भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानात खोळंबा

    28-May-2018
Total Views |
 
 

 
 
 
भंडारा : पालघर तसंच भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान सुरु झाले असून बऱ्याच मतदान केंद्रावर विज नसल्याने नागरिकांना अंधारात मतदान करावे लागत आहे तर काही ठिकाणच्या मतदान केंद्रावर इव्हिएम मशीन या खराब झाल्याने सध्या मतदान थांबवण्यात आले आहे. जिल्ह्यात मोठ्या पोलीस बंदोबस्तात मतदान होत आहे, मात्र तांत्रिक बिघाडामुळे इव्हिएम मशीन काम करीत नसल्याने काही ठिकाणचे मतदान थांबले आहे. 
 
 
 
यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या तापले आहे. ११ इव्हिएम मशीन खराब असल्याचे सध्या सांगितले जात आहे. इव्हिएम मशीनमधील तांत्रिक बिघाडामुळे सध्या ३५ मतदान केंद्रावरील मतदान काही काळासाठी थांबवण्यात आले आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १३.९० टक्के मतदान झाले आहे. तर पालघरमध्ये पहिल्या अडीच तासांमध्ये ८ टक्के मतदान झाले आहे. 
 
 
 
नक्षलग्रस्त भागांमध्ये देखील इव्हिएम मशीन बंद झाल्या आहेत. काही ठिकाणी शांततेत मतदान होत असले तरी देखील काही भागांमध्ये इव्हिएम मशीनमुळे मतदानात खोळंबा उडाला आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला. तसेच शिवसेनेसाठी ही निवडणूक म्हणजे प्रतिष्ठेची निवडणूक मानली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणता पक्ष जिंकतो याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. 
 
 
 
मात्र इव्हिएम मशिनच्या बिघाडामुळे सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. प्रत्येक पक्ष एकमेकांना दोष देत आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची आज होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नवे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जारी करण्यात येईल, असं परीक्षा नियंत्रकांकडून सांगण्यात आले आहे.