‘इसिस’विरोधी कोबानचे युद्ध - भाग 2

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-May-2018   
Total Views |
 

मागील लेखात सांगितल्याप्रमाणे कोबान परगण्यातील बहुतांश गावे ‘इसिस’ने हस्तगत केली होती. पण, कोबान परगण्यातील मुख्य कोबान शहर अजून त्यांनी हस्तगत केले नव्हते. ते जर हस्तगत केले तर कोबान पडले असते व ‘इसिस’चा विजय झाला असता.
 
अशावेळी सर्वप्रथम अमेरिका कोबानच्या साहाय्याला धावून आली. दि. २७ सप्टेंबर २०१४ ला अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त आघाडीने कोबानपासून चार किमीवर असलेल्या अलिशार गावावर फायटर जेटने बॉम्बहल्ला केला. अलिशार गावावर पहिल्यांदा बॉम्बवर्षाव केला, कारण हे गाव ‘इसिस’चे नियंत्रण ठेवण्याचे व आदेश देण्याचे केंद्र होते; त्यामुळे यावरच हल्ला केला तर ‘इसिस’ला जोरदार झटका बसेल. पण, तरीही ‘इसिस’चे कोबान शहरावरील हल्ले सुरूच होते. याचे कारण अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त आघाडीने हवाई हल्ले करून कुर्दांना साहाय्य केल्यासारखे दाखवले असले तरी त्यांनी पूर्ण ताकदीने व जोरदार हवाई हल्ले केले नव्हते. कारण, अमेरिकेला ‘नाटो’मधील महत्त्वपूर्ण सदस्य असलेल्या तुर्कस्तानला दुखवायचे नव्हते. तुर्कस्तानात सर्वाधिक म्हणजे दीड ते दोन कोटी कूर्द राहतात. तुर्कस्तानचा कुर्दिस्तान चळवळीला प्रखर विरोध आहे. तुर्कस्तानानेच रोजावाचा प्रेरणास्रोत अब्दुल्ला ओकलानला स्थानबद्ध करून ठेवले आहे. तुर्कस्तानचा रोजावा क्रांतीलाही विरोध आहे. तुर्की कुर्दांना कोबानमध्ये आपल्या कूर्दवंशीय बांधवांना साहाय्य करण्यास सीमा ओलांडून जाण्यास तुर्कस्तानने मनाई केली होती. तुर्कस्तानचा ‘इसिस’पेक्षा रोजावाला जास्त विरोध आहे. मागील लेखात सांगितल्याप्रमाणे, ‘इसिस’ला तुर्कस्तानच्या सीमेलगतच्या बाजारातून पुरवठा होत असे व तुर्कस्तानातील उफ्रा शहरातील ओदेस्सा रुग्णालयात व सेल्यापिनर सार्वजनिक रुग्णालयात ‘इसिस’च्या जायबंदी दहशतवाद्यांना मोफत वैद्यकीय उपचार मिळत असत. पण, आंतरराष्ट्रीय दबावाखाली अखेर तुर्कस्तानने तुर्की कुर्दांना कोबानमधील कुर्दांच्या साहाय्यास जाण्यास अनुमती दिली. त्यामुळे २८ सप्टेंबर २०१४ ला दीड हजार लढाऊ तुर्की कूर्द कोबानमध्ये शिरले.
 
आता ‘इसिस’ने कोबानच्या मध्यभागी १५ क्षेपणास्त्रांचा मारा केला व बॉम्बहल्लाही सुरू ठेवला. एकीकडे कोबान क्षेपणास्त्र व बॉम्बहल्ल्याने भाजून काढत असताना ‘इसिस’कडून हाती सापडलेल्या कूर्द पुरुष व महिला सैनिकांचे शिरच्छेद, बलात्कार, अत्याचार, छळ केले जात होते. ‘इसिस’ने सिफटेक गाव हस्तगत केले. कोबान शहरावर हल्ला करण्यासाठी हे उपयुक्त गाव होते. नंतर काझिकन गावही पडले. कुर्दांनी जेथून माघार घेतली, त्या कोबान शहराच्या पश्चिम आघाडी व आग्नेय दिशेने ‘इसिस’ कूच करत होती. शस्त्रास्त्र व दारूगोळ्याच्या कमतरतेमुळे हल्ला करण्यापेक्षा कुर्दांनी संरक्षणात्मक पवित्रा घेतला. वाळूच्या पोत्यांनी ‘वायपीजे’ आपले संरक्षण करण्याचा प्रयत्न करत होती. अशातही कुर्दांनी ‘इसिस’चे दोन रणगाडे नष्ट केले. कोबान शहराच्या सीमेवरील गाव ‘इसिस’ने हस्तगत केले. त्यामुळे ‘इसिस’ आता कोबान शहरापासून केवळ एक किमीच्या अंतरावर होती. ‘इसिस’ कोबानच्या १०० मीटरपर्यंत येताच जोरदार धुमश्चक्री उडाली व यात शहराच्या पूर्व आघाडीवरील धुमश्चक्रीत ५७ ‘इसिस’ अतिरेकी ठार झाले, तर दक्षिणेकडील आघाडीत एक इराकी ‘इसिस’ अधिकारी व आठ जिहादी ठार झाले. कूर्द तुटपुंज्या शस्त्रास्त्र व दारूगोळ्यासह मोठ्या शौर्याने लढत होते. तसेच महत्त्वाचे म्हणजे, कुर्दांना या प्रदेशाची भौगोलिक माहिती होती. त्यामुळे दबा धरून हल्ला करण्याचे तंत्र त्यांनी अवलंबिले.
 
सततच्या बॉम्बवर्षावाने उद्ध्वस्त झालेली घरे, सर्वप्रकारची टंचाई व जर समजा ‘इसिस’च्या फौजा शहरात शिरल्या, तर नंतर सहन करावे लागणारे अत्याचार, यामुळे यावेळेपर्यंत जवळजवळ सर्व रहिवाशांनी कोबान शहरातून पलायन केले होते व केवळ सैनिकच कोबान लढविण्यासाठी मागे उरले होते. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त आघाडीने आता हवाई हल्ल्याचा जोर वाढवला. २ ऑक्टोबरला केलेल्या हवाई हल्ल्यात ‘इसिस’चा एक तपासणी नाका उद्ध्वस्त झाला. ४ ऑक्टोबरला केलेल्या दक्षिण कोबानवरील दोन हल्ल्यात ‘इसिस’ची वाहने, सशस्त्र अतिरेक्यांना घेऊन जाणारे वाहन व एक लहान युनिट नष्ट केले, तर पूर्व कोबानमध्ये केलेल्या दोन हल्ल्यात ‘इसिस’चे वाहन, ‘इसिस’ची इमारत, तीन तोफखाना स्थानक व मोठ्या युनिटला बेचिराख केले.
 
 
 
 
५ ऑक्टोबरला ‘इसिस’ने मिस्तानोर टेकड्यांचा दक्षिण भाग ताब्यात घेतला जेथून त्यांना शहरात प्रवेश करणे सहज शक्य होते. अरीन मिर्कन नावाने ओळखली जाणारी डेलर कांज खामिस या ‘वायपीजे’च्या लढाऊ महिलेने ‘इसिस’च्या कोबान प्रवेशाला अडथळा निर्माण करून त्यांची आगेकूच संथ करण्यासाठी आत्मघाती हल्ला करून डझनभर ‘इसिस’ जिहादी ठार केले. कूर्द महिलांच्या शौर्याचे हे अजून एक उदाहरण.
 
 
 
 
आता अखेर ‘इसिस’ने कोबान शहरात प्रवेश केला व रस्त्यावर समोरासमोरील लढाईस प्रारंभ झाला. ६ ऑक्टोबरला ‘इसिस’ने शहरात १०० मीटरपर्यंत कूच केली. आग्नेय कोबानमधील चार मजली इमारतीवर ‘इसिस’चा झेंडा फडकायला लागला. कोबान परगण्यावर नऊ हजार ‘इसिस’ जिहादींची नेमणूक केली होती. ‘इसिस’ने कोबानचे औद्योगिक क्षेत्र ताब्यात घेतले. पण, ६ ऑक्टोबरच्या रात्रीपासून अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त आघाडीने बॉम्बहल्ल्यांचा जोर वाढवला. त्यात ४५ ‘इसिस’ अतिरेकी मारले गेले. तसेच ‘वायपीजे’च्या सैनिकांनीही दबा धरून अचानक ‘इसिस’वर हल्ले करण्यास सुरुवात केली. परिणामत: ‘इसिस’ला शहरातून माघार घ्यावी लागली.
 
पण, पुन्हा ‘इसिस’ला कुमक मिळाली व त्यांनी परत थोडी आगेकूच केली. हवाई हल्ले केले तरी कोबान संपूर्णपणे ‘इसिस’च्या ताब्यात जाण्याची भीती होतीच. कारण, अशा परिस्थितीत हवाई हल्ल्यांची साथ जरी असली तरी ‘वायपीजे’ फार तुटपुंज्या शस्त्रास्त्रांसह लढत होती. त्यामुळे आता अमेरिकेच्या सी-१३० या मालवाहू विमानातून २४ टन लहान शस्त्रास्त्रे व दारूगोळा, १० टन वैद्यकीय साहाय्य कोबानमध्ये टाकण्यात आले. या जोरावर कुर्दांनी ‘इसिस’ला रोखून त्यांनी ताब्यात घेतलेली काही गावे परत हस्तगत केली. पण, अजून संपूर्ण कोबान परगणा ताब्यात आला नव्हता व ‘इसिस’नेही माघार घेतली नव्हती. निर्णायक विजयासाठी हे साहाय्य पुरेसे नव्हते. अशातच कुर्दांना अजून दोन ठिकाणांहून साहाय्य मिळाले. ते कोणी व कसे साहाय्य केले आणि त्यामुळे युद्धाचे चित्र कसे पालटले ते पाहू पुढील लेखात.
 
 
 
 
 
 
- अक्षय जोग 
 
@@AUTHORINFO_V1@@