आपली जबाबदारी ओळखा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-May-2018   
Total Views |
सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून विशेषण लागलेली मुंबई महानगरपालिका ही कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेचा विषय बनलेली असते. कारण, या मुंबई नगरीमध्ये चालणारे अनेक व्यवहार, घडामोडींवर बारीकाईने लक्ष ठेवले जाते. मग त्या चांगल्या घटना असो किंवा एखादी दुर्घटना असो. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेले मुंबईकर पावसाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहात असले तरी त्यांच्या मनामध्ये एक धाकधूकदेखील आहेच. अर्थात, त्यांची अशी अवस्था होणं साहजिकच आहे. कारण, त्यांच्या गाठीशी २६ जुलै २००५ आणि २९ जुलै २०१७ चा अनुभव आहे. पण असं असतानाही त्यातून कोणताच धडा न घेतलेले मनपा प्रशासन आणि बेशिस्त मुंबईकर कधी सुधारणार, असा प्रश्‍न पडतो. पावसाळा म्हटलं की पाणी तुंबणे, नालेसफाई, धोकादायक-अतिधोकादायक इमारती कोसळणे, लोकल रस्ते वाहतूक ठप्प होणे, रस्त्यावर पडणारे खड्डे यासारख्या एक ना अनेक समस्या डोळ्यांसमोर उभ्या राहातात. दरवर्षी पावसाचे वेध लागले की, पालिका प्रशासन यंदा आपण पावसाचा सामना करण्यासाठी किती यंत्रणा सक्षम केल्या आहेत, कोट्यवधी रुपये खर्च करून मुंबईकरांना पावसाळ्यामध्ये कोणत्याच समस्यांना सामोर जावं लागणार नसल्याचे छातीठोकपणे सांगत असते. पण त्याचं नेमकं काय होतं, आता हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पाऊस रूद्रावतार करण्याची चाहूल जरी लागली तरी मुंबईकर घाबरून जातो. सर्वसामान्य मुंबईकराला भर पावसामध्ये जीव मुठीत धरून घरी सुखरूप पोहोचण्याचा संघर्ष करावा लागतो. मग त्याचा सगळा रोष निघतो तो मनपा प्रशासनावर. पावसाळ्यात निर्माण होणार्‍या परिस्थितीला प्रशासन जबाबदार असले तरी अशी परिस्थिती निर्माण व्हायला बेशिस्त मुंबईकरदेखील तितकेच जबाबदार आहेत, ही बाब विसरून चालणार नाही. सामान्य मुंबईकर लोकलने प्रवास करताना त्यांच्याकडे असलेल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे पॅकेट रेल्वे रूळावर, गटारामध्ये फेकून देतात, तेव्हा त्यांना काहीच वाटत नाही. काही महिला तर चक्‍क लोकलच्या डब्यामध्ये कचरा टाकताना दिसतात आणि मग गटारे, नाले तुंबले बीएमसी काम करत नाही, असं म्हणून मोकळे होतात. मग खरंतर आपलंदेखील काही चुकत आहे का याबाबत मुंबईकरांनी आत्मपरीक्षण करायला हवं.
 
 0000000000 
 
 
आत्मपरीक्षण करा...
 
काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी यंदा मुंबईत पाणी तुंबल्यास महापालिका नव्हे, तर मेट्रो रेल्वेची कामे जबाबदार असतील, असे विधान केलं होतं. यावरून बरेच वाद झाले होते. आपल्याकडे असलेल्या अपुर्‍या, मोडक्या-तोडक्या ज्ञानाच्या आधारावर, कोणताही सारासार विचार न करता वादग्रस्त वक्‍तव्य करणार्‍या मंडळींना काय म्हणावं, असा प्रश्‍न पडतो. म्हणजेच त्यांना खरंच त्या विषयाचा अभ्यास अपुरा आहे की, केवळ चर्चेमध्ये राहण्यासाठी विधाने करण्यामध्ये त्यांना रस असतो हे उमगत नाही. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा, सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला असतानाही त्यावर तोडगा काढण्याऐवजी भलतीच विधाने करण्यामध्ये काहीजण धन्यता मानतात. आज मुंबईकरांच्या हितासाठी, त्यांचं भविष्य चांगलं होण्यासाठी अनेक प्रकल्प, योजना राबविल्या जात आहेत. अर्थात हे सगळं करत असताना अनेक अडथळे येतात, विलंब लागतो, ही बाब तितकीच खरी असली तरी एक मुंबईकर, एक जागरूक नागरिक या नात्याने मुंबईचा विकास करण्यामध्ये आपला हातभार लागत आहे का? याचा विचार मुंबईकराने करणे गरजेचे आहे. आज मुंबईमध्ये कचरा व्यवस्थापनाचा फज्जा उडालेला दिसतो. कचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या ओल्या आणि सुक्या कचर्‍याचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन पालिका प्रशासन वारंवार करत असतात. पण, तरीदेखील हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच गृहनिर्माण सोसायट्यांनी या उपक्रमाला प्रतिसाद दिला आहे. अनेक सामाजिक संस्था, एनजीओ तसेच महाविद्यालयांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी मध्य आणि पश्‍चिम रेल्वेमार्गावरील रेल्वेस्थानकांमध्ये सामाजिक संदेश देणारी चित्रे, संदेश देऊन रेल्वेस्थानके रंगीबेरंगी केली होती. पण तिथे पान-गुटखा खाण्याचे शौकीन असलेल्या मंडळींनी त्या चित्रांवर पिचकार्‍या उडवल्या आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळावी, वेळेची बचत व्हावी, यासाठी एटीव्हीएम मशीन्स लावण्यात आल्या आहेत, पण ती मशीन्स नक्‍की कशी वापरायची याची माहिती नसताना त्यांचा वापर केल्याने त्यांच्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाले. मग यामध्ये दोष नक्‍की कोणाला द्यायला हवा? निदान विकासाकरिता हातभार लावायचा नसला तरी सार्वजनिक मालमत्तेचा वापर योग्य प्रकारे करण्याची तसदी मुंबईकरांनी घ्यायला हवी.
 
 
- सोनाली रासकर 
@@AUTHORINFO_V1@@