मला दिसलेला भूतान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


७ दिवस – ८ रात्री किंवा ८ दिवस – ९ रात्रींमध्ये एखादा देश पाहून होऊ शकतो कां ? निश्चितच नाही. थोडीशी तोंडओळख होऊ शकते त्या देशाची. काही ढोबळ गोष्टी लक्षात येऊ शकतात. जे भाग पहिले आहेत तेथील परिस्थिती नुसार लोकांचे जीवनमान कसे असेल याचा अंदाज बांधता येऊ शकतो. आपल्याला आलेला स्थानिक माणसांचा अनुभव, त्यांची आपल्याशी वर्तणूक यावरून त्या देशातील नागरिकांचा स्थायीभाव, आपल्या देशाविषयी असलेले त्यांचे मत, याचा अंदाज येऊ शकतो.

भूतान पाहायला जायचे ठरले तेंव्हा ह्या प्रकारची उत्सुकता मनात होतीच. निसर्गरम्य भूतान असे वर्णन ऐकले होते. आपल्या देशाबाहेर प्रथमच जात होते त्यामुळे खूप उत्साहित होते. तसे भूतानला ‘ परदेश ‘ म्हटले जात नाही. खूपच जवळ आहे तो आपल्या. तिथे गेल्यावर कळले की, दोन्ही देशांमध्ये फक्त एक लोखंडी कुंपण असलेली भिंत आहे. border वरच्या जयगांव या गावामधून दिसणारी कुंपणापलीकडची इमारत भूतानमध्ये आहे असे आमच्या गाईडने सांगितले तेंव्हा खूपच मजा वाटली. जयगांव भारतात आहे याची साक्ष तेथील दमट हवामान, फुटपाथवर भरलेला बाजार आणि कर्णकर्कश हॉर्न वाजवत जाणारी वाहनांची गर्दी देत होतीच.
परमिट वगैरे सोपस्कार पूर्ण करून भूतानचा प्रवास सुरु झाला आणि चित्र एकदम पालटून गेले. हवा आधी सुखद आणि नंतर थंड आणि अधिकच थंड होत गेली. श्वासामध्ये शुध्द हवेचा स्वाद जाणवू लागला.



हिरवेगार डोंगर, खोल दऱ्या, खळखळ वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या नद्या आणि वळणदार घाट, असे वर्णन केले तर कोणालाही असेच वाटेल की, हे सर्व तर आमच्या कोकणातही आहेच की ! पण खूपच वेगळे रूप होते ते निसर्गाचे. शाळेत असतांना चित्रकलेच्या तासाला drawing paper वर काढलेल्या एकमेकांच्या पाठीशी उभ्या असलेल्या डोंगर रांगा इथे प्रत्यक्षात उभ्या होत्या. कोकणातील घाटात दिसणारे प्रचंड मोठे डोंगर, घरातल्या वयोवृध्द, कणखर कुटुंबप्रमुखाची आठवण करून देतात. भूतानमध्ये दिसणारे डोंगर कुटुंब वत्सल वाटतात. लहान मोठी सर्व भावंडं जणू उंचीप्रमाणे एखाद्या family photograph साठी उभी असावीत तशा या डोंगररांगा ! डोंगरांच्या कुशीतून वाहणाऱ्या नद्या, त्यासुद्धा इतका सौम्य खळखळाट करतात की जणू नुकत्याच चालायला लागलेल्या छोट्या बाळाच्या पायातले घुंगुरवाळेच ! आवाजातला हा सौम्यपणा तिथल्या माणसांच्या बोलण्यातही झिरपतो. संपूर्ण प्रवासात कुठेही कोणाचे चढ्या आवाजातील संभाषण ऐकू आले नाही. जिथे ऐकू आले ती माणसे भूतानची नव्हती. वळणदार घाट रस्त्यांवर वाहनेही हॉर्नचा वापर करत नव्हती. वाहनांना हॉर्न नाहीतच अशी शंका यावी.
डोंगरांवर एकाच प्रकारच्या पाईन आणि फर वृक्षांची दाटी वाटी, रस्त्याच्या कडेला पसरलेले जांभळ्या रंगांच्या फुलांचे गालिचे, गडद गुलाबी पासून पांढऱ्या गुलाबी रंगापर्यंतच्या विविध छटांची फुले असलेली पर्णहीन झाडे, डोळे तृप्त करणारा हा निसर्ग, कॅमेऱ्याच्या चौकटीचा खुजेपणा जाणवून देत होता. सफरचंदाच्या झाडांवर फुललेला मोहक मोहोर, फोटो काढण्यासाठी सुद्धा नजर हटवू देत नव्हता.


उंच उंच पर्वत शिखरांवर असणाऱ्या monastery मध्ये आढळणाऱ्या इमारतींमध्ये आणि मूर्तींमध्ये असणारा तोचतोचपणा प्रत्येक ठिकाणी आढळणाऱ्या निसर्गातील वैविध्यामुळे सुसह्य होतो. त्या तुलनेत भारतात आढळणारी देवळांमधील आणि मूर्तींमधील विविधता विलोभनीय आणि अतुलनीय आहे हे प्रकर्षाने तिथे जाणवते.
Gross National Happiness हा शब्दप्रयोग भूतानच्या राजाने अस्तित्वात आणला. ‘gross national happiness’ is more important than ‘gross national product‘ असे त्यांचे वाक्य प्रसिद्ध आहे. ‘ यथा राजा तथा प्रजा ‘ असेच तेथील लोकांकडे पाहून जाणवते. कधीकधी हा शांतपणा ‘ संथपणा ‘ वाटायला लागतो. आपला व्यवसाय वाढवावा, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काही विशेष प्रयत्न करावेत, जाहिरात करावी असे कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत.
अल्पसंतुष्ट आहेत म्हणून समाधानी आहेत की, समाधानी आहेत म्हणून अल्पसंतुष्ट आहेत असा काहीसा कोड्यात टाकणारा प्रश्न मनात घोळवत परतीचा प्रवास सुरु केला.
क्वचितच डोक्यावर येणाऱ्या सूर्याने, उन्हाळा, डोंगरावर पडलेल्या बर्फाने, हाडं गोठवणारी थंडी या दोन ऋतूंचा अनुभव घेऊन झालाच होता. राहिलेल्या वर्षा ऋतूची पूर्तता परतीच्या प्रवासात पडलेल्या मुसळधार पावसाने केली आणि सात दिवसात तिन्ही ऋतूंचा अनुभव मिळाला. समोरचे ५ – ६ फुटांवरचे सुद्धा दिसत नव्हते अशा दाट धुक्यात, रस्त्याचा नुसता अंदाज घेत, गाडी चालवणाऱ्या त्या चक्रधराला मनातल्या मनात किती साष्टांग दंडवत घातले त्याची गणतीच नाही.
प्रदूषण मुक्त असे वर्णन असलेल्या भूतान मधला तो चक्रधर मात्र ‘ अब पहेले जैसी हवा नही रही ‘ असे हळहळत होता. समोर एक ट्रक काळा - कुट्ट धूर ओकत गेला. त्या चक्रधराची चिंता रास्त असल्याची जाणीव मनाला अस्वस्थ करून गेली.

मला दिसलेला निसर्गरम्य, आनंदी, समाधानी, शांतीप्रिय भूतान आणखी काही वर्षांनी असाच राहील कां ? अजून तरी, पडलेल्या झाडांचेच लाकूड वापरले जात आहे, झाडांची कत्तल केली जात नाहीये, प्लास्टिकच्या पिशव्या वापरात आहेत पण नद्या स्वच्छ आहेत, कचरा हा कचरा कुंड्यांच्या बाहेर टाकला जात नाहीये तोपर्यंत तरी अशी आशा करायला काही हरकत नाही!
 
- शुभांगी पुरोहित 
@@AUTHORINFO_V1@@