वरूणराजाच्या हजेरीने पुणेकर सुखावले
पुणे : उन्हाच्या झळा सोसत असलेल्या पुणे शहराला आज वरुणराजाने सुखद असा धक्का दिला आहे. आज संध्याकाळी पुणे शहरात मुसळधार पाऊस झाला असून यामुळे उकाड्याने हैराण झालेले पुणेकर चांगलेच सुखावले आहेत.
आज दुपारपासूनच शहराला काळ्या ढगांनी घेरले होते. दुपारी १२ पर्यत सगळीकडे दररोज प्रमाणे कडक ऊन पडले होते. परंतु १ वाजल्यानंतर हळूहळू आभाळामध्ये ढगांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. यानंतर थोडावेळ जोराचा वारा देखील सुरु झाला होता. यावरून आज शहरात पाऊस पडणार अशी अटकळ अनेकांकडून बांधली जात होती. यामध्येच पावणेपाच सुमारास अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यामुळे अनेकांची त्रेधातिरपिठ उडाली. रस्त्यावरील दुचाकी चालक आणि रस्त्याच्याकडेला असलेल्या छोट्या व्यवसायीकांची देखील चांगलीच तारांबळ उडाली.
गेल्या दोन महिन्यापासून कडक ऊन आणि प्रचंड उकाड्यामुळे पुणेकर चांगलेच हैराण झाले होते. शहरामध्ये वाढलेल्या उन्हामुळे अनेक जण दुपारी घराबाहेर निघणे टाळत होते. कडक उन्हामुळे आज रविवार असून देखील नेहमी पेक्षा रस्त्यावर गर्दी कमी प्रमाणात पाहायला मिळवत होती. परंतु अचानक सुरु झालेल्या या पावसामुळे पुणेकरांचा 'सनी संडे' हा 'रेनी संडे'मध्ये बदलून गेला आहे.