नोटीफिकेशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 
 
मोबाईलशी नव्याने ओळख झाली तेव्हा जादूची पेटी हातात आल्यासारखे वाटले होते. सुरुवातीला landline प्रमाणे स्वतः उठून धावपळ करत फोनपर्यंत जावे लागत नाही तर आपण जिथे असू तिथे फोन आपल्याबरोबर येऊ शकतो, या गोष्टीचं अप्रूप वाटायचं. landline ची रिंग वाजल्यावर फोन उचलता आला नाही तर, कोणाचा फोन असेल ? अशी रुख रुख लागून राहायची. मोबाईलमुळे ते पण समजण्याची सोय झाली. खूप सोयीचं वाटायला लागलं. नंबर लक्षात ठेवण्याची, लिहून ठेवण्याची गरजच संपली.

watts app नावाचा जादुई चिराग जेव्हा मुलं वापरू लागली तेव्हा आपल्यालाही स्मार्ट फोन हवा अशी इच्छा जागी झाली. स्मार्ट फोन हातात आला आणि निरोपांची देवाणघेवाण सोपी झाली. लांब राहात असलेल्या आपल्या जिवलगांची विचारपूस करता येऊ लागली. त्यांना त्यांच्या सोयीच्या वेळेला उत्तर देण्याची मुभा होती. आपल्याला वेळ मिळेल तेव्हा संवाद सुरु करून ठेवण्याची मुभा होती. ही सर्व जादू घडत होती ती पण विनामूल्य. watts app च्या हातात हात घालून फेसबुक अवतरले. काही जुन्या मित्रमैत्रिणींचा मागोवा घेता आला. अनेक नवीन मैत्र संबंध जोडले गेले.

मोबाईलच्या विश्वातील अनेक नवनव्या शब्दांची भर शब्दसंग्रहात पडली. कायप्पा ( watts app ), फेबु, झुक्या या शब्दांची, तर ttyl, asap, gm, gntc अशा अनेक short forms ची ओळख झाली. मोबाईलचे शक्य असतील, सहज जमतील ते सर्व फायदे उठवणे सुरु झाले. जसजसा मोबाईलचा वापर वाढला अनेक नवीन शंका यायला लागल्या. एखाद्या साईट वर असताना अचानक एखादी जाहिरात अवतरू लागली. त्यातील काहींना पॉप अप म्हणतात अशी भर ज्ञानात पडली. असंच एकदा मोबाईलच्या स्क्रीनवर watts app चे मेसेज अवतरले. असे मेसेज आल्याची ती सूचना असते असे समजले. अशा बऱ्याच सूचना मोबाईल वर सारख्या येतच असतात.

Notifications म्हणजे सूचना. तसं म्हटलं तर सूचनांचा आपला संबंध अगदी जुना आहे. शाळेत शिपाई सूचनांचा कागद घेऊन येत असे तर महाविद्यालयात सूचना फलकांवर परीक्षा, स्पर्धा, सहली अशा अनेक विषयांच्या सूचना असायच्या. या notifications सारखी निसर्गाची पण notifications असतात असं लक्षात आलं! ही कल्पनाच खूप गंमतीची वाटली. निळ्या निरभ्र आकाशात अचानक आलेले काळे कुट्ट ढग हेच येऊ घातलेल्या वर्षा सरींचे notification असते. झाडांना फुटलेली तांबूस कोवळी पालवी चैत्राचे notification असते.


नव्या जन्माचे notification तर नऊ महिने आधी देतो निसर्ग! जन्माचे notification देतो तर निसर्ग मृत्यूचे पण notification देतो कां? तर्कसुसंगत विचार केला तर नक्कीच निसर्ग मृत्यूचे पण notification देत असणार! पण ते फारच कमी लोकांच्या लक्षात येत असावं. काही प्रतिभावान कवींनी आपल्या मृत्युच्या काही दिवस आधी मृत्यू संबंधी काव्य लिहिलेले आपण ऐकतो, तर राजकीय पटलावरील प्रभावी व्यक्तिमत्वे, आपल्या मृत्युच्या काहीच दिवस आधी केलेल्या भाषणांमध्ये आपल्या मृत्यूचा दाखला देतात. आध्यात्मिकदृष्ट्या महान पदावरील काही व्यक्ती तर आपल्या मृत्यूची वेळही सांगून ठेवतात. पण सामान्य माणसांना मात्र ही notifications समजतच नाहीत. किंवा त्यांचे अर्थच वेगळे लावले जातात. काही वेळा अति आत्मविश्वासामुळे दुर्लक्षही केले जाते. नित्य होणारी छातीतली जळजळ, पित्ताची समजून हलक्याने घेतली जाते. वारंवार उद्भवणारी डोकेदुखी स्वतःच्या मनाने औषधे घेऊन दबवली जाते. आत्तापर्यंत आपल्याला काहीच त्रास झालेला नाही त्यामुळे भविष्यातही होणार नाही, मी कोणाचे काही वाईट केलेले नाही त्यामुळे माझे काही वाईट होणारच नाही अशा भ्रामक समजुतींमुळे निसर्गाची notifications दुर्लक्षिली जातात.
 
 
कोणी असेही म्हणेल की त्यामुळे होणारे टळणार कुठे आहे? जे व्हायचे ते होणारच! खरे आहे, कारण अजूनतरी जन्म – मृत्यू निसर्गाने आपल्याच हातात ठेवले आहेत. मानवाने जन्मावर थोडा ताबा मिळवला आहे पण मृत्यूवर नाही. पण notification कडे लक्ष ठेवले तर सावध होणे शक्य आहे. उपाय योजनांसाठी पुरेसा अवधी उपलब्ध असणे शक्य आहे. आपल्यावर अवलंबून असलेल्या अनेकांची मानसिक तयारी करणे, आर्थिक तजवीज करणे शक्य आहे. एका व्यक्तीच्या मृत्यूमुळे त्याच्याशी संबंधित हर एक नात्याचा कायमचा मृत्यू होत असतो.

एक दिवस सर्वांनाच जायचे आहे असा सोयीचा अध्यात्मवाद काही वेळा मांडला जातो. पण घरातला कर्ता पुरुष जातो तेंव्हा मुलांच्या नशिबात अनाथ असण्याचे दुःख पदरात टाकून जातो, आपल्या वाट्याच्या जबाबदारी, एकट्या राहिलेल्या पत्नीच्या खांद्यावर, एकाकी पणाच्या दुःखासोबत देऊन जातो. घरातली कर्ती सवरती स्त्री जाते तेव्हा, मागे राहिलेल्या जोडीदारावर असहाय्यतेचं ओझं देऊन जाते, आई वेगळी मुलं मोठी करण्याचं आव्हान ठेऊन जाते. आजच्या काळा प्रमाणे, या situations ना उत्तरेही शोधली जातात पण त्या प्रत्येकाने केलेल्या व्यवहार्य तडजोडी असतात. गमावलेल्या नात्यांना पर्याय नसतात. घरातली तरुण मुले / मुली जातात तेव्हा आई वडिलांनी त्यांच्यासाठी पाहिलेल्या स्वप्नांची राख - रांगोळी होते. आपल्या लाडक्यांच्या बालपणीच्या आठवणींवर जगण्याची वेळ त्यांच्यावर ओढवते.

मान्य आहे की, मृत्यूवर मात करणे कोणालाही शक्य नाही पण म्हणून आपल्या मृत्यूची notifications आपणहून निसर्गाला द्यावीत का? धुम्रपान, मद्यपान, तंबाकू, या सारखी व्यसने निसर्गाला माणसाने दिलेली स्वतःच्या मृत्यूची notifications नाहीत कां? ही व्यसने ना करणारी माणसेसुद्धा मृत्यू पावतातच पण या व्यसनांमुळे मृत्यू येण्याची, विशेषतः अपमृत्युची शक्यता ( probability ) वाढते हे कोण नाकारू शकेल? गेलेला माणूस जगाच्या व्यवहारातून सुटतो. मर्त्य लोकातील त्याचा प्रवास संपतो. जगरहाटी सुरूच राहाते. कठीण काळ असतो तो मागे राहिलेल्यांचा. आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग समजत असलेल्या माणसाशिवाय, त्यांना जगायचे असते. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याबद्दल काहीच बोलता येत नाही. पण निसर्गाच्या notifications कडे अतिआत्मविश्वासामुळे किंवा निष्काळजीपणामुळे दुर्लक्ष करणे आणि आपल्या बेजबाबदार वागण्याला, मृत्यूला ना भिण्याच्या शौर्याचे लेबल लावणे, हे स्वीकार्य असू शकत नाही.
 
 
- शुभांगी पुरोहित 
@@AUTHORINFO_V1@@