६५ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारोह संपन्न

    03-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली : आज नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात ६५ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात दिग्गज कलाकारांचा सन्मान करण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार श्रीदेवी यांना तर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार रिद्धी सेन याला देण्यात आला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्या तर्फे हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. चित्रपट ‘मॉम’मध्ये उत्कृष्ट भूमिका साकारली असल्याने त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच नगर कीर्तन या बंगाली चित्रपटासाठी रिद्धी सेन याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 
 
यावर्षी मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार बॉलीवूडचे लोकप्रिय दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांची पत्नी कवीता खन्ना, तसेच पुत्र अभिनेते अक्षय खन्ना यांनी राष्ट्रपती यांच्या हस्ते स्वीकारला. पुरस्काराचे स्वरूप दहा लाख रूपये रोख, सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र असे आहे.
 
 
 
 
 
‘धप्पा’ ला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय एकात्मतेसाठी पुरस्कार
 
निपून धर्माधिकारी दिग्दर्शित आणि सुमतीलाल शाह निर्मित ‘धप्पा’ या मराठी चित्रपटास राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नर्गिस दत्त पुरस्कार राष्ट्रपती यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. रजत कमळ आणि १० लाख ५० हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
 
‘पावसाचा निबंध’ या नॉनफिचरला राष्ट्रीय पुरस्कार
 
 
नॉनफिचर चित्रपटांमध्येही मराठी मोहर बघायला मिळाली ‘पावसाचा निबंध’ या चित्रपटासाठी प्रसिध्द दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार राष्ट्रपती यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. स्वर्ण कमळ आणि १ लाख ५० हजार रूपये रोख पुरस्काराचे स्वरूप आहे. याच चित्रपटाचे ऑडीओग्राफर अविनाश सोनवने यांना सर्वोत्कृष्ट ऑडीयोग्राफीचा पुरस्कार राष्ट्रपती यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. रजत कमळ आणि ५० हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
 
 
 
 
‘म्होरक्या’ : सर्वोत्तम बाल चित्रपटाचा पुरस्कार
 
 
अमर देवकर दिग्दर्शित व कल्याण पाडाळ निर्मित ‘म्होरक्या’ हा मराठी चित्रपट देशातील सर्वोत्तम बाल चित्रपटाचा पुरस्कार माहिती व प्रसारण मंत्री यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. स्वर्ण कमळ आणि १ लाख ५० हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘म्होरक्या’ या चित्रपटासाठी यशराज क-हाडे आणि रमण देवकर या दोन बालकलाकारांना विशेष उल्लेखनीय पुरस्कार केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वरूपात प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
 
 
‘कच्चा लिंबू’ : सर्वोत्तम मराठी चित्रपट
 
मराठी भाषेसाठी ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती ईरानी यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले असून मंदार देवस्थळी यांची निर्मिती आहे. दिग्दर्शक व निर्मात्यास रजत कमळ आणि १ लाख रूपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 
‘मयत’ : सर्वोत्कृष्ट लघुपटाला पुरस्कार
 
सुयश शिंदे दिग्दर्शित व निर्मित ‘मयत’ हा सर्वोत्कृष्ट लघुपटाला आज केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. चित्रपटास रजत कमळ आणि ५० हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
 
नॉनफिचर चित्रपट श्रेणीत स्वप्निल कपुरे दिग्दर्शित ‘भर दुपारी’ या चित्रपटास विशेष उल्लेखनीय पुरस्कार माहिती व प्रसारण मंत्री यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वरूपात प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
 
 
‘व्हीलेज रॉकस्टार्स’ सर्वोत्कृष्ट चित्रपट
 
 
‘व्हीलेज रॉकस्टार्स’ हा आसमी भाषेतील चित्रपट देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला असुन आज राष्ट्रपती यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वर्ण कमळ आणि २  लाख ५० हजार रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
 
यावर्षी पुरस्कारार्थींना रोख मिळालेली रक्कम ऑनलाईन प्रणालीव्दारे त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली.