शेती अकृषक करण्यासाठी मागितले पैसे

    24-May-2018
Total Views |

माजी आ.संतोष चौधरी यांची मुख्याधिकार्‍यांविरुध्द तक्रार

भुसावळ :
न. पा. हद्दीतील सर्व्हे क्रमांक १०३/१ मधील शेत जमीन अकृषक करण्यासाठी मुख्याधिकारी बी. टी. बाविस्कर यांनी ३ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप करीत माजी आ. संतोष चौधरी यांनी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला मुख्याधिकारी बाविस्कर यांच्यासह सात जणांविरुद्ध तक्रार दाखल केली.
 
 
तक्रारीत म्हटले आहे की, भुसावळ न. पा. हद्दीतील सर्व्हे क्रमांक १०३/१ याचे क्षेत्रफळ हेक्टर ०-९३ + पो. ख. हेक्टर ०-१ असे एकूण हेक्टर ०-९४ आर याचा आकार रुपये ९ पैसे या संपूर्ण शेतजमिनीपैकी मूळ मालकाच्या मालकीच्या शेतजमीन सामाईकातील दोन हिश्याची क्षेत्रफळ हेक्टर ०-६२.६६ आर ही शेतजमीन २४ ऑक्टोबर २००२ रोजी विकत घेतली आहे. ती अकृषक करुन मिळावी यासाठी न. पा. अभियंता अनिल भागवत चौधरी यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांसह आवश्यक शासकीय फी भरुन १९ मार्च २००९ रोजी अर्ज केला होता. तरीही कुठलीही हालचाल न झाल्याने व वारंवार पालिकेत फेर्‍या मारुन प्रकरणाचे काय झाले, असे विचारता संबंधित अधिकार्‍यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आले. संबंधीत कर्मचार्‍यांनी विका शुल्क भरण्याबाबत कळविल्याने दि. ८ नोव्हेंबर २०१३ रोजी १ लाख २६ हजार २१ रुपये नियमाप्रमाणे भरलेली आहे. तरी देखील जमिन अकृषक करुन मिळालेली नाही. याबाबत न. पा. अभियंता अनिल चौधरी तसेच कर्मचारी अख्तर खान युनूस खान यांच्याकडे विचारणा केली असता तुमची फाईल वरिष्ठांकडे पाठवायची असेल तर साहेबांना ३ लाख रुपये द्यावे लागतील तरच तुमचे काम होईल असे सांगण्यात आले.
 
 
माजी आ. संतोष चौधरी यांनी केलेली तक्रार खोटी व बिनबुडाची आहे. त्यांची फाईल २०१३ मध्ये इनवर्ड झाली होती. फाईल अपूर्ण असल्याने त्यांच्याच माणसाने फाईल परत नेली आहे. तसेच संतोष चौधरी यांनी उल्लेख केलेली १०१/३ ही मालमत्ता सरकार जमा असून निव्वड राजकारण म्हणून खोटे आरोप करत दबाव टाकण्याचा प्रयत्न आ. चौधरींकडून होत आहे.