कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काय होणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान तसेच जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे सर्वेसर्वा एच.डी. देवेगौडा यांची मुक्तकंठाने प्रशंसा करून राज्यातील मतमोजणीनंतरच्या राजकारणाचे संकेत दिले आहेत. राज्यात भाजपा मिशन 150 साठी काम करत आहे आणि भाजपाला स्पष्ट बहुमताची खात्रीही आहे.
कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीबाबत काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या जनमत चाचणीत कॉंग्रेसला सर्वात मोठा पक्ष तर दाखवले होते, पण स्पष्ट बहुमतापासून दूर ठेवले होते. भाजपाला दुसर्‍या स्थानावर तर जनता दल (सेक्युलर)ला तिसर्‍या स्थानावर ठेवण्यात आले होते. या जनमत चाचणीनुसार जनता दल धर्मनिरपेक्षतेच्या मदतीशिवाय राज्यात कोणताही पक्ष सरकार स्थापन करू शकणार नसल्याचे दिसून येत होते. त्यामुळेच 2004 च्या विधानसभा निवडणुकीनंतर जे झाले, त्याचीच या वेळी राज्यात पुनरावृत्ती होणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
 
भाजपाला राज्यात स्वबळावर स्पष्ट बहुमताची खात्री आहे. मात्र बहुमतासाठी भाजपाला काही जागा कमी पडल्या तर जनता दल सेक्युलरच्या पाठिंब्याशिवाय भाजपा राज्यात सरकार स्थापन करू शकणार नाही, असे दिसते. त्यामुळे भाजपाने आतापासूनच देवेगौडा यांना चुचकारण्याची भूमिका घेतली आहे. जनता दल (सेक्युलर)ने कोणत्याही स्थितीत कॉंग्रेसला पाठिंबा देऊ नये, अशी भाजपाची स्वाभाविक भूमिका राहणार आहे. त्यामुळेच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान आणि जनता दल धर्मनिरपेक्षतेचे नेते एच.डी. देवेगौडा यांचा अपमान केल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला आहे.
विशेष म्हणजे भाजपाला राज्यात स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर जनता दल सेक्युलरच्या पाठिंब्यावर भाजपा राज्यात सरकार स्थापन करू शकते, याची जाणीव कॉंग्रेसला झाली आहे, त्यामुळेच जनता दल सेक्युलर ही भाजपाची बी टीम असल्याचा आरोप कॉंग्रेसने सुरू केला आहे. कुमारस्वामी यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतल्याचा आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे. याचाच दुसरा अर्थ आपल्याला या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळणार नाही, आपला पराभव होणार असल्याची अप्रत्यक्ष कबुली कॉंग्रेसने दिली आहे.
 
तिसर्‍या क्रमांकाच्या जागा मिळवूनही जनता दल सेक्युलर किंगमेकरच्या भूमिकेत येऊ शकतो. मात्र ही किंगमेकरची भूमिका जनता दल सेक्युलरचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांना मान्य नाही, त्यांना किंगमेकर नाही तर किंग म्हणजे मुख्यमंत्री व्हायचे आहे.
राज्यात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली तर सरकार बनवण्यासाठी कोणालाच पाठिंबा न देता पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी कुमारस्वामी यांनी दर्शवली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाशी हातमिळवणी करण्याची शक्यता माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी स्पष्ट शब्दात फेटाळली आहे. कुमारस्वामी यांनी भाजपाशी हातमिळवणी केली तर त्यांच्याशी असलेला संबंध तोडण्याचा इशारा देवेगौडा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिला आहे. देवेगौडा आणि कुमारस्वामी हे पितापुत्र असले तरी त्यांची राजकीय भूमिका ही नेहमीच परस्परपूरक राहिली असे नाही.
त्यामुळे कुमारस्वामी किंगमेकर होतात की किंग याचे उत्तर राज्यातील मतमोजणीनंतर मिळणार आहे, मात्र एक बाब नक्की की ते आणि त्यांचे वडील देवेगौडा कोणत्याही स्थितीत राज्यात सरकार बनवण्यासाठी कॉंग्रेसला पाठिंबा देणार नाही. एच.डी. देवेगौडा आणि कॉंग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यात छत्तीसचा आकडा आहे. देवेगौडा आणि सिद्धरामय्या यांच्यातील राजकीय वैर आजचे नाही तर 35 वर्षांपासूनचे आहे. तेव्हा सिद्धरामय्या जनता पक्षात होते. चामुंडेश्वरी मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीची उमेदवारी आपल्याला मिळेल, याची त्यांना पूर्ण खात्री होती.
 
एच.डी. देवेगौडा यांनी आपल्या प्रभावाचा उपयोग करत सिद्धरामय्या यांचे तिकीट कापले. याचा सिद्धरामय्या यांना मोठा धक्का बसला. आपल्या समर्थकांच्या आग्रहामुळे सिद्धरामय्या यांनी चामुंडेश्वरी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकलीसुद्धा. तेव्हापासून एकदुसर्‍यावर मात करण्याची एकही संधी देवेगौडा आणि सिद्धरामय्या सोडत नाही. देवेगौडा यांनी आपली उमेदवारी कापली याचा राग आजही सिद्धरामय्या यांच्या मनात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या कार्यालयात असलेले देवेगौडा यांचे छायाचित्र सिद्धरामय्या यांनी काढून टाकले होते. सिद्धरामय्या यांनी सरकारी कार्यालयातील आपले छायाचित्र हटवले, हे देवेगौडा कधीच विसरू शकत नाही.
त्यामुळेच त्यांनी चामुंडेश्वरी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे आव्हान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना दिले आहे. या मतदारसंघात सिद्धरामय्या यांना पराभूत करण्याची शपथ देवेगौडा यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चामुंडेश्वरी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे देवेगौडा यांचे आव्हान स्वीकारले आहे. वरुणा हा आपला मतदारसंघ सोडून त्यांनी चामुंडेश्वरी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र सावधगिरीचा उपाय म्हणून आणखी एका मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्यातील हे हाडवैर भाजपाच्या पथ्यावर पडणारे आहे.
 
जनता दल सेक्युलरला भाजपाची बी टीम ठरवून राज्यातील निवडणूक दुरंगी करण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न आहे. भाजपा आणि कॉंग्रेसमधील सरळ होणार्‍या लढतीचा आपल्याला फायदा होईल, अशी कॉंग्रेसची व्यूहरचना आहे. तर कोणत्याही स्थितीत ही निवडणूक तिरंगी करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. जनता दल सेक्युलरची जेवढी ताकद वाढेल, तेवढा त्याचा फायदा भाजपाला मिळणार आहे. एच.डी. देवेगौडा आणि कुमारस्वामी या पितापुत्राने राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणाची त्यांना पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे कोणत्याही स्थितीत आपला पक्ष कॉंग्रेसच्या सापळ्यात अडकणार नाही, भाजपाची बी टीम म्हणून जनमानसात आपली प्रतिमा तयार होणार नाही, याची खबरदारी ते घेत आहे.
विशेष म्हणजे राज्यात आघाडी सरकारचा प्रयत्न 2004 च्या विधानसभा निवडणुकीनंतर झाला होता. त्या वेळी भाजपाला सर्वाधिक म्हणजे 79 जागा मिळाल्या होत्या. कॉंग्रेसला 64 तर जनता दल सेक्युलरला 59 जागांवर समाधान मानावे लागले. त्या वेळीही राज्यात कोणाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्रिशंकू विधानसभेची परिस्थिती उद्भवली होती. त्यामुळे जनता दल सेक्युलरच्या पाठिंब्याने कॉंग्रेसने राज्यात सरकार बनवले आणि धरमिंसग मुख्यमंत्री झाले. मात्र काही काळाने कुमारस्वामी यांनी कॉंग्रेस सरकारचा पाठिंबा काढत भाजपाच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले होते.
 
भाजपाचे आज मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असलेल्या येदियुरप्पा यांनी त्या वेळी कुमारस्वामी मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. विशेष म्हणजे कुमारस्वामी यांचा जनता दल सेक्युलरचा गट आणि भाजपात मुख्यमंत्रिपदासाठी वीस वीस महिन्यांचा करार झाला होता. म्हणजे पहिले 20 महिने कुमारस्वामी मुख्यमंत्री राहतील तर नंतरचे 20 महिने भाजपाचा मुख्यमंत्री होईल. पण, मुख्यमंत्रिपदाचा आपला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्यास नकार देत भाजपाचा विश्वासघात केला होता. याचाच अर्थ आघाडी सरकारचे राजकारण कर्नाटकसाठी नवीन नाही. काही सुधारणांसह या वेळीही त्याची पुनरावृत्ती झाली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. या वेळी राज्यात आघाडी सरकार आले तरी ते भाजपाच्या नियम आणि शर्तीवर होईल, तसेच मुख्यमंत्री हा भाजपाचाच होईल.
श्यामकांत जहागीरदार
9881717817
@@AUTHORINFO_V1@@