'दिस इज अमेरिका'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-May-2018   
Total Views |
 
 
 
 
 
अमेरिकेतील बंदूकसंस्कृती ही सर्वश्रुत आहे. आर्थिक महासत्ता असलेल्या या देशात अनेक कालबाह्य नियम बदलले. पूर्वी समलैंगिकांना नसलेले अधिकार कायद्यानुसार बहाल केले गेले. पण, बंदुकीचा कायदा ‘जैसे थे’ तसाच ठेवण्यात आला. यामुळे अमेरिकेतील ‘गन लॉबी’ मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली. प्रत्येक निवडणुकीत त्या लॉबीचा प्रभाव जाणवायला लागला. यामुळे कुठलाही राजकीय पक्ष बंदुकीचे नियम आणि परवान्यांवर कडक निर्बंध लादत नाही. परिणामी, तिथे बंदुकीचा दहशतवाद वाढला. पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले होणे जशी रोजचीच बाब, तशीच अमेरिकेत शाळा, चर्च आणि सार्वजनिक ठिकाणी खुला गोळीबार करून लोकांना यमसदनी पाठवणे ही नित्याचीच बाब झाली. यासाठी शाळकरी मुलांनी याविरोधात आवाजही उठवला, निदर्शने केली. आज हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे डोनाल्ड मॅकग्लोवर याचं ’दिस इज अमेरिका’ हे गाणं प्रदर्शित झालं आणि इंटरनेटवर या गाण्याने धुमाकूळ घातला. ‘मीम’ बनवणार्‍या मीमर्सनी ते लगेच उचलून त्यावर वेगवेगळे ‘मीम’ बनवले. त्यामुळे तो लगेच ट्रेंडमध्ये आला. असं काय होतं या गाण्यात की काही तासाभरात तो लाखो लोकांनी पाहिला? नाना पाटेकर म्हणतात की, “कलाकाराने आपल्या कलाकृतीच्या चौकटीत राहून सामाजिक विषयांवर भाष्य केलं पाहिजे. डोनाल्डने नेमकं हेच केलं. डोनाल्ड हा अमेरिकेतला नावाजलेला गायक. त्याच्या नावावर ‘ग्रॅमी’ पुरस्कार आहे. ’दिस इज अमेरिका’ या गाण्यात तो अमेरिकेतील ‘गन कल्चर’ दाखवतो. सुरुवातीला एक माणूस गिटार वाजवत असतो. नंतर कॅमेरा डोनाल्डकडे वळतो आणि गिटार वाजवणार्‍या व्यक्तीच्या तोंडावर कपडा येतो, गिटार जातं. डोनाल्ड त्याला गोळी घालतो आणि गाणं सुरू होतं ’दिस इज अमेरिका.’ पुढे असंच गाणं रंगत जातं. एका चर्चमधील काही लोक गाणं म्हणत असतात, डोनाल्डही त्यांना साथ देतो आणि मध्येच एक बंदूक त्याच्याकडे येते आणि तो सगळ्यांना पुन्हा गोळ्या घालून ठार करतो. सगळं गाणं एका गोदामामध्ये घडत असत. डोनाल्डला नंतर काही शालेय विद्यार्थी साथ देतात. बाजूला लोक सैरावैरा पळत असतात. एकूणच अमेरिकेतील ‘गन कल्चर’, लोकांमध्ये असलेला असंतोष या सर्वांचे एक चित्र डोनाल्ड आपल्या गाण्यातून दाखवत आहे. डोनाल्डच्या गाण्याला महत्त्व देण्याचे कारण तो एक ‘युथ आयकॉन’ आहे. जगभरात त्याचे चाहते आहेत. हा चाहता वर्ग साधारणतः तरुण आहे आणि ’ओपिनियन मेकर’ आहे. आज या वर्गाने हे गाणे डोक्यावर घेतले आहे. या गाण्यामुळे जगात अमेरिकेची काय प्रतिमा होईल, याची पर्वा त्याने केली नाही. त्यातल्या त्यात अमेरिका सरकार तेवढे सहिष्णू आहे. विचारवंत आणि अमेरिकेचे टीकाकार नॉम चॉमस्की अमेरिकेला ’दहशतवादी राष्ट्र’ म्हणतात. जनमतावर त्यांनी भरपूर लेखन केलं आणि अमेरिका कसं दहशतवादी राष्ट्र आहे, हे त्यांनी आपल्या लिखाणात वारंवार अधोरेखित केले. आजही ते अमेरिकेत राहतात, तर प्रश्‍न असा आहे की, जेव्हा देशात अशा घडामोडी घडत असतात, तेव्हा कलाकारांनी गप्प बसायचे नसते. त्यातही ‘ग्रॅमी’सारखा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर डोनाल्ड एक जागतिक स्तरावरचा कलाकार म्हणून ओळखला जाऊ लागला. इथे म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षा आँग स्यु की यांना शांततेसाठी ‘नोबेल’ प्रदान करण्यात आले. नंतर रोहिंग्यांचा प्रश्‍न निर्माण झाला तेव्हा त्यांनी कडक पावले उचलली. जगभरात जेव्हा तथाकथित पुरोगाम्यांनी त्यांचा ‘नोबेल’ पुरस्कार मागे घेण्यात यावा, अशी मागणी केली, तेव्हा त्यांनी या सगळ्यांना भीक घातली नाही. आता या ‘गन लॉबी’पुढे झुकायचे की त्यांना ताब्यात ठेवायचे, हे ट्रम्प सरकार ठरवेलच. पण, अमेरिकेतल्या बंदुकीच्या दहशतवादाची ही प्रतिमा जगभर पोहोचली आहे. यामुळे इतर देशांत राहणार्‍या लोकांमध्ये अमेरिकेचे जे चांगुलपणाचे चित्र आहे, ते मोडून निघेल. हे गाणे पाहून पुढे मोठे आंदोलन उभे राहिल्यासही आश्‍चर्य वाटायला नको. मोठमोठ्या क्रांती या एका ठिणगीनेच घडतात. कारण, लोकांमध्ये असंतोष असतो. तो प्रकट होत आहे. सत्ताधार्‍यांना योग्य तो संदेश देण्यात डोनाल्ड यशस्वी झाला, हे नक्की.  
 
 -तुषार ओव्हाळ
 
@@AUTHORINFO_V1@@