात्र, काँग्रेसनेही त्यांच्यासमोर माजी आ. काका पाटील यांना संधी देत तगडे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे निपाणीचे राजकारण काय वळण घेते, हे पाहण्यासाठी १५ तारखेची वाट पाहावी लागणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@