कर्नाटकाचा भगीरथ मसागी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2018   
Total Views |
 
 
 
४२०० हून अधिक जलसंवर्धन प्रकल्प, पाचशेहून अधिक तलाव, दोन हजारांपेक्षा जास्त बोअरवेल्स बांधणारे कर्नाटकातील ५९ वर्षीय मसागी यांच्या समाजोपयोगी कामाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये झाली आहे.
 
बंगळुरुपासून ४७० किमीवरील गदग या दुष्काळी प्रदेशात अय्यपा मसागी यांचा जन्म झाला. पहाटे ३ वाजता उठून आईबरोबर कित्येक मैल पिण्याच्या पाण्यासाठी केलेली पायपीट महिना ५५ हजार रुपये कमावणारे ‘प्रोजेक्ट मॅनेजर’ झाल्यावरही ते विसरले नव्हते. पूर्ण वेळ पाण्याची समस्या सोडवण्यासाठी काम करायचं त्यांनी ठरवलं. ४२०० हून अधिक जलसंवर्धन प्रकल्प, पाचशेहून अधिक तलाव, दोन हजारांपेक्षा जास्त बोअरवेल्स त्यांनी बांधले आहेत. पृथ्वीचा ७१ टक्के भूभाग पाण्याने व्यापलेला आहे आणि उर्वरित २९ टक्के भाग जमिनीचा आहे. या ७१ टक्क्यांपैकी सांडपाणी, वापरायचं पाणी, समुद्राचं खारे पाणी, हिमालयात बर्फ स्वरूपात गोठलेलं पाणी वगळता मानवाला पिण्यासाठी उपयुक्त असलेल्या पाण्याचं प्रमाण केवळ ०.०१ टक्के एवढं आहे. म्हणूनच आता तिसरं महायुद्ध झालं तर ते पाण्यासाठी होईल, असंही म्हटलं जातं.
 
पृथ्वीवर पिण्यायोग्य पाण्याचं प्रमाण हे केवळ ०.०१ टक्के असलं तरी मानवी शरीरात पाण्याचं प्रमाण साधारण ६० टक्के आहे, यावरून पाण्याची किती गरज आहे आणि उपलब्ध पाण्याचं प्रमाण किती आहे, हे लक्षात येतं आणि आपण ते किती काळजीपूर्वक वापरायला हवं, हे जाणवतं. पृथ्वीवर पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब जर योग्य पद्धतीने साठवला गेला, तर नक्कीच जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ होईल.
 
मसागी यांनी अभियांत्रिकी विषयात पदविका घेतली आणि वीस वर्षे याच क्षेत्रात नोकरी करत राहिले. बंगळुरु येथे ते ‘लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो’ मध्ये मोठ्या पदावर होते. आयुष्य सुखात जात होतं. सगळी सुखं हात जोडून उभी होती; पण लहानपणीचे दिवस ते विसरले नव्हते. तेव्हाचं पाण्याच्या दुर्भिक्षाचं भीषण वास्तव त्यांना गप्प बसू देत नव्हतं. शेवटी अचानक एक दिवशी त्यांनी सुखासीन नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ पाण्याची समस्या सोडवण्यासाठी काम करायचं ठरवलं. ते जलसंवर्धन प्रकल्पांकडे वळले. लोकांनी, अगदी घराच्या माणसांनीसुद्धा त्यांना वेड्यात काढलं. चार मुलांचं पालनपोषण कसं करणार, असा प्रश्न बायको विचारू लागली.
 
मग त्यांना अचानक गावी जाऊन शेती करावी वाटली. त्यांची ही कल्पना अनेकांनी हास्यास्पद ठरवली. त्याला कारणही तसेच होते. त्यांच्या गावी पाण्याची टंचाई होती, कूपनलिका कोरड्या पडल्या होत्या आणि शेती तोट्यातच होती. तरीही मसागी यांनी १९९४ साली गदग जिल्ह्यातील गजेंद्रगड या आपल्या गावी सहा एकर जमीन विकत घेतली आणि शेती सुरू केली. पावसाळ्यात पूर आणणारे पाणी आणि नंतर त्याचीच टंचाई हे पाहिल्यावर त्यांनी पाणी अडविण्याचे प्रयत्न सुरू केले. पुढे पाचच वर्षांमध्ये त्यांनी आपल्या पद्धती व स्थानिक भागातील परंपरागत ज्ञानाचा उपयोग करून पाण्याच्या परिस्थितीत चांगले बदल घडवून आणले. त्याचे महत्त्व घरच्या लोकांना पटलेच, शिवाय त्यांची कीर्ती दूरपर्यंत पसरू लागली. २००१ ते २००४ या काळात उत्तर कर्नाटकसह दक्षिण भारताच्या बहुतांश भागात दुष्काळी स्थिती होती. या काळात पाण्याच्या संवर्धनाचे महत्त्व लोकांना आणि सरकारलाही पटले. त्यामुळे त्यांचे प्रयोग स्वीकारले गेले. त्या भागात दुष्काळ होताच, शिवाय कूपनलिकांद्वारे भूजलाचा वाट्टेल तसा उपसा झाल्याने जमिनीतील पाण्याचे साठे कोरडे झाले होते. पाणी नसल्याने शेतीत नुकसान, परिणामी हजारो शेतकर्‍यांच्या आत्महत्या हे दुष्टचक्र तसेच, मोठ्या धरणांमुळे लहान तळी-तलावांकडे दुर्लक्ष झाल्यानेही ही समस्या कशी उद्भवली हेही त्यांनी समजून घेतले. एकट्या कर्नाटकात ६५ हजार तलावांपैकी २५ हजार तलाव एकतर दुर्लक्षामुळे बुजले आहेत किंवा अतिक्रमण करून संपविले आहेत. या कारणांमुळे पाण्याची समस्या तीव्र बनल्याचे त्यांचे मत आहे. त्यामुळेच शेतकर्‍यांना पाण्याबाबत स्वावलंबी करण्यासाठी पाण्याच्या पुनर्भरणाचे प्रयोग हाती घेतले. पाण्याच्या संकटाला अनियंत्रित वापर असलेल्या कूपनलिका जबाबदार होत्या. पण, मसागी यांनी याच कूपनलिकांचा वापर पावसाचे पाणी पुन्हा जमिनीत सोडण्यासाठी केला. पावसाच्या पाण्यापैकी केवळ २५ टक्के पाणी अडविता आले, तरी गावांची तहान भागेल, असे ते मानतात. त्या दृष्टीने यशापयश अनुभवत त्यांनी प्रयोग राबविले. आतापर्यंत त्यांनी कर्नाटकसह गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये भूजल पुनर्भरणाचे ३६ हजारांहून अधिक ठिकाणी प्रयोग राबविले आहेत. त्याचे फायदे शेकडो गावांना कळून चुकले आहेत. त्यामुळेच कर्नाटकमध्ये हजारो लोकांच्या मनात जलसाक्षरता रुजविण्यात ते यशस्वी झाले आहेत. पण, एवढ्यावरच न थांबता ते सतत कार्यरत आहेत. कारण, त्यांना संपूर्ण कर्नाटक राज्यच जलसाक्षर करायचे आहे. त्याद्वारे भूजलाच्या पातळीचे पुनरुज्जीवन करायचे आहे आणि पुढील पिढ्यांसाठी अधिक प्रमाणात जलस्रोत उपलब्ध करून द्यायचा आहे. त्यासाठी जलसंवर्धनाच्या जोडीनेच पर्यावरणसुसंगत धोरणांचा पाठपुरावा व लोकांनी पर्यावरणसुसंगत जीवन जगावे यासाठी ते प्रचार करत आहेत. त्यांच्या या ‘पाणीदार’ कार्याला शुभेच्छा!
 
 
 
 
 
 
- तन्मय टिल्लू

 
 
@@AUTHORINFO_V1@@