रोहिंग्यांचे क्रूर अत्याचार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-May-2018   
Total Views |

 
रोहिंग्या मुसलमानांच्या समस्येने केवळ म्यानमारच नाही, तर बांगलादेश आणि भारतातही आत्यंतिक चिंतेचे वातावरण निर्माण केले. म्यानमारमधील रोहिंग्या आणि बौद्धांमध्ये उसळलेल्या दंगलींनंतर रोहिंग्यांनी बांगलादेश गाठले आणि काही हजार रोहिंग्यांनी बांगलादेशमार्गे मग भारतातही घुसखोरी केली. एकट्या बांगलादेशमध्ये सात लाख रोहिंग्या मुसलमान मदत छावणीत राहत असल्याचे आकडेवारी सांगते. गेल्या वर्षी याच विस्थापित रोहिंग्यांचा विषय चर्चेत आल्यावर त्यांच्याकडे सहानुभूतीपूर्वक आणि मानवतावादाच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे, असेही सूर कानी पडले. रोहिंग्यांवर म्यानमारमध्ये अतोनात अत्याचार झाले, त्यांनी बचावार्थ म्हणे प्रतिहल्ले चढवले, अशा भ्रमित करणार्‍या रंजककथाही रचल्या गेल्या. पण, म्यानमार सरकारला रोहिंग्यांना नियंत्रणात आणण्यासाठी बळाचा वापर का करावा लागला? कारण, रोहिंग्यांनी आधी खुसपटं काढून आणि नंतर दादागिरी करत बौद्ध आणि हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. हिंसाचार घडवून आणले. निरपराध्यांचे रक्त सांडले. क्रूरतेचा कळस गाठला. रोहिंग्यांनी केलेल्या याच अत्याचाराच्या अशाच काही क्रूरकथा ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ या मानवी हक्कांसाठी काम करणार्‍या जागतिक संस्थेने समोर आणल्या आहेत.
 
म्यानमारचा रखीने प्रांत हा रोहिंग्याबहुल प्रांत म्हणून ओळखला जायचा. २०१२ साली म्यानमारमध्ये रोहिंग्यांच्या हक्कांसाठी आवाज उठविणार्‍या, लढणार्‍या ‘अर्सा’ या सशस्त्र संघटनेची स्थापना करण्यात आली. सुरुवातीची काही वर्षं ही संघटना फारशी प्रकाशातही नव्हती, पण २०१६ साली रोहिंग्यांच्या हिताखाली या संघटनेने बौद्ध व हिंदू धर्मीयांना टार्गेट करायला सुरुवात केली. निष्पाप लहान मुले, बायकांनाही त्यांनी सोडले नाही. म्यानमारमधील पोलीस, सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांवरही ‘अर्सा’ च्या सशस्त्र टोळ्यांनी हल्ले चढवले. दिवसेंदिवस त्यांच्या हिंसात्मक कारवायांमध्ये वाढ होत गेली आणि त्यांची दहशत बौद्ध आणि हिंदूंच्या जीवावर बेतेल, अशी परिस्थिती निर्माण झाली.
 
‘अ‍ॅम्नेस्टी’च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, २०१७ साली म्यानमारमध्ये दंगली उसळलेल्या असताना तेथील माँगडो या गावातील १०० हिंदूंची अत्यंत क्रूरपणे ‘अर्सा’ ने कत्तल घडवून आणली. गावापासून थोड्या अंतरावर नेऊन तलवारीने त्यांची मुंडकी छाटण्यात आली. तलवारीवरील रक्ताचा धाक दाखवून बायका-मुलींमध्ये रोहिंग्यांची दहशत निर्माण करण्यात आली. २५ ऑगस्ट २०१७ च्या त्याच दिवशी बाजूच्या गावातील ४६ हिंदूही अचानक बेपत्ता झाल्याचे नंतर समोर आले. यामागेही ‘अर्सा’ चाच हात असल्याचे निष्पन्न झाले.
 
पुढे ‘अ‍ॅम्नेस्टी’च्या अहवालात अजून एक अशीच धक्कादायक घटना नमूद करण्यात आली आहे. म्यानमारमधून पळून आठ हिंदू महिला या बांगलादेशात पळाल्या. तेथेही रोहिंग्यांच्या छावणीत त्यांचा छळ करण्यात आला. पण, ‘अर्सा’ने त्या हिंदू महिलांचा व्हिडिओ तयार करून म्यानमारच्याच सैनिकांनी त्यांचा छळ केल्याचे सांगत कुभांड रचण्यात आले.
 
‘अर्सा’ ची दहशत ही आता म्यानमारमधून बांगलादेशपर्यंतही पोहोचली आहे. सोशल मीडियावरही हा सशस्त्र गट सक्रिय असून रोहिंग्या मुसलमानांना संघटित करण्याचे व बौद्ध-हिंदू समाजाविषयी विषपेरणी करण्याचे कुटील डाव इंटरनेटच्या माध्यमातून रचले जात आहेत.
 
त्यामुळे म्यानमार असो वा बांगलादेश, ‘अर्सा’ ची इतकी दहशत निर्माण झाली आहे की, कुणीही त्यांच्या विरोधात एक चकार शब्दही काढायला भीतीपोटी तयार होत नाही. त्यामुळे एरवी कुठल्याही देशाच्या सैन्याकडून विविध समाजघटकांवरील अत्याचारामुळे मानवी हक्कांचे हनन होत असल्याचे अहवाल देणार्‍या ‘अ‍ॅम्नेस्टी’ने यासंबंधित सत्यही जगासमोर आणले, ही निश्‍चितच एक समाधानाची बाब म्हणावी लागेल.
 
तेव्हा, ‘अर्सा’ असेल किंवा तत्सम कडवट इस्लामिक संघटना, यांना प्रत्यक्ष मैदानात आणि सायबर जगतातही वेसण घालणे गरजेचे आहे. यासाठी केवळ एका देशाने प्रयत्न न करता या समस्येने ग्रस्त देशांनी एकत्रितरित्या मिळून उपाययोजना केल्यास, त्या समस्येच्या मुळाशी जाऊन या घातक, राष्ट्रविरोधी शक्तींचा बिमोड करता येईल.


- विजय कुलकर्णी
@@AUTHORINFO_V1@@