२०१९ : ३६ टक्के विरुद्ध ६३ टक्के !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2018   
Total Views |
 
 
 
 
२०१९ ची निवडणूक एकप्रकारे भाजपचे ३६ टक्के विरुद्ध विरोधकांचे ६३ टक्के अशी होणार आहे. एका ताज्या जनमत चाचणीने २०१७ मे च्या तुलनेत २०१८ च्या मे महिन्यात भाजपची लोकप्रियता कमी झाली असल्याचे म्हटले आहे. २०१९ च्या मे महिन्यात कोणते चित्र असेल, याचे उत्तर मे २०१९ मध्येच मिळणार आहे.
 
हरियाणाचे दिवंगत मुख्यमंत्री भजनलाल यांच्याबाबत एक किस्सा सांगितला जात असे. हरियाणात राजकीय अस्थिरता सुरू होती. सारे नेते दिल्लीत दाखल झाले होते. इंदिरा गांधी एकेका नेत्यास बोलावून त्याच्या राजकीय शक्तीचा अंदाज घेत होत्या. हरियाणा विधानसभा ९० सदस्यांची असल्याने बहुमतासाठी ४६ आमदारांची आवश्यकता होती. काही नेते, ”आपल्याला ३५ आमदारांचा पाठिंबा असल्यास, उर्वरित ११ आमदारांची व्यवस्था आपण करू,” असे इंदिरा गांधींना सांगत होते. काहींनी सांगितले, ”आपल्याजवळ २५ आमदार असल्यास आपण सरकार स्थापन करू शकतो.” शेवटी भजनलाल यांचा क्रम आला. इंदिराजींनी त्यांना विचारले, ”किती आमदारांचा पाठिंबा असल्यास आपण सरकार स्थापन करू शकता?” भजनलाल उत्तरले, "मै अकेला ही काफी हूँ !" इंदिरा गांधींनी भजनलाल यांना निवडले व त्यांनी पाच वर्षं सरकार चालविले.
 
भारतीय लोकशाही आपल्या विरोधाभासासाठी प्रसिद्ध आहे. कर्नाटकात सर्वाधिक मते मिळाली काँग्रेसला. मात्र, सर्वाधिक जागा मिळाल्या भाजपला आणि भाजपला सर्वाधिक जागा मिळूनही सरकार स्थापन केले ते तिसर्‍या क्रमांकाच्या पक्षाने जनता दल सेक्युलरने.
 
कर्नाटक निवडणुकीने विरोधी पक्षांना काही प्रमाणात एकजूट केले. विरोधी ऐक्याचा एक सोहळा बंगळुरूत पाहावयास मिळाला. विरोधी पक्षांनी ही एकजूट कायम ठेवल्यास २०१९ चे निकाल कसे असतील, याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. एका ताज्या जनमत चाचणीत भाजप व मित्रपक्षांना ३७ टक्के मते मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. म्हणजेच, ६३ टक्के मते भाजपविरोधकांजवळ आहेत. २०१४ मध्ये भाजपला ३१ टक्के मते व ५१ टक्के जागा मिळाल्या. मित्रपक्षांना मिळालेली मते विचारात घेता, भाजप व मित्रपक्षांना जवळपास ३६ टक्के मते मिळाली. तेवढीच मते २०१९ मध्ये मिळतील, असाही अंदाज या चाचणीत सांगण्यात आला आहे. मात्र, भाजपच्या ५०-५५ जागा घटतील, असा एक निष्कर्ष काढण्यात आला आहे. विरोधी पक्ष एकत्र आल्याने हे होत असल्याचा दावा चाचणीत करण्यात आला आहे. २०१४ मध्ये भाजप आघाडीला ३३१ च्या आसपास जागा मिळाल्या होत्या, त्या घटून २७४ राहतील, असे सांगण्यात आले आहे. म्हणजे, मित्रपक्षांच्या जागा वजा केल्यास भाजपला स्वबळावर बहुमत मिळणार नाही, असेही सांगण्यात आले आहे.
 
सात राज्ये
 
२०१९ मध्ये भाजपसाठी सात राज्ये आव्हानाची ठरतील, असे मानले जाते. त्यातील दोन राज्ये आहेत मध्य प्रदेश व राजस्थान. या दोन्ही राज्यांत राज्य सरकारांच्या विरोधात वातावरण असल्याचे मानले जाते. काही पोटनिवडणुकीत ते तसे दिसलेही आहे आणि तसाच निष्कर्ष ताज्या जनमत चाचणीतही काढण्यात आला आहे. या दोन राज्यांत लोकसभेच्या ५४ जागा आहेत. म्हणजे एक दशांश लोकसभा या दोन राज्यांत तयार होते. २०१४ मध्ये यातील ४६-४७ जागा भाजपने जिंकल्या होत्या. या दोन राज्यांत भाजपला किती जागांचा तोटा होईल, हा एक मोठा प्रश्‍न राहणार आहे. या दोन राज्यांपैकी राजस्थानात तर भाजपची स्थिती अधिक खराब असेल, असे काहींना वाटते.
 
 
मध्य प्रदेश, राजस्थान नंतर उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, गुजरात व महाराष्ट्र ही पाच राज्ये भाजपसाठी आव्हानाची ठरू शकतात. या राज्यांमध्ये २२१ जागा आहेत. २०१४ मध्ये भाजप व मित्रपक्षांना या राज्यातून १९० च्या आसपास जागा मिळाल्या होत्या. भाजपला २०१९ मध्ये त्या कामगिरीची पुनरावृत्ती करता येईल काय, हा सर्वात मोठा प्रश्‍न राहणार आहे. उत्तर प्रदेशात भाजपने ८० पैकी ७३ जागा जिंकल्या होत्या. आता सप, बसप, काँग्रेस व लोकदल एकत्र आल्याने भाजपला ७३ जागा मिळणे कठीण जाईल. उत्तर प्रदेशात होणारे नुकसान कमीत कमी कसे असेल, याचाच प्रयत्न भाजपला करता येईल. या चार पक्षांची एकजूट जेवढी जास्त होईल तेवढे भाजपचे नुकसानही जास्त होईल. बिहारमध्ये भाजप आपली स्थिती कायम ठेवू शकेल, असे मानले जाते. कारण, जनता दल युनायटेडसोबत भाजपने युती केली आहे. रामविलास पासवान सध्या तर भाजपसोबत राहण्याचे संकेत देत आहेत. दलित नेत्या मायावती विरोधी पक्षात असल्याने पासवान भाजपसोबत आहेत. मात्र, ते शेवटपर्यंत भाजपसोबत राहतील, अशी खात्री कुणीही देत नाही. पासवान गेले तरी भाजप व जनता दल युनायटेड ही एक मजबूत युती असल्याचे मानले जाते व म्हणूनच या राज्यात भाजप व मित्रपक्षांचे संख्याबळ कायम राहण्याचे संकेत आहेत.
 
महाराष्ट्रातील युती
 
२०१४ मध्ये महाराष्ट्रात महायुती होती व गोपीनाथ मुंडेंसारखा नेता होता. २०१९ मध्ये शिवसेना भाजपसोबत राहणार नाही, असे सध्या तरी दिसते. २०१४ मध्ये महायुतीला ४८ पैकी ४३ जागा मिळाल्या होत्या. त्या कामगिरीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता कमी आहे. येथेही भाजपला आपले नुकसान कमीत कमी होण्याचे प्रयत्न करावे लागतील. गुजरातमध्ये तर भाजपने २६ पैकी २६जागा जिंकल्या होत्या. या ठिकाणी काँग्रेसला काही जागा मिळू शकतात. कर्नाटकात काँग्रेस व जनता दल सेक्युलर ही युती चालणार आहे. कर्नाटकात याचा फायदा या युतीला मिळू शकतो. तेथेही भाजपला २०१४ ची कामगिरी कायम राखण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागतील.
 
मोदी विरुद्ध कोण ? 
 
भारतात संसदीय लोकशाही असली तरी त्याला अध्यक्षीय प्रणालीचे स्वरूप येत आहे. अध्यक्षीय प्रणालीत पक्षापेक्षा नेता
महत्त्वाचा ठरत असतो. भाजपजवळ मोदींसारखा नेता आहे. त्यांच्या तुलनेत राहुल गांधी अनुभवी नाहीत. शिवाय विरोधी पक्षांजवळ अनेक इच्छुक उमेदवार असल्याने विरोधी पक्ष कोणत्याही एका नेत्यास पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून सादर करण्याच्या स्थितीत नाहीत. दुसरीकडे भाजपमध्ये नेत्याच्या नावावर वाद नाही. त्यामुळे २०१९ मध्ये ‘मोदी विरुद्ध कोण?’ असा एक प्रश्‍न समोर येऊ शकतो. भाजपसाठी ही एक जमेची बाजू असली तरी ती निर्णायक मानता येणार नाही. २००४ मध्ये ‘वाजपेयी विरुद्ध सोनिया गांधी’ असे चित्र होते. तरीही भाजप पराभूत झाला २००९ मध्ये भाजपने मनमोहन सिंग यांच्या विरोधात लालकृष्ण अडवाणी यांना मैदानात उतरविले होते. नेतृत्वाचा विचार करता, अडवाणी मनमोहन सिंग यांच्यापेक्षा सरस होते, अनुभवी होते. पण, निवडणुकीत काँग्रेसच्या जागा वाढल्या, भाजपच्या कमी झाल्या आणि पुन्हा युपीएचे सरकार सत्तारुढ झाले.
मुख्य मुद्दे
 
लोकसभा निवडणुकीत वेगवेगळे मुद्दे राहणार असले तरी, बेरोजगारी, शेतकरी, व्यापारी, महागाई हे मुद्दे राहणार आहेत. समाजाच्या या घटकांमध्ये असलेली नाराजी भाजपला हाताळावी लागेल. २०१४ मध्ये भाजपची पाटी कोरी होती. सरकारविरुद्धची नाराजी हा विषयच नव्हता. २०१९ मध्ये केंद्रातील सरकार व राज्यातील सरकारे अशा दुहेरी नाराजीचा मुकाबला भाजपला करावा लागेल, असे दिसते आणि त्यात भर पडत आहे ती तेलाच्या वाढत्या किमतीची व रुपयाच्या घसरत्या किमतीची. जसा हवामान खात्याचा अंदाज असतो, तसाच डॉलर-रुपयाच्या किमतीचा असतो. त्या अंदाजानुसार, २०१८ संपता संपता डॉलर ७० रुपयांच्या वर गेलेला असेल आणि २०१९ पर्यंत तो ७२ च्या पुढे गेलेला असेल. म्हणजे, २०१८ चा मान्सून कसा असेल, याप्रमाणेच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कशा असतील व डॉलर-रुपयाचा दर काय असेल, हे दोन घटकही महत्त्वाचे ठरणार आहेत आणि परखड सत्य म्हणजे, या बाबी कोणत्याही सरकारच्या हाती नाहीत.
 
 
२०१९ ची निवडणूक एकप्रकारे भाजपचे ३६ टक्के विरुद्ध विरोधकांचे ६३ टक्के अशी होणार आहे. एका ताज्या जनमत चाचणीने २०१७ मे च्या तुलनेत २०१८ च्या मे महिन्यात भाजपची लोकप्रियता कमी झाली असल्याचे म्हटले आहे. २०१९ च्या मे महिन्यात कोणते चित्र असेल, याचे उत्तर मे २०१९ मध्येच मिळणार आहे.
 
 
 
 
- रवींद्र दाणी

 
@@AUTHORINFO_V1@@