कर्नाटकात भाजप १४० जागा जिंकणारच !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-May-2018   
Total Views |

 
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा धुरळा आता शांत झाला असून आज १२ मे रोजी मतदारांचा कौल मतपेटीत बंद होणार आहे, तर १५ मे रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र, शिमोग्याचे माजी खासदार, शिकारीपुराचे माजी आमदार व कर्नाटक भाजपचे युवा नेते बी. वाय. राघवेंद्र यांची दै. ‘मुंबई तरुण भारत’चे प्रतिनिधी निमेश वहाळकर यांनी काही दिवसांपूर्वीच शिकारीपुरा येथे विशेष मुलाखत घेतली. ही मुलाखत आज प्रकाशित करत आहोत.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अखेर संपुष्टात आली आहे. या क्षणी तुम्हाला तुमच्या पक्षाची परिस्थिती कशी वाटते?

या निवडणुकीत आमच्या पक्षाने बी. एस. येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. जेव्हा येडियुरप्पा मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी राज्यातील शेतकरी, गोरगरीब आणि वंचितांसाठी मोठं काम केलं. या कामाची आम्हाला या निवडणुकीत मोठी मदत होणार आहे आणि अर्थातच, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशव्यापी नेतृत्व आणि देशासाठी ते करत असलेलं काम, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचं संघटनात्मक कार्य, या तिन्हींच्या मदतीने आणि आमच्या ‘केडर बेस्ड’ पक्षाच्या कार्यकर्त्यांचे कष्ट, या सार्‍यांच्या मदतीतून आम्ही ही निवडणूक जिंकणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात असंख्य ठिकाणी घेतलेल्या सभांमुळे आमची ताकद आणखी वाढली आहे. आम्हाला हा विश्वास आहे की, कर्नाटक विधानसभेत आम्ही यावेळी 140 ते 150 जागा जिंकणार आहोत.

शिकारीपुरा आणि शिमोगा हे भाग भाजपचे पारंपरिक बालेकिल्ले म्हणून गणले जातात. या भागासाठी सिद्धरामैय्या सरकारने गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात काय केलं आणि येडियुरप्पा यांनी या भागासाठी काय केलं?

या शिमोगा जिल्ह्याने आतापर्यंत 3 मुख्यमंत्री दिले आहेत. सर विश्वेश्वरैय्या यांनी आमच्या जिल्ह्यातील भद्रावतीमध्ये दोन उद्योगांची पायाभरणी केली. एक म्हणजे स्टील उद्योग आणि दुसरा पेपर उद्योग. त्यानंतर इतक्या वर्षांत या जिल्ह्यात एकही उद्योग आला नाही. जेव्हा येडियुरप्पा मुख्यमंत्री झाले, तेव्हा जिल्ह्यात उद्योग आले. याशिवाय शैक्षणिक केंद्र म्हणूनही जिल्ह्याची ओळख बनली. अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी आदी क्षेत्रांतील महाविद्यालये इथे उभी राहिली. जिल्ह्यात सिंचनासाठी अनेक योजना राबवल्या गेल्या. पायाभूत सुविधांमध्ये मोठं काम झालं. दुसरीकडे, काँग्रेस सरकारच्या काळात या भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झालं. या सरकारच्या भ्रष्ट कारभाराला जनता कंटाळली होती. त्यामुळे या भागातून भाजपच्याच जास्तीत जास्त जागा निवडून येतील, अशी आम्हाला खात्री आहे.

या संपूर्ण निवडणुकीदरम्यान भाजपमधील अंतर्गत मतभेदांबाबत बरीच चर्चा झाली. विशेषकरून येडियुरप्पांचा गट आणि त्यातही तुम्हाला किंवा विजयेंद्र यांना उमेदवारी न मिळणं, याचे बरेच अर्थ काढले गेले. 2012-13 मधील घडलेल्या घटनांमुळे पक्षात आजही दोन गट आहेत आणि त्यातून विस्तव जात नाही असं म्हटलं जातं. याबाबत काय सांगाल?

आमच्या पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून बी. एस. येडियुरप्पा यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे त्यांचे पुत्रही निवडणूक लढले नाहीत. मी काय किंवा विजयेंद्र काय, ही आमच्या पक्षाची कार्यपद्धती आहे. तिचा आम्ही सन्मान करतो आणि तो करणं हे आमचं कर्तव्यही मानतो. मी किंवा विजयेंद्र यांनी निवडणूक लढवायची की नाही, यावर पक्ष सांगेल तेव्हा त्याप्रमाणे उभे राहण्यास आम्ही सज्ज असूच.

सिद्धरामैय्या सरकारच्या काळात झालेलं टिपू सुलतानचं उदात्तीकरण, स्वतंत्र लिंगायत धर्माला दिलेलं पाठबळ यामुळे देशभरात कर्नाटकातील घडामोडींची चर्चा झाली. तुम्ही पाच वर्षं विरोधी पक्षात आहात. तुम्ही सिद्धरामैय्या सरकारच्या कार्यकाळाचं विश्लेषण कसं कराल?

सिद्धरामैय्या सरकारने या कार्यकाळात केलेल्या पापांची यादी मोठी आहे. राज्यात या पाच वर्षांत तब्बल तीन हजारांहून अधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. या पापाचं फळ काँग्रेसला भोगावंच लागणार आहे. पुण्याच्या यादीत या सरकारची एकही गोष्ट समाविष्ट करता येणार नाही. वाळूचा प्रश्न राज्यात गंभीर आहे. विकासकामासाठी वापरल्या जाणार्‍या वाळूसाठी भाजप सरकारच्या काळात लॉरीला 8-10 हजार रुपये दर होता. तो आता लॉरीला तब्बल 50 ते 60 हजारांच्या वर गेला आहे. कारण वाळू उपलब्धच नाही. ती मलेशिया आदी देशांकडून आयात करावी लागत आहे. याचा परिणाम राज्यांतील विकासकामांवर होत आहे. वाळू व्यवसायात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे. याचीही फळं सिद्धरामैय्या सरकारला भोगावी लागणार आहेत. बांधकाम मंत्र्यांच्या मुळावरच वाळू व्यवसायात भष्टाचार केल्याचा आरोप आहे. अशा अनेक प्रकरणांत काँग्रेस सरकारमधील अनेक मंत्री गुंतलेले आहेत. त्यामुळे जनता यावेळेस या सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही.

या निवडणुकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. अमित शाह यांचं निवडणूक व्यवस्थापन कर्नाटक भाजपने पाहिलं, अनुभवलं. शाह यांना ‘टास्क मास्टर’ म्हणून ओळखलं जातं. या गोष्टींचा भाजपला या निवडणुकीत फायदा होईल असं वाटतं का?

निश्चितच. पाच-दहा वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्येही मी पक्षासाठी काम करत होतो. तेव्हा मी पाहिलं की, सर्वसाधारणपणे केंद्रीय नेते अगदी बारीकसारीक गोष्टीत लक्ष घालत नाहीत. केवळ काही महत्त्वाच्या सभा वगैरे संबोधित करतात. पण, यावेळेस मी पाहतोय की, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेश संघटनेतील पदाधिकारी यांनी एकत्र येऊन निवडणूक प्रचाराबाबतचं पहिल्या दिवसापासूनचं धोरण ठरवलं. त्यानुसार व्यवस्थापन केलं. हे या निवडणुकीत नक्कीच फायदेशीर ठरेल. येडियुरप्पा यांचं नेतृत्व, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भक्कम पाठिंबा, आणि अमित शाह यांचं आर्य चाणक्याप्रमाणे मार्गदर्शन हे पक्षाला नक्कीच विजयाच्या दिशेने घेऊन जाणार आहेत.

या संपूर्ण निवडणूक कालावधीत देवेगौडा-कुमारस्वामींच्या जनता दल (सेक्युलर) आणि भाजपच्या छुप्या मैत्रीचे आरोप झाले, चर्चा झाली. निवडणुकीचा धुरळा आता खाली बसला आहे. भाजप आणि जनता दल यांचं सध्याचं ‘रिलेशनशिप स्टेटस’ काय आहे, हे आतातरी जनतेला खरंखरं कळू शकेल का?


एच. डी. कुमारस्वामी आमच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री बनले आणि त्यानंतर त्यांनी काय केलं, हे संपूर्ण जगाने पाहिलं. सर्वांच्या ते व्यवस्थित लक्षात आहे. त्यामुळे आमच्या छुप्या नात्याचा प्रश्नच येत नाही आणि मुख्य म्हणजे या निवडणुकीत आम्ही स्पष्ट बहुमतात निवडून येणार आहोत. कुणाच्याही पाठिंब्याची गरजच पडणार नाही, याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे जनता दलासोबत भाजपचं काही ‘रिलेशन’च नसल्यामुळे त्याचं काही ‘स्टेटस’ असण्याचा प्रश्नच येत नाही.

थोडक्यात, कर्नाटकात यंदा ‘शतप्रतिशत भाजप’ येईल, अशी तुम्हाला खात्री वाटते. 15 मे रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. या निकालांनुसार, कर्नाटक विधानसभेत भाजप, काँग्रेस आणि जनता दल या तीनही प्रमुख पक्षांचं ‘लोकेशन’ आम्हाला कुठे शोधायला लागेल?

माजी खासदार, माजी आमदार आणि कार्यकर्ता म्हणून माझ्या अभ्यास आणि अनुभवानुसार माझा अंदाज मला असं सांगतो की, भाजप 224 पैकी 140 ते 150 जागा मिळवत स्पष्ट बहुमतासह सत्तेत येईल. विद्यमान सत्ताधारी काँग्रेस जेमतेम 60 ते 65 जागांपुरती सीमित राहील. उरलेल्या जागा जनता दल आणि इतर पक्षांना आणि अपक्षांना मिळतील. या आकडेवारीनुसार कोणाचं ‘लोकेशन’ कुठे असेल हे वेगळं सांगायला नकोच...


- निमेश वहाळकर
@@AUTHORINFO_V1@@