चार चंद्रपूरकर आदिवासी विद्यार्थी माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-May-2018
Total Views |

Pramesh sitaram aade,Manisha Dharma Dhurve,  kavidas Pandurang Kotmode , Umakant Suresh Madavi 
 
-सुधीर मुनगंटीवार यांच्या धडपडीला आगळी सलामी

चंद्रपूर, 
 
आपल्या अनोख्या कार्यशैलीने, लोककल्याणाच्या आगळ्या योजनांसाठी, गोरगरीबांच्या हितार्थ चाललेल्या धडपडीसाठी, अगदी शासकीय कार्यातही आपल्या शैलीतून रौनक निर्माण करण्याची ख्याती लाभलेले राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून राज्यातल्या आदिवासी बांधवांना प्रोत्साहित करण्यासाठी राबविण्यात आलेल्या एका उपक्रमाचे ऊर अभिमानाने भरून यावा असे फलित समोर आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चार आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर करत मंत्र्यांच्या धडपडीला अनोख्या यशाचा नजराणा सादर केला आहे.
 
 
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अभिनव कल्पनेतून ‘मिशन शौर्य’ हा धाडसी उपक्रम राबविण्याचा निर्णय झाला. केवळ निर्णय झाला असे नाही, तर ही शासकीय योजना केवळ कागदावर राहू नये, तिची यशस्वी अंमलबजावणी व्हावी, याही दृीष्टने प्रयत्न सुरू झाले. एरवी दुर्लक्षित राहणार्‍या, दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना या योजनेत सहभागी होता यावे, इतकेच नव्हे, तर ते मोहिमेत यशस्वी व्हावेत म्हणून सुमारे पन्नास विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना गिर्यारोहणाचे प्रशिक्षण देण्यात आले. स्वत: वित्तमंत्री या उपक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावरील प्रगतीचा आढावा घेत होते. यातील 10 आदिवासी विद्यार्थी महिनाभरापूर्वी माऊंट एव्हरेस्टचे शिखर सर करण्यासाठी निघाले होते. यातील चार विद्यार्थ्यांनी 16 मे रोजी सरतेशेवटी यश संपादन करत, एव्हरेस्टचे टोक गाठले.
 
 
चंद्रपूर जिल्हयातील शासकीय आदिवासी आश्रमशाळा देवाडा येथील उमाकांत मढावी, परमेश आले, मनीषा धुर्वे आणि शासकीय आदिवासी आश्रमशाळा जिवती येथील कवीदास काठमोडे या विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्ट हे शिखर सर करून चंद्रपूर जिल्हयाची मान उंचावली आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने अंमलात आलेल्या कल्पक उपक्रमातून नुकतीच चंद्रपूर आणि बल्लारपूर ही रेल्वेस्थानके देशातील सर्वात सुंदर रेल्वेस्थानके म्हणून विजेती ठरली. त्यापाठोपाठ इथल्या विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्टचे शिखर सर करून चंद्रपूर जिल्ह्याची कीर्ती राष्ट्रीय स्तरावर प्रस्थापित केल्याने या जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
 
 
आदिवासी विकास विभाग व चंद्रपूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. या विद्यार्थ्यांना सुधीर मुनगंटीवार आणि आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा यांनी चंद्रपुरात आयोजित एका कार्यक्रमात हिरवी झेंडी दाखवत शुभेच्छा दिल्या होत्या. उर्वरितांपैकी आणखी 2 विद्यार्थी येत्या 2 दिवसात माऊंट एव्हरेस्ट सर करतील, अशी स्थिती आहे. या धाडसी, शूर, देशभक्त विद्यार्थ्यांचे सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@