अस्सल अमेरिकेच्या आंबट-गोड आठवणी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-May-2018   
Total Views |



प्रवासवर्णनपर पुस्तकांची मराठी साहित्यातही तशी विपुलताच. अगदी अहमदाबादपासून ते अमेरिकेपर्यंत प्रवासातील विविधांगी अनुभवांचा, आठवणींचा शब्दरुपी ठेवा एक पुस्तकरुपी संचित म्हणून जगासमोर येतो. पण, बरेचदा या प्रवासवर्णनांमध्ये त्या ठिकाणची अथवा देशाची माहातम्य महतीच फार वर्णिलेली दिसते. लेखकाने भेटी दिलेल्या वास्तू, संग्रहालये यांची माहिती आणि त्याचे कौतुक असे या पुस्तकांना खरं तर पर्यटन पुस्तिकेचेच स्वरुप प्राप्त होऊन जाते. पण, ‘अमेरिका खट्टी मिठी’ हे डॉ. मृण्मयी भजक यांचे पुस्तक मात्र याला काहीसा अपवाद ठरणारे. कारण, नावाप्रमाणे अमेरिकेतील केवळ गोडीची चव न चाखवता त्यामागील आंबटपणाही हे पुस्तक वाचताना अलगद उलगडत जातो.


भारतीयांना तसे परदेशाचे भारी अप्रूप. त्यात अमेरिका, युरोप आणि कॅनडा म्हटलं की विचारता सोय नाही. पण, पर्यटनासाठी सातासमुद्रापारची सफर करणं निराळं आणि तिथे स्थायिक होऊन तेथील संस्कृतीशी एकरुप होणं, यामध्ये फार अंतर आहे. डॉ. मृण्मयी भजक यांचे हे पुस्तक वाचताना हे अंतर आणि भारतीय संस्कृतीबद्दलचे भान पदोपदी जाणवते. नवर्‍याच्या नोकरीनिमित्त डॉ. भजक यांना अमेरिकेतील सेंट जोसेफ या गावी अर्थात डाऊन टाऊनमध्ये कुटुंबासह स्थायिक होण्याची वेळ येते. त्यामुळे अमेरिकेला जाण्यापूर्वी पासूनची गडबड, घालमेल आणि विचारांच्या गुंत्यालाही लेखिकेने नि:संकोच वाट मोकळी करुन दिली आहे. अमेरिकेत प्रवेश केल्यानंतर विमानतळावरची कडक तपासणी, तेथील केवळ एक पिवळी रेष चुकून ओलांडली म्हणून एका भारतीय वृद्ध दाम्पत्याला देण्यात आलेली वागणूक याचीही डॉ. भजक यांनी रीतसर नोंद घेतलेली दिसते.


खरं तर त्यांच्या या अमेरिका प्रवासातील अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून ते मोठ्या भासणार्‍या प्रत्येक घटनेला साध्या, सोप्या आणि सुटसुटीत शब्दांत मांडण्याची किमया डॉ. भजक यांनी अचूक साधली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम कौतुक करावेच लागेल. या पुस्तकात कुठलीही दीर्घ प्रकरणे नाहीत की प्रवासवर्णनपर काव्यात्मक गूढताही नाही. वेगवेगळे विषय-अनुभव एक-एक प्रकरणांतून लेखिकेने रीतसर उलगडलेले दिसतात. त्यात पुस्तकाचा आकारही पारंपरिक पुस्तकांसारखा नसल्याने वाचकांचे मनही अगदी खिळून राहते. खरं तर, एकदा हे पुस्तक हाती घेतल्यावर सलग वाचून होईल, इतके सुटसुटीत आणि सलग.


मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांचे ‘शुभाशीष’ आणि सुप्रसिद्ध ललित लेखक प्रविण दवणे यांची ‘प्रस्तावना’ या पुस्तकाला लाभली आहे, तर ‘मनातलं मधून डॉ. मृण्मयी भजक यांनी एकूणच पुस्तक लेखनाचा उद्देश आणि आभारप्रदर्शनाचा हेतू साध्य केलेला दिसतो. त्यानंतर अनुक्रमणिकेमध्ये लेखिकेने विषयानुरुप प्रकरणांची मांडणी करत लेखनक्रमाची कटाक्षाने शिस्त पाळली आहे.


अमेरिकेतील वाचनालय, त्याची भव्यता, वैविध्य यांचा लेखिकेने कथन केलेला अनुभव खरंच तेथील वाचन संस्कृतीच्या महत्त्वाची एकूणच जाणीव करुन देतो. त्यांच्या वाचन संस्कृतीतून खरंच आपणा भारतीयांनी शिकण्यासारख्या काही गोष्टी लेखिका आवर्जून नमूद करते. जसे की, एकावेळी ३०-४० पुस्तकं नेण्याची मुभा, वाचनालयासाठी कोणतीही फी आकारली न जाणे किंवा लहान मुले, किशोरवयीन मुलांसाठी वाचनालयातच एका वेगळ्या कक्षाची सोय इत्यादी. त्यामुळे डॉ. भजक यांनी अधोरेखित केेलेली अमेरिकेतील वाचनरीती सर्वार्थाने सुखावून जाते.


कोणत्याही संस्कृतीशी एकरुप होताना तेथील वातावरण, भौगोलिक परिस्थितीशी मिळतेजुळते घेणे तसे क्रमप्राप्तच. लेखिकेलाही सुरुवातीला ते थोडेसे जड गेले, पण घराच्या खिडकीतून दिसणारा विस्तीर्ण तलाव, त्याच्या गोड पाण्याचे वैविध्य, कडाडणारे वारे याचे वर्णन आपसुकच तेथील परिस्थितीचे रम्य चित्र डोळ्यासमोर उभे करते. म्हणजे अगदी ऊबदार, उन्हाच्या आपल्या देशातून थंडीच्या, बर्फाच्या देशात पाऊल ठेवल्याचा अनुभव लेखिकेने अनेक बारकाव्यांसह टिपला आहे. अशा या नवीन देशात वावरताना लेखिकेच्या अनेकांशी भेटीगाठी झाल्या. काही नियोजित, तर काही अगदी अनियोजित-अनपेक्षित. त्यातून लेखिकेने टिपलेला अमेरिकनांचा मदतीचा स्थायीभाव, मनमिळाऊ स्वभाव याचा प्रत्यय पुस्तक वाचताना खरंच सुखावून जातो. त्याचबरोबर तेथील शालेय संस्कृती, अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांच्या कलाकलाने घेणारे शिक्षक हे सगळे वाचून अमेरिकनांच्या या मनमोकळ्या, मुक्त धोरणांचे कौतुक केल्याशिवायही राहवत नाही.


अमेरिकेत राहून पुन्हा गृहिणी म्हणून नव्याने आयुष्याची सुरुवात करणार्‍या डॉ. मृण्मयी भजक यांना अमेरिकेत भेटलेल्या भारतीयांचाही प्रचंड आधार वाटला. त्यांच्यातील मित्रत्व, भेटीगाठी, पार्ट्या आणि एकमेकांच्या मदतीला धावून जाणारा स्वभाव याचे अनेक किस्से लेखिकेने या पुस्तकात रंगवले आहेत. पण, अमेरिकेच्या या एकूणच वर्णनात कुठेही ‘अमेरिकी संस्कृती किती छान आणि आपण भारतीय कसे मागास,’ असा दृष्टिकोन लेखिकेने बाळगलेला नाही. अमेरिकन संस्कृतीतील वाखाणण्याजोग्या बाजूंबरोबर काहीशा खटकलेल्या बाबींवरही लेखिकेने नेमकेपणाने बोट ठेवले आहे. जसे की, चप्पल-बूट दारात न काढता थेट बेडरुमपर्यंत जाण्याची सवय, छोट्या छोट्या कामांसाठी लावाव्या लागणार्‍या रांगा वगैरे. तेव्हा, हे पुस्तक वाचताना त्यामध्ये अजिबात एकांगीपणा जाणवत नाही. अमेरिकन लोकांचा भारताकडे, भारतीयांकडे पाहण्याचा सन्मानपूर्वक दृष्टिकोनही लेखिकेने अधोरेखित केला आहे. अशाप्रकारे, लेखिकेने दोन्ही संस्कृतींची अनुभूती घेऊन, त्यांच्या वर्णनात योग्य समतोल साधण्याचा प्रयत्न केलेला आहे.


प्रवास हा आयुष्यालाही सर्वार्थाने प्रवाही करतो. नवे खूप काही शिकवून जातो. लोकांकडे, परिस्थितीकडे बघण्याचा मानवी दृष्टिकोनही या प्रवासामुळे घडत असतो, बदलत असतो. हे पुस्तक वाचताना ही बाब अगदी प्रकर्षाने जाणवते. लेखिकेला हे ‘अमेरिकीपण’ चांगलेच रुचले असले तरी अखेरीस वेळ येते ती मायदेशी परतण्याची. त्या निमित्ताने ‘रिपेट्रीएशन’ या एका नवीन इंग्रजी शब्दाची ओळख होते. याचा सोपा अर्थ, परदेश सोडून मायदेशी परतल्यावर पुन्हा जुळवून घेताना येणार्‍या अडचणी. लेखिकेलाही सुरुवातीला असे काही होईल, असे वाटले नाही. पण, जसजशी अमेरिका दृष्टिपल्याड जाऊ लागते, तेव्हा मात्र लेखिकेला भावना अनावर होतात.


पुस्तकाच्या मुखपृष्ठाचाही विशेषत्वाने उल्लेख करावासा वाटतो. भारतीय महिलेेच्या चष्म्यातून दिसणारी अमेरिका, असे सूचक चित्र सतीश भावसार यांनी साकारले आहे. पुस्तकातील प्रत्येक प्रकरणापूर्वी अमेरिकन शहराचे एकच रेखाटन वापरण्याऐवजी विषयानुरुप त्यात बदल केले असते, तर ते नक्कीच अत्यंत समर्पक ठरले असते. त्याशिवाय संबंधित छायाचित्रांच्या वापराने पुस्तकाच्या आशयाला अधिकच दृश्यपणा प्राप्त झाला असता. पुस्तकाची छपाई, बांधणी उत्तम असली तरी मुद्रितशोधनातील काही बारीकसारीक व्याकरणीय चुका थोड्याफार खटकतात.


एकूणात, अमेरिकेला जा अथवा नाही किंवा जाऊनही आला असाल तरी डॉ. मृण्मयी भजक यांच्या चष्म्यातून चितारलेली अमेरिका खरीखुरी, अत्यंत मोकळीढाकळी, दिलखुलास आणि खट्टी-मिठी वाटेल, हे नक्की.
 

पुस्तकाचे नाव : अमेरिका खट्टी मिठी

लेखिका : डॉ. मृण्मयी भजक

प्रकाशक : ग्रंथाली, पहिली आवृत्ती

पृष्ठसंख्या : १७३ 

मूल्य : २०० रु .


- विजय कुलकर्णी
 
@@AUTHORINFO_V1@@