इंदूरची आदर्श स्वच्छतानीती...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2018   
Total Views |


मध्य प्रदेशमधील इंदूर हे देशातील स्वच्छतम शहर म्हणून दुसर्‍या वर्षीही निवडले गेले आहे. तेव्हा, २०१८ च्या या स्वच्छता सर्वेक्षणावर टाकलेला हा दृष्टिक्षेप...

२०१८ सालातील स्वच्छतेच्या सर्वेक्षणानुसार देशातील सुमारे ४० कोटी नागरिक राहात असलेल्या ४२०३ शहरांमधून यावर्षी देखील इंदूर शहराला देशातील सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान मिळाला. दुसरा क्रमांकही मध्य प्रदेशातील भोपाळ शहराने पटकावला. हे सर्वेक्षण दि. ४ जानेवारी ते १० मार्च २०१८ या काळात केले गेले. गृहनिर्माण व नागरी खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री हरदीप पुरी यांनी ही स्वच्छ शहरांची निवड घोषित केली. ही निवड करण्यात विविध शहरांतील २७०० नागरिकदेखील सामील केले होते. स्वच्छ शहरांचे सर्वेक्षण ’स्वच्छ भारत नागरी अभियाना’च्या साध्याकरिता घेतले गेले.

’स्वच्छ भारत अभियाना’ विषयी थोडेसे


हे ’स्वच्छ भारत अभियान’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त म्हणजे २ ऑक्टोबर २०१४ रोजी नवी दिल्लीच्या राजघाट येथील उद्घाटनसमयी सुरू केले. देशात कायद्याने प्रस्थापित केलेली व पालिका असलेली अशी ४०४१ नगरे आहेत व शहरांतील रस्ते, मार्ग आणि पायाभूत सेवा कामे २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत (महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती) स्वच्छ करण्याचे निश्‍चित केले आहे.

या मोठ्या अभियानातील नागरी हिस्सा गृहनिर्माण व नागरी विकास खाते बघेल. यात ३० लाख सरकारी नोकरवर्ग, शाळेचे व कॉलेजचे विद्यार्थीदेखील सामील होतील.

पंतप्रधानांनी या अभियानात नऊ प्रसिद्ध व्यक्तींना बरोबर घेतले आहे. त्यापैकी काही नावे अशी आहेत - कपिल शर्मा, सौरभ गांगुली, किरण बेदी, पद्मनाभ आचार्य, सोनल मानसिंघ, रामोजी राव, अरुण पुरी. या अभियानात उघडपणे होणारी हागणदारी नष्ट करणे, अस्वच्छ शौचालये, मैला वाहून नेण्याची प्रथा पद्धत बंद करणे आणि घनकचरा निर्मूलन व्यवस्थापन करणे इत्यादी कामे सामील केली जातील.
या सर्वेक्षणाच्या खास निवडी...

या सर्वेक्षणाच्या आधारे २९ शहरे व कॅन्टोनमेंट बोर्डांना राष्ट्रीय स्तरावर बक्षिसे जाहीर केली, २० बक्षिसे विभागवार स्तराने आणि ३ राज्यांना बक्षिसे नागरी विभागातील उत्कृष्ट स्वच्छता कृतीकामाबद्दल दिली गेली. २०१८ चे सर्वेक्षण अनेक पटींनी व प्रकारांनी वाढविले आहे. ३७.६६ लाख लोकांकडून स्वच्छतेच्या कामाची माहिती जमविली आणि ५३.५८ लाख स्वच्छता मोबाईल अ‍ॅपचा वापर केला गेला तर स्वच्छता अ‍ॅपचा वापर नागरिकांनी १.१८ कोटी वेळेला केला.

२०१६ मध्ये ७३ शहरांच्या सर्वेक्षणानंतर म्हैसुरु हे सर्वात स्वच्छ शहर निवडले गेले, तर २०१७ मधील सर्वेक्षणात ४३४ शहरांमधून इंदूर शहर सर्वात स्वच्छ आढळले. इंदूर व भोपाळ या शहरांनी पहिला व दुसरा क्रमांक कायम ठेवला, कारण दुसर्‍या वर्षात त्यांनी स्वच्छ शहरांची बक्षिसे मिळविली. चंदीगड हे तिसर्‍या क्रमांकाचे स्वच्छ शहर ठरले. सर्व देशातील ३७.६६ लाख नागरिकांनी या सर्वेक्षणात भाग घेतला होता. हे नागरिक ४२०३ पालिकांचे प्रतिनिधित्व करत होते.

आंध्र प्रदेशच्या विजयवाडा शहराला मोठ्या शहरातील स्वच्छ शहर म्हणून, उत्तर प्रदेशच्या गाझियाबादला जलद गतीने स्वच्छता अभियान राबविले म्हणून (ते ३५६ स्थानावरून ३२ व्या क्रमांकावर पोहोचले आहे), ३ लाख ते १० लाख वस्ती असलेल्या शहरात भिवंडी - निजामपूरला व ३ लाखांपर्यंतच्या शहरात भुसावळला, १ लाखांपेक्षा लहान शहरांमध्ये पाचगणीला, नागरिक प्रतिसाद विभागातील उत्कृष्ट शहराचा मान अमरावती जिल्ह्यातील शेंदूरजनाघाट शहराला मिळाला, राजस्थानातल्या कोटा शहराला या अभियानात सगळ्यात जास्त नागरिकांचा सहभाग लाभला म्हणून, महाराष्ट्रातील नागपूर शहराला नाविन्यपूर्ण कल्पना राबविल्या म्हणून, त्यानंतर गोव्यातील पणजी शहराला आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांकरिता सासवडला, महाराष्ट्रातील नवी मुंबई शहराला घनकचरा निर्मूलन व्यवस्था चोख ठेवल्याबद्दल म्हणून, कर्नाटकच्या म्हैसुरु शहराला मध्यम प्रतीच्या शहरात सर्वात स्वच्छ शहर म्हणून, नवी दिल्ली पालिका परिषदेला लहान शहरात सर्वात स्वच्छ शहर म्हणून, घनकचरा व्य्वस्थापनात आंध्र प्रदेशातील तिरुपतीला, सर्व राज्यांच्या राजधानीच्या शहरांमध्ये मुंबईला स्वच्छतेचा प्रथम क्रमांक (यावर्षी १० वे स्थान, २०१७ मध्ये मुंबई २९ वी व २०१६ मध्ये १० वे स्थान व २०१४ मध्ये १४७ वे स्थान होते) अशी विविध मानबक्षिसे त्या शहरांनी पटकावली.

स्वच्छतेमध्ये सर्वात प्रथम कॅन्टोनमेंटची फीत दिल्लीला व त्या खालोखाल उत्तराखंडातील अल्मोरा, राणीखेत, नैनिताल, तामिळनाडू, चेन्नई येथील सेंट थॉमस माऊंट कॅन्टोनमेंट आणि हिमाचल प्रदेशातील शिमला येथील जुतोघ कॅन्टोनमेंटला मिळाले.
सर्व राज्यांमध्ये झारखंड या राज्याने चांगले स्वच्छताकाम केल्याबद्दल, त्या खालोखाल महाराष्ट्र आणि तिसरे बक्षिस छत्तीसगढला मिळाले.

इंदूरची निवड का?


इंदूर महापालिकेने (आयएमसी) दरवर्षीप्रमाणे व तेथील नागरिकांनी स्वच्छता अभियान योजना राबविण्याकरिता कष्ट घेतले व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. घरोघर जाऊन १०० टक्के वर्गीकरण करून वेगळा घनकचरा गोळा केला. सॅनिटेशनकडे जास्त लक्ष दिले.

देशातील सर्व शहरात घनकचरा गोळा करण्याकरिता २ कचराकुंड्या घेतल्या जात आहेत, तर आयएमसीने सुक्या कचर्‍याला निळ्या व ओल्या कचर्‍याला हिरव्या कुंड्या ठेवल्या. पण धोका निर्माण करणार्‍या कचरा गोळा करण्याकरिता (सॅनिटरी डायपर, नॅपकिन, मेडिसिन) तिसर्‍या कुंडीचा वापर करून विल्हेवाट लावण्याकरिता जैविक प्रक्रियेकरिता दुसरीकडे पाठविली. ‘आयएमसी’मध्ये भाजीपाला व फळफळावळीच्या मंडईमध्ये २० टन कचरा तयार होतो. पण, हा कचरा लँडफिल स्थानाला न पाठविता मंडईतल्या जैवप्रक्रिया केंद्राकडे पाठवावयाचे ठरविले. तेथे ३ प्रकारचे गॅस तयार होतात. मिथेन, कार्बनडाय ऑक्साईड व हायड्रोजन सल्फाईड. मिथेन गॅस वेगळा व स्वच्छ करून त्याचे शुद्धीकरण व दबावीकरण होईल. त्यानंतर तो जैव सीएनजीमध्ये बदली होऊन रोजच्या २० ते २५ बसेस चालविण्याकरिता इंधन म्हणून वापरात आणण्याचा ‘आयएमसी’चा विचार आहे. देशातील ‘आयएमसी’ हीच एकमेव पालिका अशा मंडईतल्या कचर्‍याचे इंधन बनविण्याच्या तंत्राचा उपयोग करणार आहे. हे इंधन बसमध्ये भरून ते वापरण्याला अजून सुरुवात करणे बाकी आहे, असे सल्लागार आसाद वारसी म्हणतात. मंडईतल्या घनकचर्‍याचे कंपोस्टमध्ये बदल करण्याचे तंत्रही ते वापरणार आहेत.
हे शहर हागणदारीतून मुक्त जानेवारी २०१७ रोजी झाले. ‘आयएमसी’ने जास्त सार्वजनिक व सामुदायिक शौचालये बांधली. ३०० मुतार्‍या बांधल्या. इंदूरमधूनच निवडून आलेल्या खासदार लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी इंदूर महापालिकेचे स्वच्छता पुरस्कार दुसर्‍यांदा पटकावल्याबद्दल अभिनंदन केले. त्यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रम इंदूरच्या विद्यापीठातून केला होता.

जगातील पहिली १० स्वच्छ शहरे कोणती?


दहावे - नॉर्वेमधील ओस्लो

जास्त वस्तीचे व गर्दीचे आणि बँकिंग व विविध औद्योगिक आस्थापने आहेत. सुंदर उद्याने, तलाव व हरित भागाने व्यापलेले आहे. अनेक पर्यटक चैनीकरिता व विश्रांतीकरिता येथे येतात.


नववे - ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन

लोकवस्ती दोन कोटींहून जास्त. चैनीच्या सुविधा असलेले थंड व स्वच्छ शहर. अनेक चैनीच्या सुविधांनी युक्त व संरक्षित असे शहर.

आठवे - फ्रान्समधील पॅरिस


विविध फॅशनच्या वस्तू खरेदी करण्याकरिता हे जगातील स्वच्छ शहर गणले जाते. स्वच्छ व गालिचा घातलेले असे सुंदर रस्ते व बांधलेली ट्रॅफिक प्रणालीयुक्त व थीम पार्क असलेले व पर्यटकांचे आकर्षण असलेले शहर.

सातवे - जर्मनीमधील फ्रायबर्ज


पर्यटकांचे आकर्षण विविध फुले व हरित टेकड्या. उद्याने व सुंदर झाडे. या शहराला फुलांचे शहर म्हणतात.

सहावे - युकेमधील लंडन


सुंदर रस्ते व स्वच्छ शहर. हवा अतिशय थंड व उत्साहवर्धक. पर्यटकांना थीम पार्क व म्युझियमचे मोठे आकर्षण.


पाचवे - आशियातील सिंगापूर


स्वच्छ व ५४ लाख लोकवस्तीचे शहर. येथे ३ प्रचलित भाषा - इंग्रजी, मलय व तामिळ. येथे अनेक उद्याने असल्यामुळे या शहराला उद्यान शहर म्हणून ओळखतात.


चौथे - न्यूझीलंडमधील वेलिंग्टन


हरित रस्ते व पर्यावरणाकडे जास्त लक्ष देतात. सुंदर उद्याने व येथे लोक खाजगी वाहनांपेक्षा सार्वजनिक वाहने पसंत करतात.


तिसरे - जपानमधील कोबे


श्रीमंत शहर व आधुनिक प्रकारची मलजलवाहिनी व प्रक्रिया केंद्रे असलेले शहर. येथील वाहने पर्यावरणाशी सख्य असलेली अशी आहेत. हे शहर पर्यावरण जपणारे आहे.

दुसरे - अमेरिकेमधील न्यूयॉर्क


अनेक उद्याने व म्युझियम असलेले व दुकानांची व रेस्टॉरंटची गर्दी.

पहिले - फिनलंडमधील हेलसिंकी


७८ लाख लोकवस्ती असलेले सुंदर बगिचे समुद्रकिनारे, हरित टेकड्या. आधुनिक विजेची उपकरणे व यंत्रांच्या उभारण्या. कारपेटेड रस्ते व सुंदर देखावे असलेले शहर.


त्यामुळे आपलेही शहर असेच स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा प्रत्येक नागरिकाने संकल्प केलाच पाहिजे.


- अच्युत राईलकर
@@AUTHORINFO_V1@@