स्वतःही मरू, दुसऱ्यालादेखील मारू..!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-May-2018   
Total Views |



 

स्वतःला मोठं होता येत नाही आणि दुसऱ्याची प्रगती बघवत नाही, त्यामुळे आपण स्वतःही खड्ड्यात उडी मारायची आणि दुसऱ्यालाही सोबत घेऊन मारायची, आणि दुसरा कसा खड्ड्यात पडला, याचाच आनंद मानायचा, आपल्या थोड्याफार उरलेल्यांनाही मानायला लावायचा, हेच गेले काही दिवस अव्याहतपणे सुरू आहे.
 
 
आपली रेषा जेव्हा मोठी करता येत नाही, तेव्हा दुसऱ्याची रेषा लहान करण्याचे प्रयत्न सर्रास होतात. त्यात कधी यश मिळतं तर कधी मिळत नाही. समजा, यश मिळालं तरीही आपली रेषा मात्र पूर्वीइतकीच खुजी आहे, याचं भान मात्र कित्येकांना राहत नाही. शिवसेना व त्यांचंच पिल्लू असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे याच गटात मोडतात. २०१९ जसं जवळ येऊ लागलं आहे, तसतसं या दोन्ही पक्षांच्या शीर्षस्थ नेतृत्वाचं विघ्नसंतोषी वागणं अधिकच प्रकर्षाने समोर येऊ लागलं आहे. तिकडे दक्षिणेत नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्याकडून आलेल्या प्रतिक्रिया, पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने केलेलं कृत्य, हे सारं याच मनोवृत्तीतून आलेलं आहे. स्वतःला मोठं होता येत नाही आणि दुसऱ्याची प्रगती बघवत नाही, त्यामुळे आपण स्वतःही खड्ड्यात उडी मारायची आणि दुसऱ्यालाही सोबत घेऊन मारायची, आणि दुसरा कसा खड्ड्यात पडला, याचाच आनंद मानायचा, आपल्या थोड्याफार उरलेल्यांनाही मानायला लावायचा, हेच गेले काही दिवस अव्याहतपणे सुरू आहे. 
  
एखाद्या राजकीय पक्षाच्या प्रमुखपदापर्यंत पोहोचण्यासाठी जे करावं लागतं, ते यांच्यापैकी कुणालाही करावं लागलेलं नाही. उलट, ते ज्यांच्याविरोधात रोज उठून आगपाखड करत आहेत, त्यांना कोणत्याही गॉडफादरशिवाय, आडनावाशिवाय, अक्षरशः शून्यातून सुरूवात करत स्वकष्टाने ते कमवावं लागलेलं आहे. मात्र तरीही हे दोन्ही ठाकरे बंधू अशा थाटात वावरतात की जणू काही यांच्यामुळेच हा देश उभा आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनसे अध्यक्ष आणि गेल्या कित्येक वर्षांपासूनचे भावी मुख्यमंत्री राज ठाकरे यांनी या निकालाचं श्रेय इव्हिएम मशीनला दिलं. त्यांच्याकडून ही अशीच काहीतरी प्रतिक्रिया अपेक्षित होती म्हणा. कारण, एखादी निवडणूक जिंकायची असेल तर त्यासाठी वर्षानुवर्षं तिथे पक्षबांधणी करावी लागते, कार्यकर्त्यांचं जाळं विणावं लागतं, घराघरात संपर्क वाढवावा लागतो, गावोगावी फिरून मतदारसंघ पिंजून काढावे लागतात, मतदारांसमोर काहीतरी ठोस भूमिका मांडावी लागते, आणि असं बरंच काही करावं लागतं. राज ठाकरे यांनी यातलं काहीच केलेलं नाही आणि पुढेही करण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे ते निवडणुकीत जिंकतही नाहीत आणि पुढेही जिंकण्याची शक्यता दिसत नाही. शिवाय, दुसऱ्याने केलेली नेत्रदीपक कामगिरी बघवतही नसल्याने मग ते अशी शेरेबाजी करत राहतात. त्यापेक्षा जर स्वतःच्या पक्षबांधणीकडे अधिक लक्ष दिलं, वेळ दिला तर ते त्यांच्या अधिक फायद्याचं ठरेल. मध्यंतरी म्हणे राज ठाकरे एका कार्यकर्त्याच्या घरी गेले आणि जमिनीवर बसून जेवले. सोशल मिडियावरून त्या भोजनाचा फोटो बराच फिरत होता. राज ठाकरे ग्रामीण कार्यकर्त्याच्या घरी खाली बसून जेवले, याचा अर्थ मनसेचा शहरी तोंडावळा बदलणार वगैरे वगैरे. असं खरंच होणार असेल तर ती आनंदाचीच गोष्ट आहे. परंतु नुसतं असं कधीतरी पर्यटनाला गेल्याप्रमाणे गोरगरीब कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन जमिनीवर बसून जेवल्याने पक्ष वाढत नसतो. त्याची सोशल मिडीयावर प्रसिद्धी करून तर मुळीच वाढत नसतो. कार्यकर्त्याचं भावविश्व त्यासाठी समजून घ्यावं लागतं. राज ठाकरे ज्यांच्यावर चक्क इव्हीएम मशीनवरून शेरेबाजी करत आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांचं भावविश्व त्यांनी समजून घेतलं तरी पुष्कळ आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे शून्यातून वर आलेली, कार्यकर्ता जीवन जगलेली आहेत. आजही अमित शाह गावोगाव कार्यकर्त्यांच्या घरी जातात, जमिनीवर बसून जेवतात. त्याचं ना त्यांना आश्चर्य वाटतं ना कार्यकर्त्यांना. ना त्यांना त्या जेवणांची सोशल मीडियावरून प्रसिद्धी करावी लागत. कारण, ती संस्कृतीच कार्यकर्त्यांची आहे. ही एवढी साधी बाब जरी राज ठाकरे यांनी समजून घेतली तरी पुष्कळ होईल. इव्हिएम मशीनच्या नावाने शिमगा करून, मग लोकांकडून स्वतःच्या नावाचा झालेला शिमगा पाहण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही.
 
राहता राहिली गोष्ट ती शिवसेना पक्षप्रमुखांची. कर्नाटक निकालानंतर लोकांच्या इव्हिएम मशीनबाबतच्या शंका-कुशंका मिटवण्यासाठी निवडणुका मतपत्रिकेद्वारे घ्याव्यात असा सल्लाच त्यांनी देऊन टाकला. यांचं दरवेळी एकेक नवीनच काहीतरी असतं. म्हणे, इव्हिएमवर शंका घेत मतपत्रिकांची मागणी करण्याआधी त्यांनी किमान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या मतपत्रिकांबाबत एकेकाळी केलेली टीका तरी वाचायला हवी होती. बरं, ते नाही तरी किमान, उद्धवजी ज्या मोमोता बॅनर्जी यांना मुंबईत काही महिन्यांपूर्वीच वाजतगाजत भेटले, त्यांच्या पश्चिम बंगालमध्ये मतपत्रिकांची काय अवस्था करण्यात आली, हे तरी त्यांनी माहिती करून घ्यायला हवं होतं. अर्थात, हिंदुहृदयसम्राटांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या विद्यमान नेतृत्वाला पश्चिम बंगालमधील सध्याच्या बऱ्याच गोष्टी माहित करून घेण्यासारख्या आहेत. मोमोतादीदींचं मुस्लिम तुष्टीकरणाचं फसलेलं धोरण, त्या अट्टाहासापोटी तेथील बहुसंख्यांक हिंदूंची होत असलेली होरपळ वगैरे वगैरे. आज जर बाळासाहेब असते तर त्यांनी अशा मुख्यमंत्र्याला कधीही मातोश्रीची पायरी चढू दिली नसती. पण, उद्धव ठाकरे स्वतः मातोश्रीमधून बाहेर पडून दीदींना भेटले. कडवट हिंदुत्व वगैरे मुद्दे मुद्दे राजकारणापुढे खुजे ठरले. कारण, सेनानेतृत्वाचा हिंदुत्वाचा हेतू कधीच इतिहासजमा झाला आहे. आता केवळ आपल्या सहयोगी पक्षाची रेष कशी लहान करता येईल, हाच एकमेव अंतःस्थ हेतू त्यांच्या मनात शिल्लक असलेला दिसत आहे.
 
पालघर लोकसभा निवडणूक, किंवा विधानपरिषद पोटनिवडणुका आदींमध्ये शिवसेनेने जे काही चालवलं आहे, त्यातून हाच हेतू स्पष्ट होतो. पालघरची जागा भाजपची, शिवसेनेने आयात केलेला उमेदवार भाजपचाच. विधानभवनात पत्रकारांशी बोलताना शिवसेनेचे जे ‘वाघ’, चिंतामण वनगांना श्रद्धांजली म्हणून पालघर निवडणूक बिनविरोध करण्याची भाषा काही महिन्यांपूर्वी करत होते, त्यांनीच श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेत आणलं. आता तेच त्यांना घेऊन पाद्र्यांपासून सगळ्यांच्याच दारोदारी फिरत आहेत. कशासाठी? तर दुसऱ्याची रेषा छोटी करण्यासाठी. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीला केवळ एक वर्ष उरलेलं असताना, पालघर जिंकण्यासाठी सेनेने जो आटापिटा चालवला आहे, त्यातून हेच पुन्हापुन्हा समोर येतं. उरलेल्या वर्षभरात आपलं महत्व वाढवावं, जेणेकरून लोकांनी आपल्याला गांभीर्याने घ्यावं, याचसाठी हा सारा आटापिटा. त्यांचे ते सुपर प्रवक्ते संजय राऊत हेही असेच कुठेही काहीही बोलत असतात. मात्र, त्यांना कुणी गांभीर्याने मात्र घेत नाही. मध्यंतरी ते म्हणाले की, आमचा मुका घेतला तरी युती करणार नाही. आता यावर हसावं की रडावं, तेच आपल्यासारख्या सर्वसामान्यांना कळायचं नाही. राऊत यांचे विधान पाहता, सभ्य संस्कृतीतील व्यक्तींनी टीका करावी, इतपत त्याचा दर्जा निश्चितच नाही. परंतु, मुळात युतीसाठी मुका द्यावा किंवा घ्यावा लागत असेल, तरी तो राऊत यांचा घेतला जाईल, हे कोणत्याही सभ्य व्यक्तीला पटणारं नाही. तेव्हा, शिवसेना काय किंवा मनसे काय, एकच माळेचे मणी. यांचं हे विघ्नसंतोषीपणच एखादेवेळी त्यांचा घात करणारं ठरू शकतं. अर्थात, त्यांची त्यांना काहीच पर्वा दिसत नाही. कारण, दुसऱ्याला मारणं आणि अंतिमतः कार्यनाश करणं, हाच त्यांचा अंतिम उद्देश असल्याचं वारंवार स्पष्ट होत आहे.
 
 
- निमेश वहाळकर 
 
@@AUTHORINFO_V1@@