आठवण एका नृत्यसम्राज्ञीची...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-May-2018   
Total Views |
 

 
मृणालिनी साराभाई हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. नृत्यनिपुण असण्याव्यतिरिक्त त्यांच्या अंगी बरेच वाखाणण्यासारखे होते. त्या एक उत्तम लेखिका आणि साहित्यिक होत्या. त्यांच्याविषयी...

आजकाल असा एकही दिवस जात नाही, ज्या दिवशी आपण ‘गुगल सर्च’ करत नाही. रोज उठल्यावर गुगल ओपन करताना सर्वांना उत्सुकता असते ती ‘आजचं ‘गुगल-डुडल’ काय असेल’ याची! याचं कारण ‘गुगल-डुडल्स’ अर्थातच खूप सुंदर आणि कलापूर्ण बनवलेली असतात. कालच्या ‘गुगल-डुडल’ मध्ये भारतीय शास्त्रीय नृत्याचं छायाचित्र होतं. प्रत्येक दिवसाचं ‘गुगल-डुडल’ हे त्या दिवसाचं कोणतं तरी वैशिष्ट्य सूचित करणारं असतं अथवा ते एखाद्या व्यक्तीला अर्पण केलेलं असतं. काल भारतीय शास्त्रीय नृत्याचं छायाचित्र ‘गुगल-डुडल’ वर झळकण्याचं निमित्त म्हणजे काल दिवंगत सुप्रसिद्ध भारतीय शास्त्रीय नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांची शंभरावी जयंती होती.

मृणालिनी साराभाई या सुप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या पत्नी. त्यांचा जन्म 11 मे 1918 रोजी केरळमध्ये झाला. घरचं वातावरण शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध होतं. मृनालिनीताईंचे वडील एस. स्वामिनाथन हे मद्रास उच्च न्यायालयात वकील होते, तर आई भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय होती. भारतात जन्म होऊनसुद्धा मृणालिनीताईंचं बरचसं बालपण स्वित्झर्लंडमध्ये गेलं. तिथे असताना त्यांनी पाश्‍चात्य नृत्याचे धडे घेतले. त्यानंतर काही दिवस त्या रविंद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनमध्ये वास्तव्यास होत्या. तिथून पुढे काही काळ त्यांनी ‘अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ ड्रामॅटिक आर्ट्स’ इथे शिक्षण घेतले. तिथून भारतात परतल्यावर त्यांनी सुप्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना मिनाक्षी पिलई यांच्याकडे भरतनाट्यम, गुरु कुंचू कुरूप यांच्याकडे कथकली, तर कल्याणीकुट्टी अम्मा यांच्याकडे ‘मोहिनीअट्टम’ या नृत्यप्रकारांचं शास्त्रीय शिक्षण घ्यायला सुरुवात केली. या तीनही नृत्यप्रकारांमध्ये त्या पारंगत झाल्या. एकापेक्षा अधिक नृत्यप्रकारांमध्ये तेवढचं प्रभुत्व मिळवणार्‍या भारतातल्या काही मोजक्याच नृत्यांगनांपैकी त्या एक होत्या.

1942 साली त्या ‘भारताच्या अवकाशकार्यक्रमाचे जनक’ म्हणवले जाणारे विक्रम साराभाई यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. 1949 साली त्यांनी अहमदाबादमध्ये ‘दर्पण अ‍ॅकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ ची स्थापना केली, जी आज भारतातली सर्वोच्च नृत्यप्रशिक्षण संस्था म्हणून नावारुपाला आली आहे. या अ‍ॅकॅडमीमध्ये त्या स्वत: नृत्यशिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. 1949 साली त्यांनी प्रथमच पॅरिसमध्ये नृत्यसादरीकरण केलं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुकाची थाप मिळवली. पुढील संपूर्ण आयुष्य त्यांनी नृत्यसाधनेसाठी वाहून घेतलं. त्या स्वत: उत्तम नृत्यांगना तर होत्याच, पण तेवढ्याच चांगल्या नृत्यशिक्षिका होत्या. आपल्या संपूर्ण कारकीर्दीत त्यांनी तब्बल 18 हजार विद्यार्थ्यांना नृत्याचे धडे दिले. नृत्यातल्या तीनशेपेक्षा जास्त रचना त्यांनी स्वत: केल्या आहेत. त्यांच्या ‘कृष्ण-गोपाळ’ आणि ‘महाभारत‘ या नृत्यरचना जगप्रसिद्ध ठरल्या. संपूर्ण भारतीय नृत्याविश्‍वावर त्यांचा जबरदस्त पगडा होता. भारत सरकारने त्यांना 1962 साली ‘पद्मभूषण’, तर 1965 साली ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरवलं. 1990 साली त्यांची पॅरिसच्या ‘इंटरनॅशनल डान्स अ‍ॅकॅडमी’च्या एक्झिक्युटिव्ह कमिटीवर नेमणूक झाली. 1994 साली त्यांना संगीत-नाटक अकादमीची फेलोशिप मिळाली. 1997 साली ब्रिटिश सरकारकडून त्यांना मानाची ‘डिलिट’ पदवी बहाल करण्यात आली. 1988 साली दर्पण अ‍ॅकॅडमीच्या सुवर्णमहोत्सवाचं औचित्य साधून त्यांच्या नावे नृत्य क्षेत्रात चमकदार कामगिरी करणार्‍यांसाठी ‘मृणालिनी साराभाई अ‍ॅवॉर्ड फॉर क्‍लासिकल एक्सिलन्स‘ हा पुरस्कार सुरू करण्यात आला. 21 जानेवारी 2016 रोजी वयाच्या 97व्या वर्षी या भारतीय नृत्यसम्राज्ञीने जगाचा निरोप घेतला. त्यांनी दर्पण अ‍ॅकॅडमीच्या रुपाने सुरू केलेलं शास्त्रीय नृत्याचं विद्यापीठ आज त्यांच्या कन्या सुप्रसिद्ध नृत्यांगना मलिका साराभाई चालवत आहेत.
मृणालिनी साराभाई हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. नृत्यनिपुण असण्याव्यतिरिक्त त्यांच्या अंगी बरेच वाखाणण्यासारखे होते. त्या एक उत्तम लेखिका आणि साहित्यिक होत्या. त्यांनी कादंबर्‍या आणि भरपूर बालसाहित्य लिहिलं. त्यांचं ‘व्हॉईस ऑफ हार्ट’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. शिवाय ‘द स्टोरीज ऑफ इंडिया’, ‘द सॅक्रिड डान्स ऑफ इंडिया’, ‘धिस अलोन इज ट्रू’ अशी अनेक पुस्तकं गाजलेली आहेत. सामाजिक कार्यातही त्या अग्रेसर होत्या. त्यांनी नृत्य हे समाजप्रबोधनाचं साधन म्हणून वापरलं. समाजाला काहीतरी चांगला संदेश देणार्‍या नृत्यरचना त्यांनी तयार केल्या. ‘गुजरात स्टेट्स हँडिक्राफ्ट अ‍ॅण्ड हँडलूम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’चं अध्यक्षपदही त्यांनी काही काळ भूषवलं होतं. गांधीविचारांचा पुरस्कार करणार्‍या ‘सर्वोदय इंटरनॅशनल ट्रस्ट’च्या त्या विश्‍वस्त होत्या. मृणालिनी साराभाई हे भारतीय संस्कृती, परंपरा, भारतीय समाज यांच्याबद्दल अतीव आदर असलेलं आणि त्याच्या उत्कर्षासाठी झटणारं व्यक्तिमत्व होतं. गुगलसारख्या महाकाय अमेरिकन कंपनीने त्यांची दखल घेऊन त्यांना समर्पित डुडल तयार करणं हीच त्यांच्या अफाट कर्तृत्वाची पोचपावती आहे. भारतीय शास्त्रीय नृत्य जनमानसापर्यंत पोहोचवणार्‍या या नृत्यसम्राज्ञीला तिच्या 100व्या जयंतीदिनी मन:पूर्वक अभिवादन!


- हर्षद तुळपुळे
@@AUTHORINFO_V1@@