युवकांमध्ये राष्ट्राभिमान जागविण्याची गरज

    28-May-2018
Total Views |

जळगावातील सभेत शिवप्रेमी संभाजीराव भिडे गुरुजी यांचे प्रतिपादन

 
 
 
जळगाव :
भारतावर अनेक राष्ट्रांनी आक्रमणे केली आहेत. त्यातील सर्वच राज्यकर्त्यांमधील सैनिकांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक होती. त्यामुळे आता देशातील युवकांमध्ये राष्ट्राभिमान जागविण्याची गरज असल्याचे तळमळीचे प्रतिपादन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक तथा प्रखर राष्ट्रप्रेमी व शिवप्रेमी संभाजीराव भिडे गुरुजी यांनी केले.
 
 
शहरातील लेवा भवन, सरदार सभागृहात रविवारी, २७ रोजी सायंकाळी आयोजित ‘३२ मण सुवर्ण सिंहासन व खडा पहारा’ याविषयावर ते बोलत होते. सभेची सुरुवात धर्मप्रार्थनेने झाली. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन भिडे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले.
 
 
ते पुढे म्हणाले की, जो समाज, आपल्या पूर्वजांचा इतिहास वाचत नाही. आत्मसात करत नाही, तो समाज, देश विश्वाच्या संघर्षात वाचत नाही. छत्रपती शिवाजी-संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर रायगडावरील सुवर्ण सिंहासन नाहीसे झाले. शिवरायांच्या मनाला झालेल्या वेदना पुसून टाकणे व महाराजांच्या विचारांना जिवंत ठेवण्यासाठी रायगडावर ३२ मण सुवर्ण सिंहासन स्थापन करणे ही काळाची गरज आहे. त्या सिंहासन पुर्नस्थापना करण्याच्या संकल्प ४ जून, २०१७ रोजी लाखो धारकर्‍यांच्या उपस्थितीत रायगडावर केला होता. ज्या सिंहासनावर बसून महाराजाचा राज्यभिषेक झाला. ते ठिकाण अखंड हिंदुस्थानसाठी पवित्र आहे. म्हणून राजदरबारात ३२ मण सुवर्ण सिंहासन स्थापित करणे गरजेचे झाल्याचे त्यांनी सांगितले.
आज देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीअभावी देश रक्तबंबाळ होत आहे.राष्ट्रीयत्वाची कमतरता असल्यामुळे रक्तात स्वाभिमान, देशाभिमान नसल्याने हिंदुस्थान दु:खी आहे. देव, देश, धर्म, संस्कृती, परंपरा यांचा अभिमान जोपर्यंत आपल्या रक्तात येत नाही, तोपर्यंत आपण राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीने ‘वांझ’ आहोत. आपल्या कमकुवतपणाचा फायदा घेत लांडगे देश तोडून खातील. जगात जे जे श्रेष्ठ आहे ते सर्व हिंदुस्थानात आहे. हिंदू धर्मासारखा धर्म जगात नाही. उदात्त,  उत्तुंग, व्यापक सर्व समावेशक धर्माचे आपण पाईक आहोत, याची आठवणही त्यांनी उपस्थितांना करुन दिली.
 
चोख पोलीस बंदोबस्त
जिल्ह्यात सभेविषयी होणारा विरोध बघता त्यातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सभेपूर्वी सभास्थळाची पाहणी पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी केली.
 
तळोद्याला तरुणाई झाली प्रभावित
तळोदा : शहरात वामनराव बापूजी मंगल कार्यालयात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक तथा प्रखर राष्ट्रप्रेमी व शिवप्रेमी संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या प्रखर राष्ट्राभिमान जागवणारे जाज्ज्वल्य विचार ऐकून अवघी तरुणाई प्रभावित झाली. छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या महान राष्ट्रकार्याची प्रचिती आणून देणारे विचार भिडे गुरुजी यांच्या व्याख्यानातून तरुणांना ऐकायला मिळाले.
 
 
महाराष्ट्र हा ‘मर्दांचा महाराष्ट्र ’ बनवायचा असल्याने प्रत्येक गावात कुस्त्या खेळणे व मंत्रालयात कुस्तीचे खाते असावे या दृष्टीने पुढील पाऊल उचलणार असल्याचे भिडे गुरुजी यांनी सांगितले. तालुक्यातून रायगडावर पहारा देण्यासाठी ३००० धारकरी तयार व्हावे, अशी अपेक्षा आहे, असेही गुरुजी म्हणाले.
 
 
उपक्रम यशस्वीतेसाठी जय श्रीराम सोशल ग्रुप, तळोदाचे सागर भाई, अमन जोहरी, युवराज चौधरी, कार्तिक शिंदे, पुष्पेंद्र दुबे, पराग राणे, किरण ठाकरे, जगदीश परदेशी आदींनी परिश्रम घेतले.