तिकीट निरीक्षक ओझा यांची मुलीला वाढदिवसाची ‘अनोखी भेट’

    24-May-2018
Total Views |

मुलीच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवा

 
 
भुसावळ, २४ मे ः
रोगावर उपचार घेणार्‍या एका तीन वर्षाच्या लहान मुलाची गाडीत विसरून गेलेली उपचारांची फाईल शोधण्यासाठी जिवाचे रान करून, आपल्या ओळखी आणि मैत्री पणाला लावून ती संबंधितांना सुपूर्द करतांना तिकीट निरीक्षक विनय ओझा यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. मानवतेचा अनोखा आदर्श घडवणार्‍या विनय ओझा यांनी त्यांची कन्या तरू हिला तिच्या वाढदिवसाची अशी ‘अनोखी भेट’ दिली.
 
 
गुरूवारी, २४ रोजी गाडी क्र. ११०५७ अमृतसर एक्सप्रेसने एक परिवार तीन वर्षाच्या मुलासह प्रवास करुन भुसावळ रेल्वे परिसरात उतरलेला ओझा यांना दिसून आला. यातील तीनवर्षीय बालकाला कर्करोग असून त्याच्यावर मुंबईला टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्या मुलाची उपचाराची (मेडिकल) फाईल आणि एमआरआय रिपोर्ट ते गाडीच्या डब्यात विसरुन गेले होते. त्यामुळे त्या मुलाचे आई-वडील चिंतेत होते.
 
 
ओझा यांनी त्यांची चौकशी केली असता त्यांना हा सर्व प्रकार कळला. तेव्हा या गाडीचे गार्ड सोनी यांच्याशी त्यांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. खंडवा येथे ती गाडी थांबली असता गाडीतील त्या डब्याचा शोध घेवून तपास करण्यात आला. त्यात एका डब्यात सोनी यांना त्या परिवाराची राहून गेलेली फाईल आणि एमआरआय रिपोर्ट मिळून आढळले. यासाठी सर्व तिकीट निरीक्षक आणि खंडवा येथील सुमन श्रीवास्तव, शैलेंद्र, भुसावळ येथे कार्यरत असलेले पी.के.सिंह, आर.के.गुप्ता यांनी जातीने लक्ष घालून ही फाईल परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले. सापडलेली ती फाईल नंतर गोरखपूर-लोकमान्य टिळक एक्सप्रेसने आर.के. सोनकर, सागर चौरे, डीसीटीआय आहलुवालिया, आर.के.केशरी यांनी भुसावळला परत आणली. वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा आणि सहाय्यक वाणिज्य प्रबंधक अजय कुमार यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.
 
 
विनय ओझा यांची ज्येष्ठ कन्या तरु हिचा गुरुवारी वाढदिवस होता. सतत सर्वांच्या मदतीला धावून जाणार्‍या विनय ओझा यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवशी आपल्या हातून काहीतरी सत्कृत्य घडावे असा विचार केला होता. तो अशारितीने प्रत्यक्षात उतरला. आपल्या मुलीपुढे वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी समाजसेवेचा जो आदर्श ठेवला त्यापेक्षा आणखी कोणते मोठे ‘गिफ्ट’ ते मुलीला देवू शकले असते ? त्यांच्या या मानवतावादी कृतीबद्दल त्यांचे रेल्वे विभागात अभिनंदन होत आहे.