जाणूनबुजून आग लावल्याचा रेल्वे प्रशासनाला संशय
मुंबई : छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या यार्डामध्ये उभ्या असलेल्या रेल्वेच्या एका डब्याला आज दुपारी अचानकपणे आग लागली. आगीच्या तीव्रतेमुळे डब्याचा बहुतांश भाग जाळून संपूर्ण नष्ट झाला असून सुदैवाने यामध्ये कसल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.
सीएसटीच्या फलाट क्र. १८ जवळील यार्डमध्ये देखभालीसाठी उभ्या असलेल्या सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आज दुपारी ३ सुमारास अचानकपणे आग लागली. थोड्याच वेळात आग सर्वत्र पसरल्यानंतर आगीच्या ज्वाळा आणि दूर डब्यामधून बाहेर येऊ लागला. यानंतर याठिकाणी असलेल्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी तातडीने या घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली, तसेच अग्निशमन दलाला पाचारण केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या काही गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. परंतु आगीची तीव्रता अधिक असल्यामुळे आणखी काही गाड्या मागवण्यात आल्या अशा एकूण सहा गाड्या घटनास्थळी पोहोचल्यानंतर या आगीवर अखेर नियंत्रण मिळवण्यात आले. डब्याचा बहुतांश भाग या आगीमुळे पूर्णतः नष्ट झाला असून सुदैवाने यात कोणालाही कसल्याही प्रकारची इजा झालेली नाही.
दरम्यान यार्डामध्ये देखभालीसाठी म्हणून उभ्या असलेल्या या डब्याला अचानकपणे आग कशी काय लागू शकते ? असा प्रश्न अनेक जणांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच ही आग लागली नसून ती लावण्यात आल्याचा संशय रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे, तसेच या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची आदेश रेल्वे अधिकारी संजय कुमार पंकज यांनी दिले आहेत.