मित्र कोण, शत्रू कोण ? हे आतातरी ओळखा!

    28-May-2018
Total Views |

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक भिडे गुुुरुजी यांचे ‘तरुण भारत’ भेटीत आवाहन

 
जळगाव :
एकेकाळी संपूर्ण हिंदूंचा देश म्हणून ओळखला जाणारा बलुचिस्तान आज मुस्लिममय झाला आहे. त्याचा विचार करण्याची वेळ आता खर्‍या अर्थाने हिंदू धर्मावर आली आहे. दुसरीकडे मित्र म्हणवणारा चीनसारखा देशही हिंदुस्थानसाठी घातकी ठरला आहे. त्यालाही आता संपविण्याची गरज आहे. हिंदूंसाठी कोणताही देश ‘ मित्र ’ राहिलेला नाही. अशा स्थितीत हिंदुस्थानातील सरकारने आपला कोण आणि शत्रू कोण ? हे जाणून घेण्याची नितांत गरज असल्याचे कळकळीचे प्रतिपादन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी केले.
 
 
जळगाव येथे रविवारी सभेला संबोधित करण्यापूर्वी त्यांनी ‘तरुण भारत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी संवाद साधतांना ते बोलत होते. गुरुजी म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारिता ध्येयाने प्रेरित होती. बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळकांपासून अनेकांनी पत्रकारिता करतांना स्वातंत्र्य प्राप्तीसाठी त्याचा उपयोग केला. त्यासाठी जीवाची पर्वा न करता त्यांनी आपले ध्येय गाठले होते. आज मात्र स्पर्धेच्या युगात ध्येयाला धंद्याचे तर व्रताला व्यवसायाचे स्वरुप आले आहेे. प्रसारमाध्यमांच्या भाऊगर्दीत वृत्तपत्र क्षेत्रातून ध्येयवाद पूर्णपणे हद्दपार झाला आहे. मात्र, अशाही स्थितीत जळगाव ‘तरुण भारत’ ने आपली राष्ट्रीय विचारांची कास न सोडता, व्यवसायासाठी अविचारी तडजोड न करता या वृत्तपत्राने लेखनाच्या बळावर वाचकांना विचारांचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विविध विषय घेऊन ‘तरुण भारत’ची वाटचाल सुरु असून उज्ज्वल भविष्यासाठी आणि आपली वैचारिक परंपरा पुढे सुरु ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.
 
 
सर्व धर्मांचा उदय हिंदू धर्मातूनच झाला आहे त्यामुळे जो तो आपणच श्रेष्ठ समजतो हे खरे आहे का ? असे विचारता ते म्हणाले, सर्व भाषांचा जन्म संस्कृतपासून झाला आहे. धर्माचे ज्ञानही हिंदू धर्मापासून आलेे आहे. पण आपल्या देशात राहूनच काहीजण हिंदूंना संपविण्याची भाषा करीत आहेत. हिंदूही खंबीरपणे अशा कारवायांचा न घाबरता मुकाबला करीत सज्ज आहे. हिंदू संस्कृतीचा र्‍हास करण्याचे पातक काही शक्तींव्दारे सुरु आहे. त्यांच्या प्रयत्नांना थारा न देता सर्वशक्तीनिशी त्याला विरोध केला पाहिजे, असेही त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी ‘तरुण भारत’चे विशेषांक देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र लढ्ढा, उपाध्यक्ष नंदू नागराज, संचालक सचिन बोरसे, विभाकर कुरंभट्टी आदी उपस्थित होते.
 
 
विशेषांक मार्गदर्शक
‘तरुण भारत’ ने विविध राष्ट्ीयस्तरावरील विषयांच्या अनुषंगाने प्रकाशित केलेल्या दिवाळी अंकामधील बलुचिस्तान आणि चीनविषयक विशेषांक संग्राह्य आहे. तो मी नक्की वाचेल असे ते या विशेषांकांचे लक्षपूर्वक अवलोकन करताना म्हणाले. हे अंक वाचकांसाठी, हिंदुस्थानच्या भल्यासाठी मार्गदर्शक ठरतील असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.