कुणाच्या खांद्यावर, कुणाचे ओझे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
 
 
प्रसारमाध्यमांमधून राजकारण या विषयावर खूपच भर दिला जात असतो. राजकारणातल्या अगदी बारीक-सारीक बातम्यासुद्धा आपल्या वाचकांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा आटोकाट प्रयत्न माध्यमं करीत असतात. एवढे करूनसुद्धा हिमनगाचा एक दशांश भागच बाहेर दिसावा नि नऊ दशांश भाग कायम दृष्टीआडच राहावा, तशी गत होते. राजकारण हे क्षेत्रच इतकं व्यापक, गुंतागुंतीचं आणि सतत घडामोडीचं होत असणारं आहे की, ते समग्र आकळणं फार अवघड आहे.
 
दोघा राजकारण्यांनी आपापसातच सल्लामसलत करून, वरिष्ठांना न विचारता, एक फार महत्त्वाचा प्रस्ताव झिडकारला आणि एक मोठी संधी कशी गमावली, याची कहाणी आता ६७ वर्षांनंतर उघडकीला आली आहे. त्यांच्या या चुकीच्या निर्णयामुळे ८९ वर्षांच्या एका वृद्ध सेनापतीला जन्मठेपेची शिक्षा झाली. दुसर्‍या एका राजकारण्याला वाचवण्यासाठी त्यांनी हे केलं.
 
ही कहाणी आहे फ्रान्सचा अत्यंत लोकप्रिय सेनापती मार्शल हेन्री फिलिप पेताँ याची, फ्रान्सचा तारणहार नि राष्ट्राध्यक्ष चार्ल्स डी गॉल याची; युद्धकाळातल्या चर्चिल मंत्रिमंडळात एक मंत्री व नंतर पंतप्रधान बनलेल्या हेरॉल्ड मॅकमिलन याची, चार्ल्स डी गॉलची प्रतिष्ठा टिकून राहावी, म्हणून हेरॉल्ड मॅकमिलन आणि त्याचा हस्तक रॉजर मेकिन्स या दोघांनी मार्शल पेताँकडून आलेला शरणागतीचा प्रस्ताव ठोकरून लावला. असा प्रस्ताव आला आहे याची साधी खबरसुद्धा त्यांनी चर्चिलपर्यंत पोहोचविली नाही. परिणाम एवढाच झाला की, चार्ल्स डी गॉल फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष झाला नि मार्शल पेताँ मरेपर्यंत तुरुंगात खितपत पडला.
 
हेन्‍री फिलिप पेताँ याचा जन्म १८५६ सालचा, म्हणजे १९ व्या शतकातला. पण, पेताँइतकं काळाचं भान अख्ख्या फ्रेंच सेनेत दुसर्‍या कुणालाच नव्हतं. फ्रेंच सेना आणि सेनापती यांचं लाडकं धोरण म्हणजे आक्रमण, पेताँचं म्हणणं असं असायचं की, वेळेप्रमाणे खेळ करावा. जिथे आक्रमणाची गरज असेल, तिथे ते केलंच पाहिजे; पण जिथे प्रसंगी माघार घ्यावी लागेल, तिथे तीदेखील घेता आली पाहिजे, उगीच भलत्या प्रतिष्ठेच्या आहारी जाऊन, सैनिक मरू देऊ नयेत. पेताँच्या अशा विचारांमुळे त्याची नेमणूक सैनिकी महाविद्यालयात झाली. म्हणजे त्याचे विचार पसंत नसलेल्या सेनाश्रेष्ठींनी दैनंदिन सैनिकी ‘ऑपरेशनल’ कामातून त्याचा काटा काढला. काय तुझं तत्त्वज्ञान आहे, ते शिकवत बस नव्या पोरांना; असा याचा अर्थ होता. हा अनुभव अगदी आजही सर्व क्षेत्रांत येत असतो. एखाद्या माणसाचा काटा काढायचा असला की, त्याची नेमणूक त्या त्या क्षेत्रातल्या शैक्षणिक कार्यालयात, प्रशिक्षण केंद्रात वगैरे केली जाते. श्रेष्ठींच्या मते शिक्षण-प्रशिक्षण या फालतू गोष्टी असतात.
 
पेताँला स्वत:ला मात्र याबद्दल कसलीही खंत वाटली नाही. एक उत्तम स्ट्रॅटेजिस्ट-व्यूहरचनाकार म्हणून त्याने कीर्ती मिळवली. पहिलं महायुद्ध सुरू झालं तेव्हा तो जनरलच्या हुद्द्यावर होता. युद्ध सुरू झालं आणि जर्मनांच्या सामर्थ्यापुढे फ्रेंचांचा हुरडा भाजून निघू लागला. ब्रिटन तिकडे समुद्रात सुरक्षित होते; पण युरोपच्या मुख्य भूमीवर जर्मन आक्रमणाचा सगळा असह्य मारा होत होता फ्रान्सवरच, बाकी सगळी राष्ट्रं तर अगदीच किरकोळ होती.
 
परंतु, फ्रेंच राजकारणी आणि फ्रेंच सेनापती अजून नेपोलियनच्या काळातच वावरत होते. हे युद्ध २० व्या शतकातलं आहे नि इथे घोडे आणि बंदुका यांचं काम नसून, हॅवित्झर तोफा व मशीनगन्स कामाच्या आहेत, याचं त्यांना भानच नव्हतं. परिणामी, जर्मनांनी फ्रेंचांना जबर तडाखे लगावले. अखेर फ्रेंच सेनाप्रमुख जनरल झ्योफ्र याला रजा देऊन, जनरल पेताँच्या हाती सारी सूत्रं सोपवण्याखेरीज फ्रेंच पंतप्रधानाला पर्यायच राहिला नाही. यावेळी जर्मन सेनाप्रमुख जनरल फॉल्केनहाईन याने फ्रान्सवर जंगी चढाई केली होती. जनरल पेताँने आपल्या लवचिक धोरणाला अनुसरून, भराभर सूत्रं हलवायला सुरुवात केली. त्याच्यासमोर जर्मन आक्रमणापेक्षाही मोठे आव्हान होतं ते फ्रेंच सेनेतल्या बंडखोरीचं, फ्रेंच सैनिक मरणाला घाबरत नव्हते; पण जर्मन मशीनगन्सवर आक्रमण करून, फुकट मरायला ते कंटाळले होते. पेताँचं कौतुक असं की, फ्रेंच सैन्यातला हा असंतोष त्याने सामोपचाराने मिटवला, असा असंतोष होता ही बातमी त्याने जर्मनांना अजिबात समजू दिली नाही आणि अल्पावधीत त्याने फ्रेंच सैनिकांना पुन्हा लढण्याच्या मन:स्थितीत आणलं. त्या जोरावर त्याने फॉल्केनहाईनच्या चढाईला विफल केलं. सतत सात महिने चालू असलेल्या या लढाईला ‘व्हर्डूनची लढाई’ असं म्हणतात. पहिल्या महायुद्धातली ही एक अत्यंत गाजलेली लढाई आहे आणि तिचा नायक जनरल पेताँ आहे, हे नि:संशयच! या पराक्रमाबद्दल पेताँला ‘मार्शल’ हा सर्वोच्च लष्करी किताब देण्यात आला. यावेळी तो ६०0 वर्षांचा होता.
 
मे १९४० मध्ये फ्रँको-जर्मन सीमेवरील आर्देन्स या खडकाळ भागातून जर्मन सेनानी जनरल गुडेरियन याच्या पॅन्झर रणगाडा डिव्हिजन्स फ्रान्समध्ये घुसल्या. अगदी पहिल्या महायुद्धाचीच स्थिती होती. ब्रिटिश आणि फ्रेंच सेनाश्रेष्ठी १९१८ सालातच वावरत होते नि जर्मन सेना १९४० सालचं अत्यंत गतिमान युद्ध खेळत होती. पेताँ यावेळी ८४ वर्षांचा होता, पण पंतप्रधान रेनाँ यांनी फ्रान्सची सगळी सूत्रं त्याच्याच हाती सोपवणे पत्करले. मार्शल पेताँ आणि सरसेनापती जनरल वेगाँ यांनी आटोकाट प्रयत्न केले, पण उशीर झाला होता. हिटलरच्या झंझावातासमोर उभं राहण्यासाठी जी तयारी हवी, ती फ्रेंच नेते आणि फ्रेंच सेनाश्रेष्ठी दोघांनीही कधीच केली नव्हती.
 
परिणामी, अवघ्या एका महिन्यात फ्रान्स पडला. मार्शल पेताँने चक्क शरणागती पत्करली; एवढेच नव्हे तर हिटलरशी सहकार्य करून, जर्मनव्याप्त फ्रान्सचं नागरी शासन चालविण्याची जबाबदारीही पत्करली. हे सरकार राजधानी पॅरिसमधून नव्हे, तर व्हिशी या ठिकाणाहून कारभार करू लागलं. म्हणून त्याला ‘व्हिशी सरकार’ असं नाव पडलं.
 
चार्ल्स डी गॉल याचा जन्म १८९० सालचा. त्याच्या घराण्यातले बरेच लोक लेखक आणि इतिहासकार होते. पण, चार्ल्स सैन्यात शिरला. १९१३ साली तो ज्या रेजिमेंटमध्ये दाखल झाला, तिचा प्रमुख पेताँच होता. पुढे १९३८ साली चार्ल्सने ‘फ्रान्स आणि त्याचं सेनादल’ नावाचं एक पुस्तक लिहिलं. सेवेत असताना हे पुस्तक प्रसिद्ध व्हावं नि आपल्या नावासकट ते प्रसिद्ध व्हावं, असा त्याचा आग्रह होता. या भलत्याचं आग्रहावरून मार्शल पेताँने त्यावेळी त्याला चांगलाच झापला होता.
 
पेताँने शरणागती पत्करून, व्हिशी सरकार चालवायला सुरुवात केल्यावर चार्ल्स डी गॉल ब्रिटनला पळून गेला आणि चर्चिलच्या पूर्ण पाठिंब्याने त्याने लंडनमध्ये परागंदा फ्रेंच सरकारची स्थापना केली. फ्रान्सच्या मुक्ततेसाठी त्याने ’फ्रेंच फोर्सेस ऑफ दि इंटरियर’ हे स्वतंत्र सेनादलही उभारलं. जर्मनीच्या कचाट्यातून सुटून पळालेले फ्रेंच युद्धकैदी किंवा नागरिक या सैन्यात भरती होऊ लागले.
 
१९४३ सालापासून वारं बदललं. जर्मनांची पीछेहाट नि दोस्तांची आगेकूच सुरू झाली. ६ जून १९४४  या दिवशी दोस्त सेना ब्रिटिश खाडी ओलांडून युरोपच्या मुख्य भूमीवर म्हणजे फ्रान्सच्या समुद्रकिनार्‍यावर उतरल्या. फ्रान्सच्या मुक्तीला सुरुवात झाली. २५ ऑगस्ट १९४४  या दिवशी चार्ल्स डि गॉलच्या फ्रेंच मुक्ती सेनेने पॅरिसवर आपला कब्जा बसवला. मार्शल पेताँला जर्मन सेनापती आपल्याबरोबर बर्लिनला घेऊन गेले.
 
 
१९४५ च्या ८ मे रोजी जर्मनीने शरणागती पत्करली. ऑगस्ट १९४५ मध्ये जपानने गुडघे टेकले. दुसरे महायुद्ध संपलं. मार्शल पेताँला फ्रान्समध्ये आणण्यात आलं नि त्याच्यावर देशद्रोहाचा खटला भरण्यात आला. यावेळी तो ८९ वर्षांचा होता. पेताँ यावेळी जे काही म्हणाला ते प्रत्येक देशभक्ताने, राष्ट्राची उभारणी करू पाहणार्‍या प्रत्येकाने कायमचं लक्षात ठेवावं असं आहे. पेताँ म्हणाला, “फ्रान्सचा पराभव रणांगणावर झाला नसून, तो मद्यालये, नृत्यालये आणि तशाच प्रकारच्या विलासी जागी झालेला आहे. चैनबाजीची चटक लागलेला फ्रान्स हिटलरसमोर उभा राहू शकत नाही, याची विदारक जाणीव मला झाली. अर्धा फ्रान्स जर्मनांनी व्यापलेलाच होता. उरलेला देश तरी त्यांच्या पंजातून वाचावा, म्हणून मी त्यांच्याशी हातमिळवणी केली. त्यामुळे देशाचे प्रत्यक्ष प्रशासन शत्रूच्या हाती न जाता, आपल्याच हातात राहिलं. आतून मला दोस्तांना जेवढी मदत करता आली, तेवढी मी केली. या मदतीचे काही पुरावेही त्याने दिले, परंतु हिटलरशी हातमिळवणी ही कल्पनाच इतकी असह्य होती की, न्यायालयाने पेताँला फाशीचीच शिक्षा फर्माविली. मात्र, त्याचं वय लक्षात घेऊन, ती जन्मठेपेत बदलण्यात आली. १९४५ ते १९५१ अशी सहा वर्षे मार्शल पेताँ अटलांटिक किनार्‍यावरील इल-डी-यू या ठिकाणी एकांतवासाची कैद भोगत होता. १९५१ साली वयाच्या ९५ व्या वर्षी तो शांतपणे मृत्यूच्या अधीन झाला.
 
चार्ल्स विल्यम या ब्रिटिश इतिहासकाराला नुकतीच काही कागदपत्रं मिळाली. त्यावरून त्याला असं आढळलं की, १९४३ च्या ऑगस्ट महिन्यात मार्शल पेताँने लॉर्ड डनकॅनन नावाच्या ब्रिटिश ‘मुत्सद्यामार्फत हेरॉल्ड मॅकमिलनकडे शरणागतीचा प्रस्ताव पाठवला होता. मॅकमिलन त्यावेळी पंतप्रधान चर्चिलच्या युद्धकालीन मंत्रिमंडळातला भूमध्य समुद्र परिसर सांभाळणारा मंत्री होता. हा प्रस्ताव स्वीकारला गेला असता, तर दोस्तांच्या जून १९४४ मधल्या संभाव्य नॉर्मंडी मोहिमेला खूपच बळ मिळालं असतं. पण, मग फ्रान्स जिंकण्याचं जे श्रेय चार्ल्स डी गॉलला मिळालं, ते मिळू शकलं नसतं. हे होणार असं लक्षात घेऊन, मॅकमिलन आणि त्याचा हस्तक रॉजर मेंकिन्स यांनी पेताँचा प्रस्ताव चर्चिलपर्यंत जाऊ न देता दाबूनच टाकला.
  
मॅकमिलनची भीती खरीच होती. कारण, १९४५ साली जेव्हा पेताँला बर्लिनहून पॅरिसला आणण्यात आलं, तेव्हा त्याला पाहायला किमान दहा लाख लोक जमले होते आणि त्यांनी त्याचा देशद्रोही म्हणून धिक्कार न करता, उलट त्याला शांतपणे अभिवादन केलं होतं. ९५ वर्षांचं दीर्घायुष्य देशभक्त आणि देशद्रोही अशा टोकाच्या भूमिकांमध्ये जगणार्‍या मार्शल पेताँचं आयुष्य हा एका महाकादंबरीचा विषय आहे.
 
 
 
 
 
- मल्हार गोखले

 
 
@@AUTHORINFO_V1@@