पेट्रोलवरील थोडातरी अधिभार कमी करा : धनंजय मुंडे

    25-May-2018
Total Views |


मुंबई : पेट्रोल आणि डीझेलच्या ताज्या दरवाढीनंतर महाराष्ट्रात देशातील सर्वात महाग पेट्रोल विकले जाऊ लागले आहे, त्यामुळे नागरिकांना यातून थोडा दिलासा मिळावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल आणि डीझेलवरील राज्य अधिभार थोडा तरी कमी करण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आज केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल पदार्थांचा जीएसटीअंतर्गतच्या समावेशावर केलेल्या वक्तव्यानंतर मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

पेट्रोलियम पदार्थांचा जीएसटीअंतर्गत समावेश होईल तेव्हा होईल, पण तो पर्यंत राज्यातील जनतेला थोडासा दिलासा मिळावा म्हणून राज्य सरकारने पेट्रोल डीझेलवर आकारण्यात येणारा अधिभार थोड्या प्रमाणात तरी कमी करावा, जेणे करून सामान्य नागरिकांच्या खिशाला बसणारी झळ कमी होईल, असे मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने इतर राज्यांच्या तुलनेत पेट्रोल आणि डीझेलवर सर्वात अधिक अधिभार लावल्यामुळे राज्यात देशातील सर्वात महाग पेट्रोल सध्या मिळत आहे. त्यामुळे राज्याने अधिभार कमी केल्यास पेट्रोल-डीझेलचा दर आपणहून कमी होईल, तसेच जीएसटी परिषदेने पेट्रोलियम पदार्थांचा जीएसटीअंतर्गत समावेश केल्यास त्याचा आणखी फायदा होऊ शकतो, असे मत मुंडे यांनी व्यक्त केले आहे.


देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात मिळत असल्यामुळे राज्यातील विरोधी पक्षांनी राज्य सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते कि, राज्य सरकार पेट्रोलियम पदार्थांचा समावेश जीएसटीमध्ये करण्यास तयार आहे. परंतु देशातील काही राज्यांमध्ये याविषयी मतभेद असल्यामुळे जीएसटी परिषदेकडून यावर निर्णय घेतला जात नाही. पण लवकरच या मुद्दा निकालात निघेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी काल माध्यमांना दिली होती.