समृद्धीसाठी स्थलांतर आवश्यक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
 
 
 
मुंबई शहरात सतत येणारे परप्रांतीय लोक हा सगळ्यांच्या चिंतेचा एक आवडता विषय असतो. अगदी सुरुवातीला, म्हणजे इंग्रजांनी मुंबई विकसित करायला सुरुवात केली तेव्हा प्रथम सुरतेहून गुजराती आणि पारशी लोक आले. मग मारवाडी आले. नंतर महाराष्ट्रातूनच कोकण आणि पुणे-सातारा जिल्ह्यांमधून आलेले लोक गिरण्यांमध्ये भरले. मग दक्षिण भारतीय आले. आता उत्तर भारतीय येत आहेत.
 
वेळोवेळी झालेल्या या स्थलांतरितांचं नीट निरीक्षण केलं, तर असं आढळतं की, ते जेव्हा इथे आले तेव्हा गरीब अथवा मध्यमवर्गीयच होते. मेहनत, सातत्य, चिकाटी या गुणांनी त्यांनी आपला उत्कर्ष करून घेतला. आता या प्रकारात किती विलक्षण विरोधाभास आहे. पाहा! कोकणी माणूस हा खुद्द कोकणात स्वत: काहीही न करणारा आणि दुसरा काही करू पाहत असेल, तर त्याला खाली खेचणारा, म्हणून प्रसिद्ध आहे. पण, हाच कोकणी माणूस मुंबईच्या गिरण्यांमध्ये अफाट मेहनती म्हणून प्रसिद्ध होता. तामिळनाडू किंवा उत्तर प्रदेशात जाऊन तिथल्या कुणा परिचिताला विचारा की, तुमच्याकडची माणसं कामाला कशी आहेत हो? उत्तर हेच मिळेल की, आमचे लोक अत्यंत आळशी, अव्वल दर्जाचे कामचुकार, फक्त मोठ्यामोठ्या बाता मारण्यात पटाईत आहेत. पण, हेच ‘मद्रासी’ आणि ‘भय्ये’ (मुंबईत त्यांना हीच विशेषणं वापरतात) मुंबईत मेहनत करून, स्वत:चा उत्कर्ष करून घेताना दिसतात.
 
जो स्थलांतर करतो, तो समृद्ध होतो आणि जो फार काळ एकाच ठिकाणी थांबतो, त्याची अवस्था साचलेल्या डबक्यासारखी होते, असा निष्कर्ष यातून काढायचा का? चरैवेति, चरैवेति- चालत राहा, चालत राहा, असा संदेश आपल्या उपनिषदकर्त्या ऋषींनी हजारो वर्षांपूर्वी देऊन ठेवलाय, त्यात हाच भाव आहे का? असावा असं म्हटलं पाहिजे, कारण नुसत्या मुंबईत, महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरात असंच दृश्य दिसतं. महाराष्ट्र हे देशभरातलं सर्वाधिक पुढारलेलं राज्य, इथे रोजगाराच्या संधी पुष्कळ, म्हणून देशभरातून लोक इथे येतात. किंबहुना येत असत, त्याचप्रमाणे जगभरातून लोक पूर्वी युरोपात जात असत. आता अमेरिकेत जातात. पूर्वी आशिया-आफ्रिका खंडांतल्या देशांमधले लोक रोजगारासाठी मुख्यत: ब्रिटन आणि फ्रान्समध्ये जात, कारण या दोन देशांच्या वसाहती आशिया- आफ्रिकेत फार मोठ्या प्रमाणावर होत्या. वसाहतींमधले लोक आपल्या साम्राज्यधान्यांमध्ये म्हणजे लंडन आणि पॅरिसला जाऊन, स्वत:चा उत्कर्ष करून घेण्याचा प्रयत्न करीत, एकेकाळी आपल्याकडे लंडनला जाऊन एफ. आर. सी. एस. डॉक्टर होऊन येणं किंवा बॅरिस्टर होऊन येणं हे केवढ्या प्रतिष्ठेचं मानलं जात असे! पण, त्याच्या अगोदर खुद्द युरोपतले लोक नव्या संधींच्या शोधासाठी ऑस्ट्रेलियात आणि अमेरिकेत शिरले होते. दोन्ही ठिकाणी त्यांना सोन्याच्या खाणी सापडल्या. दोन्ही ठिकाणच्या स्थलांतरितांनी दीर्घोद्योग आणि चिकाटी यांच्या जोरावर आपला उत्कर्ष करून घेतला. अर्थात हे करीत असताना त्यांनी ऑस्ट्रेलिया, अमेरिकेच्या मूळ रहिवाशांची सरळ कत्तल केली, हे विसरून चालणार नाही, पण तरीही स्थलांतरित युरोपीय लोकांनी प्रचंड उद्यम केला हा मुद्दा आहेच.
 
दुसर्‍या महायुद्धात युरोप खंडातलं मनुष्यबळ फार खच्ची झालं. त्यांना आपले देश उभे करायला माणसं हवी होती. ब्रिटनमध्ये पाकिस्तान आणि भारतातून माणसं गेली. फ्रान्समध्ये आफ्रिकन देशांमधून लोक गेले, जर्मनीत तुर्कस्तानातून मोठी भरती झाली. पन्नास-साठ वर्षांपूर्वी स्थलांतरित झालेले हे सर्व लोक आज चांगलेच संपन्न आहेत आणि त्यांची ही सुस्थिती पाहून स्थानिक मंडळींच्या पोटात कालवाकालव होत आहे. महायुद्धोत्तर काळात अमेरिकेत तर सगळ्या जगातूनच स्थलांतरितांचे लोंढे लोटले. युरोपीय होतेच, पण चिनी, जपानी, भारतीय, पाकिस्तानी, कोरियन्स हेही फार मोठ्या प्रमाणावर गेले, आजही जातच आहेत. हार्वर्डमधून एम.बी.ए., एम.डी. किंवा पी.एच.डी. करणं ही आज आपल्याकडे प्रतिष्ठेची बाब आहे. अमेरिकेतले स्थलांतरित आज अत्यंत संपन्न स्थितीत आहेत. जपानच्या औद्योगिक प्रगतीचा झपाटा अमेरिकेच्या पोटात गोळा आणतो आहे, तर चिनी आणि भारतीय विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता स्थानिक अमेरिकन विद्यार्थ्याला स्पर्धेतून बादच करायला निघालेली आहे. ढासळती कुटुंबव्यवस्था, जवळपास निकालातच निघालेली विवाहसंस्था हे अमेरिकेच्या चिंतेचे विषय आहेत आणि त्या तुलनेत भारतीय व चिनी स्थलांतरितांची एकत्र कुटुंबव्यवस्था, कौटुंबिक मूल्यव्यवस्था, नवरा-बायकोची एकमेकांवरची निष्ठा, विश्वास या गोष्टी अमेरिकेला मत्सर वाटायला लावत आहेत.
 
१९७० च्या दशकापासून स्थलांतरितांचा लोंढा अरब देशांकडे वाहू लागला. तेलखाणी व संबंधित उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर निघाले. त्यासाठी कुशल कामगारांची गरज होती. त्यामुळे मुख्यत: भारत आणि पाकिस्तानातून फार मोठ्या प्रमाणावर कुशल कामगार मध्य पूर्वेत गेले. आज हे स्थलांतरित चांगलेच संपन्न आहेत. अरब देशांमध्ये दुबईत, इंग्लंडच्या साऊथ हॉल भागात आणि अमेरिकेत न्यू जर्सीमध्ये भारतीयांची इतकी दाट वस्ती आहे की नव्याने तिथे गेलेल्यांना आपण भारतातच असल्यासारखं वाटतं, असं म्हणतात. स्थलांतरितांची संपन्नता पाहून हल्ली अरबांच्याही पोटात दुखू लागलं आहे. स्थलांतरितांमध्येही हिंदू आणि मुसलमानांनी आपापली विशेषता राखलेली दिसते. ब्रिटनमध्ये, अमेरिकेत, ऑस्ट्रेलियात हिंदू स्थलांतरितांनी चर्चेस विकत घेऊन मंदिरं बांधली, स्वामी प्रभुपादांच्या हरे राम हरे कृष्ण चळवळीने अमेरिकन तरुण पिढीला आकर्षून घेतलं. पण, हिंदूंनी त्या त्या देशांच्या विरोधी काहीही कृत्य केलेलं नाही. हिंदू लोक त्या देशांच्या स्थानिक राजकीय पक्षांमधून जबाबदारीची पदंही भूषवित आहेत. पण, त्यांनी एक जमात म्हणून आपल्याला विशेष अधिकार मिळावेत, अशी मागणी कधीही केलेली नाही.
 
ब्रिटनमधले पाकिस्तानी मुसलमान, फ्रान्समधले अल्जिरियन अरब आणि जर्मनीतले तुर्क हे आता त्या त्या देशांना डोकेदुखी ठरत आहेत. हे लोक जेव्हा स्थलांतरित म्हणून आले तेव्हा अन्नाला मोताद होते. पडेल ते काम करू, पण पोटाला घाला, अशीच त्यांची स्थिती होती. पण, आता त्यांची त्या देशातली दुसरी- तिसरी पिढी चालू आहे. ते चांगले संपन्न आहेत. लगेच त्यांच्या राजकीय आकांक्षा वाढू लागल्या आहेत. त्यांना विशेष राजकीय अधिकार हवे आहेत. स्वतंत्र मतदारसंघ हवे आहेत. त्यांच्या मुलींना शाळेच्या गणवेशावरून बुरखा घालण्याची खास परवानगी मिळावी, अशी त्यांची मागणी आहे. त्यासाठी आंदोलनं करणं, न्यायालयात धाव घेणं आणि आता तर दंगल करण्याइतपत प्रगती त्यांनी साधली आहे.
 
अमेरिकेने अरब स्थलांतरितांच्या कर्तबगारीचा हिसका ११ सप्टेंबर २००१ रोजी पाहिला. त्यामुळे तिनं स्थलांतरितांवर प्रचंड निर्बंध आणले. याचा फटका, उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाऊ पाहणार्‍या देशोदेशीच्या विद्यार्थ्यांना बसला. साहजिकच त्यांचा ओघ आता पुन्हा एकदा युरोपकडे वळला आहे. त्यात भाषेच्या सोयीमुळे भारतीय विद्यार्थी अर्थातच, ब्रिटनमध्ये जात आहेत. लगेच तिथेही त्यांनी आपली चमक दाखवायला सुरुवात केली आहे. ब्रिटिश प्राध्यापकांना भारतीय विद्यार्थी आवडू लागले आहेत. ज्यांची मातृभाषाच इंग्रजी आहे. अशा ब्रिटिश विद्यार्थ्यांपेक्षाही या भारतीय विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषा, इंग्रजी वाक्यरचना सफाईदार असते, असं ब्रिटिश प्राध्यापकच म्हणत आहेत. या सगळ्यातून मनुष्य स्वभावातल्या काही वैशिष्ट्यांवर प्रकाश पडतो का? ही पोरं इथे असताना नुसत्या उनाडक्या करीत असतात, तिथे गेल्यावर एकदम कशी चमकायला लागतात? हे लोक इथे असताना आळशी, रिकामटेकडे असतात, तिकडे गेल्यावर एकदम कसे कष्टाळू, उद्योगी होतात? जो स्थानिक असतो, त्याचं बस्तान बसलेलं असतं. त्याला नवीन फार मिळवायचं नसतं. जे आहे तेच राखायचं असतं. त्यामुळे त्याची जीवनऊर्जा तो फारशी वापरतच नाही. याउलट जो स्थलांतरित असतो, तो अधांतरी असतो. त्याला आपलं बस्तान या नव्या, अपरिचित ठिकाणी बसवायचं असतं. त्यासाठी तो सतत परिश्रम करतो. सुबत्ता, स्थैर्य, प्रतिष्ठा यासाठी जोराने धडपड करतो. आपली सारी जीवनऊर्जा त्या दिशेने जोमाने वापरतो. साहजिकच काही काळाने त्याला या सार्‍या गोष्टी प्राप्त होतात आणि मग स्थलांतरितांच्या या समृद्धीने स्थानिकांच्या मनात मत्सर जागृत होतो. आता समृद्धीमुळे झालेल्या स्थलांतराचा गमतीदार किस्सा पाहा. १९६० ते ७० च्या दशकात दक्षिण कोरिया या कंगाल देशातून किमान दहा हजार खाणकामगार पश्चिम जर्मनीत गेले. जवळपास तेवढ्याच संख्येने महिलाही गेल्या. या सर्व जणी परिचारिका होत्या. हे सर्व जण तिथे पोटापाण्याला लागले. काहींनी पुढे शिक्षण घेतलं. काहींनी आपापसात विवाह केले, तर काहींनी जर्मन जोडीदार निवडले. दीड-दोन दशकांमध्ये त्यांची आर्थिक स्थिती बर्‍यापैकी झाल्यावर त्यांनी स्वत:ची वाहनं घेतलं, घरं घेतली. त्यांची मुलं जर्मन शाळांमधून शिकू लागली. आज ही सगळीच मंडळी साठीच्या पलीकडची म्हणजे निवृत्त आहेत. सगळ्यांची आर्थिक स्थिती चांगलीच संपन्न आहे. सगळ्यांची मुलं जर्मनीतच कार्यरत आहेत. दक्षिण कोरियन सरकारच्या डोक्यात असं आलं की, या निवृत्त लोकांना पुन्हा कोरियात बोलावलं तर? सरकारने ‘जर्मन व्हिलेज’ या नावाने एक गावच वसवलं. जमीन दिली. आणखी काही सोयी सवलती दिल्या. त्या स्थलांतरितांच्या देशप्रेमाला आवाहन केलं.
 
आता जर्मन व्हिलेजमध्ये बरेच बंगले झाले आहेत. बरेच बांधले जात आहेत. अनेक निवृत्त स्थलांतरित पुन्हा आपल्या मायभूमीत परतून आपापले छंद जोपासत सुखाने निवृत्त जीवन घालवत आहेत. त्यांची मुलं नातवंडं अर्थातच जर्मनी सोडायला तयार नाहीत. मग अधून मधून ते इकडे येतात, हे तिकडे जातात, असं चालू आहे. दक्षिण कोरियन सरकार आता याच पार्श्‍वभूमीवर अमेरिकेत गेलेल्या कोरियन स्थलांतरितांसाठी अमेरिकन व्हिलेज काढायचा विचार करीत आहेत.
 
 
 
 
 
- मल्हार कृष्ण गोखले 
 
@@AUTHORINFO_V1@@